सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली …. चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला …. कीर्तन सुरू झालं … चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं…. तो लहान असतानाच त्याची माय गेली …. पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची… ज्ञानदेवांचं बोलणं ऐकत राहिलं की चोख्याला हटकून हे सारं आठवत राही … इतक्या प्रेमाने पदर पांघरून धरनारा आता कुणीच नव्हता त्याला … आणि ज्ञानदेव सांगत होता की ‘विठाई माऊली’ अशीच प्रत्येक भक्ताला पोटच्या पोरासारखी जवळ घेते … घेतही असेल …. पण आपल्याला ? आपण महार … देव झाला तरी शुद्ध ना तो ? आम्हाला कसं घेईल जवळ ? चोखा उदास झाला … डोळ्यातलं पाणी काही थांबेना…. तो उठला आणि निघू लागला …..ज्ञानदेव
म्हणाले … थांबा … बाबा … कुठे चालला तुम्ही? तुम्हाला पटलं नाही का माझं बोलणं ? आणि चोखा थांबला …. यापूर्वी तो कोणाशीच बोलला नव्हता … आणि प्रत्यक्ष ज्ञानदेवांशी तर नाहीच …. आणि आता … हा माझ्या डोळ्यांचा विसावा… जीवाचा आनंद … प्रत्यक्ष ज्ञानदेव माझ्याशी बोलत आहे …. गडबड़ून गेला तो …. ज्ञानदेव हसले …. बाबा … असे पुढे या … कुठले तुम्ही … नाव काय तुमचं ? … मी म्हार हाय जी … चोखा म्हार…. मंगलवेढयाचा …. मंगलवेढयाहून आलात तुम्ही? कीर्तन ऐकायला? व्हय जी … आणि मग उठून का जात होता ? …… काय सांगू या पोराला … तुझा आवाज ऐकल्यावर हृदयात कालवाकालव होते … माझी माय आठवते…. चोख्याला उत्तर सुचेना …. पुन्हा डोळ्यातून पाणी वहायला लागलं … शेवटी हात जोडून कसाबसा म्हणाला … तुमाला कस सांगावं महाराज …. म्या म्हार हाय… आमाला कसं जवल करील इठठल? आमाला कोन बी ….. आमची सावली बी न्हाय चालत ….. चोख्याला बोलता येईना … त्याने ज्ञानदेवांपुढे डोकं ठेवलं ….. उठा चोखोबा …. उठा …. चोखा चमकून उठला … ज्ञानदेवांचा हात त्याच्या खांदयावर होता …. त्या स्पर्शाने तो चमकला …. तुमी मला शिवला महाराज …. ज्ञानोबा हसले … त्याचा हात धरून आपल्या शेजारी बसवत म्हणाले …. तुम्ही आमचेच आहात … चोखोबा आणि आपण सगळे एका विठोबाचे…. नामदेवा… आजचं आपलं कीर्तन आपल्या चोखोबांसाठी …. आणि नामदेव उठून पुढे आले …. टाळ वाजू लागले …. चिपळ्या वाजू लागल्या …. अभंग सुरू झाला ….
न लगे तुझी भुक्ती…. न लगे तुझी मुक्ती
मज आहे विश्रांती… वेगळीच
माझे मज कळले … माझे मज कळले
माझे मज कळले …. प्रेमसुख
नामदेव डोळे मिटून नाचत होते … लोकही देहभान विसरून नाचत होते … चोखा अगदी गहीवरून गेला … नामदेव म्हणाले ….बरं का चोखोबा ….तू कुणीही आस – तू विठाईसाठी फक्त तिचं लेकरू आहेस …. मग त्याच भरात पुढे म्हणाले …. नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प …. येसी आपोआप गिंवसीत …..
चोखा गदगदून रड़त होता ….मात्र आता त्याला आपल्या रडण्याची लाज वाटत नव्हती … तो रडत होता …. रड़ता रड़ताच टाळ्या वाजवत होता … नाचत होता … चोखा खरं म्हणजे आनंदाने हसत
होता ….
****
ज्ञानदेव असच एकदा त्याच्याशी बोलता बोलता म्हणाले …. देवाच तसच आहे चोखोबा …. जसं दुधाचच दही होतं …. जसा बीजचा वृक्ष होतो … तसा तोच परमात्मा नाना प्रकारे … नाना रूपात स्व:ताच सगळीकडे आहे … चोखनं हे असं काही ऐकलं की त्याचा जीव फुलासारखा व्हायचा…. मग लोकांशी बोलता बोलता चोखा हसत म्हणे …. अरे मी गुरं वळतो … तसा माजा द्येव बी गुरं वळतो …. मग लोक त्याला म्हणायचे … चोखोबा … तुमी लाख संत जाले …. पर लोक तुमाला म्हारच म्हणतात … चोखा हसायाचा … खांद्यावरची घोंगड़ी बाजूला ठेवायचा… मुंडशाचं फडकं
कमरेला गुंडाळायचा …. हातातली काठी नाचवत म्हणायाचा…. मी म्हारच हाय … त्येची लाज न्हाई मला… मी इठूचा म्हार हाय ….. आणि मग चोखा नाचत म्हणू लागे ….
जोहार मायबाप जोहार …. तुमच्या महाराचा मी महार …
सकाळीच मी निजून उठतो … आईबापाचे नावे पाच घास घेतो
झाडोनी पाटी दरबार आणितों … अविद्या केर पुंजा की मायबाप
जोहार, जोहार मायबाप जोहार ….. मी विठोबारायाचा महार ….
*****
समाधीची सगळी तयारी पुरी झाली … सगळे जण ज्ञानदेवांना भेटून गेले … पाया पडले … अचानक ज्ञानदेवांनी म्हटलं … नामदेवा … चोखोबा आले नाहीत … चोखोबा नदीकाठी रड़त बसला होता….. त्याला ही गोष्ट सहनच होत नव्हती …. ऊठ चोखोबा …. अरे त्याने तुझी आठवण काढल्येय ….वाट बघतोय तुझी …. भाग्यवंत आहेस … चोखा तीरासारखा धावला… थेट ज्ञानदेवांच्या पायावर कोसळला …. पाय घट्ट धरून पुन्हा पुन्हा त्यावर डोकं ठेवत राहिला …. रड़त रड़त पाय भिजवत राहिला … ज्ञानदेवांनी त्याला उठवला … खंदयावरच्या आपल्या शुभ्र वस्त्राने त्याचा चेहेरा पुसला … आपल्या मिठीत घेतलं … त्याच्या कानात हळूच सांगितलं … तुझी आणि विठ्ठलाची भेट पहायला मी येणार आहे ….. त्या दोघांची मिठी किती तरी वेळ तशीच राहिली ….भावनेने भिजत … हे बघून भोवती वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला … मग त्याला हलकेच बाजूला करून ज्ञानदेवांनी निवृत्तिनाथांना खूण केली …. त्यांनी चोखोबाला हात धरून बाजूला नेलं ….
*****
फार दिवसानी आज बरीचशी संतमंडळी एकत्र जमली होती …. आषाढी एकादशी तोंडावर आलेली …. आज नामदेवांच्या घरी गोरोबाकाका … विसोबा खेचर … नरहरी सोनार …. सेना न्हावी … सावता माळी …चोखोबा … सगळे सगळे जमले होते …. तरुण मंडीळीही होती … मग सोहोळा काय विचारता … प्रेम जिव्हाळा … चेष्टा मस्करी … कोणीतरी चोखोबाला आग्रह केला …. जोहार मायबाप म्हणायाचा … आता वय जाल बाबा … तरना असताना नाचायचो … तसं आता काय जमनार व्हय ? पण फारच आग्रह झाला …. गोरोबा काकांनीही आग्रह केला … तो उठला … डोक्याचं मुंडासं पोटाला आवळलं … धोतर वर घट्ट ओढून बांधलं … आणि नाचू लागला …. पण लगेच थकला …. कोणी तरी त्याचं नाचणं बघून वेडवाकडं बोललं …. मग चोखोबने हात मनोभावे जोडले … आणि शब्द आपोआप उमटायला लागले …. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा …. काय भुललासी वरलीया रंगा …. त्याचे गुरु असलेल्या नामदेवांनी पहिल्याच ओळीला उत्स्फुर्तपणे दाद दिली …… चोखोबा म्हणाले …. अरे, धनुष्य वाकडं असतं , पण तीर नाही वाकड़ा असत …. नदी वेड़ीवाकड़ी वळण घेते खरी … पण त्या नदीचं पाणी वाकडं असतं काय रे ? वरच्या रंगाला कशाला भूलता …. आतला भाव पहा … पहा मनाचा खरा रंग ….डोळे बंद करून परत गायला लागला … ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा …. काय भुललासी वरलीया रंगा …. त्या मस्ती करणाऱ्या तरुण पोराने त्याच्या पायावर डोकं ठेवलं … उट …बाळा अरे तुमी वरल्या वाकूडपनाला भुलला … तर कसं व्हायचं ….. त्येच्यापायी सांगितलं … बाकी काही न्हाय
****
आषाढी एकादशीचा तो दिवस …. चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेलेलं … अलोट गर्दी….. नामदेवांच्या रसाळ वाणीची आणि अनुभवसिद्ध निरूपणाची मोठी ख्याती ….. नामदेव कीर्तनाला उभे राहिले … समोर अनेक मोठमोठी संतमंडळी … आणि मागे अफाट जनसमुदाय … चंद्रभागा दुथड़ी भरून आनंदाने वाहात होती …. या सर्वांना साक्षी ठेऊन आज कीर्तन सुरू करतो ….. नामदेव म्हणाले आणि त्यांनी अभंग गायला सुरवात केली … त्यांनी संत जनाबाईचा अभंग निवडला …..
चोखामेळा संत भला … तेणे देव भुलविला ….
बाबानों आजच कीर्तन म्हणजे एका भगवत भक्ताच्या आयुष्यचं गाणं आहे … भक्त कसा असतो … कसा असावा … याच रहस्य सांगणारं कीर्तन आहे …. विठूच्या एका भोळ्या भक्ताची … एका अडाणी वारकर्यांची ही कथा आहे … जो आज साक्षात्कारी संताच्या पदवीला पोचला आहे …. अशा संत चोखोबांची ही कथा आहे ….
आणि नामदेवांचं कीर्तन रंगत गेलं … लोक भक्तीच्या प्रवाहात अगदी भिजून गेले … कीर्तनचा शेवट करताना ते म्हणाले … अशा या भक्तश्रेष्ठाच्या चोखोबांच्या घरी, मंडळी , आपण सगळ्यांनी आपल्या एकादशीच्या उपसाचं पारणं उद्या फेडायचं आहे …. प्रत्येक भक्ताला खरया प्रेमाने भरलेलं पवित्र अन्न चाखायला मिळणार आहे …. आपल्याबरोबर या भक्तियुक्त प्रसादाचा लाभ घ्यायला प्रत्यक्ष विठूरायही येणार आहे ….. बोला ….. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल ….
द्वादशीचं पारणं हजारो वारकऱ्यांनी चोखोबाच्या घरच्या प्रसादनं सोडलं …. नामदेवाच्या घराकडून धान्य शिधा सामुग्री आली …. एका रात्रीत सगळी तयारी झाली …. चोखा कृतार्थ झाला …..
*****
‘महाद्वार ’ हे खूपच सुंदर पुस्तक आहे … अरुणा ढेरे यांनी ते इतक सुंदर लिहिलंय … आपण एकदम मृदु होऊन जातो चोखोबांची गोष्ट वाचताना ….. खरं तर वारकरी होऊन जातो … इतके तल्लीन होतो …. अबीर गुलाल उधळिसि रंग …. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग …. जोहार मायबाप जोहार ….. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा …. काय भुललासी वरलिया रंगा …. हे सगळे चोखोबांचे अभंग आपण ऐकलेले असतात …. पण अबीर गुलाल मधल्या त्यांच्या शब्दांची व्यथा आपण सहसा जाणून घेतलेली नसते …. आपल्या प्रस्तावनेत अरुणा ढेरे सुरवातीलाच म्हणतात ….. चोख्यामेळ्याचे अभंग मी प्रथम जेव्हा वाचले, तेव्हा मनावर खूण उरली ती एका भळभळत्या दुखा:ची…. त्या दुखा:ने वैयक्तिक पातळीवर मला प्रथम स्पर्श केला …खरंच हे छोटंसं पुस्तक आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर स्पर्श करतं ….आपल्यातला हरवलेला भक्तिभाव नुसताच परत येत नाही तर तो फार सुंदर जाणीव करून देतो …. त्यांचं हे पुस्तक मराठी साहित्यिक विश्वातलं एक नक्कीच मौल्यवान असंच आहे ….. आज आषाढी एकादशी आहे ….. हे पुस्तक मी परत वाचलं …. आज … आणि तुम्हालाही या बद्दल सांगावंसं वाटलं …. जरूर जरूर वाचा …. काही क्षणाकरता का होईना आपलं मन एकदम खरया अर्थाने मृदु होतं …. अबीर गुलाल आपण परत ऐकतों आणि आता मात्र चोखोबांचा हा अभंग आपल्याला खरया अर्थाने कळतो …. आपण अस्वस्थ होतो … खूप काही जाणवत राहतं ….. लेखिका म्हणतात ते त्याचं भळभळतं दुःख आपल्यालाही जाणवतं ….तेही खूप आतून …..पुस्तक वाचताना कितीतरी वेळा डोळ्यातून आपसूकच अश्रू येत राहतात …श्वास जड होत राहतो …
या तीनही अभंगाच्या यूट्यूब लिंक्स खाली दिल्या आहेत …वरदा गोडबोले यांनी तर चोखोबांची आर्तता फारच सुंदर गायल्येय ….भान हरपून … मंजुषा पाटील कुलकर्णी यांनी देखील यातले दोन अभंग फार सुंदर गायलेत …त्याच्या लिंक्स देखील दिल्या आहेत….with other links
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
मंजुषा पाटील कुलकर्णी
https://youtu.be/BA2WHkSrpf0
जोहार मायबाप जोहर ….पंडित कुमार गंधर्व
https://youtu.be/5zQUAsexins
वरदा गोडबोले
https://m.youtube.com/watch?v=ODyLgQRT044
मंजुषा पाटील कुलकर्णी
https://youtu.be/2otC5hxiMZE
उस डोंगा परी रस नाही डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा |
— प्रकाश पिटकर
7506093064
9969036619
prakash.pitkar1@gmail.com
खूप सुंदर लिहल आहे ते वाचताना अस दृश्य डोळ्या समोर आल , भाव जागृत झाला ,
खूप खूप धन्यवाद
काळीज चिरत गेला हा लेख.
मनापासून धन्यवाद …. राधा मॅडम
इतकी मनस्वी दाद दिलीत ?
अतिशय हृदयस्पर्शी लेख ! मनापासून धन्यवाद,पिटकर साहेब ! डोळ्यातून घळघळा अश्रू वहायला लागले !
मनःपूर्वक धन्यवाद … शुभदा मॅडम ?