एखाद्या क्रिकेट, टेनिस किंवा फुटबॉल सामन्याच्या अखेरीस बातमी पाठवण्यापूर्वी संबंधित क्रीडा पत्रकारांनी एकत्रित येऊन बारकावे निसटणार नाहीत ना, याची खातरजमा करून घेणे तसे नित्याचेच. या नियमाला एक खणखणीत अपवाद- जॉन वुडकॉक! ‘द टाइम्स’साठी त्यांनी १९५४ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांचे वृत्तांकन केले.
कसोटी वा कोणत्याही क्रिकेट सामन्यात वार्ताहर कक्षात किंवा काही वेळा छायाचित्रकारांसमवेत सीमारेषेच्या जरा बाहेर बसून वुडकॉक वार्तांकन करायचे. त्यांची निरीक्षणे बिनचूक, वार्तांकन पूर्णतया निर्दोष! बहुतेक पत्रकार दुसऱ्या दिवशी त्यांच्या छापून आलेल्या बातम्या किंवा वृत्तलेख वाचायचे. सर्वांपेक्षा सरासरी किमान दोन निरीक्षणे वुडकॉक यांच्या वार्तांकनात अतिरिक्त तरीही तथ्याधारित आढळायचीच. डॉन ब्रॅडमन ते सचिन तेंडुलकर असा क्रिकेटपटूंचा विस्तीर्ण पट त्यांनी डोळ्याखालून घातला. वार्तांकनाकडे ते वळले तसे अपघातानेच.
भूगोलाची पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका घेऊन ते शिक्षकच व्हायचे. पण ऑक्सफर्डमध्ये क्रिकेट खेळत असताना विख्यात क्रिकेट लेखक ई. डब्ल्यू. स्वाँटन यांच्या संपर्कात आले. सुरुवातीला बीबीसीसाठी स्कोरर, मग स्वाँटन यांच्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांचे हरकामे अशा जबाबदाऱ्या पाडल्या. बीबीसीसाठी चित्रफितींची रिळे पाठवण्यापासून, ते स्वाँटन यांचे चालक, व्हिस्की सहायक असे उद्योग सांभाळत असताना त्यांनी काही लिखाणही केले. त्याने स्वाँटन यांच्यासह अनेक प्रभावित झाले. दरम्यानच्या काळात ‘मँचेस्टर गार्डियन’मध्ये भारतीय मालिकेचे वार्तांकन करण्याची जबाबदारी त्यांनी यथास्थित निभावली.
१९५४ मध्ये ‘द टाइम्स’ने त्यांना क्रिकेट वार्ताहर म्हणून संधी दिली, तेथे ते निवृत्त होईपर्यंत काम करत राहिले. जॉन अरलॉट, नेव्हिल कार्डस, ई. डब्ल्यू. स्वाँटन अशा दर्जेदार क्रिकेट पत्रकारांच्या परंपरेतील ते एक. परंतु जॉन वुडकॉक स्वत:चा उल्लेख क्रिकेट लेखक असाच करत. ‘विस्डेन क्रिकेट’ मासिकाचे ते १९८०पासून सहा वर्षे मानद संपादक होते.
‘विस्डेन’च्या जुनाट वळणाच्या क्रिकेट लिखाणात त्यांनी टवटवीतपणा आणला. त्यांनी जितक्या कसोटी सामन्यांचे वार्तांकन केले, तितके आजवर कोणीही केलेले नाही. त्यामुळेच त्यांचा उल्लेख ‘क्रिकेट पत्रकारांचे भीष्म पितामह’, ‘क्रिकेटचा विश्वकोश’ असा केला जाई. निवृत्त झाल्यानंतरही अगदी अलीकडेपर्यंत ते लिखाण करत. त्यांच्या लिखाणाला ‘द टाइम्स’मध्ये सन्मानाने स्थानही दिले जात होते.
जॉन वुडकॉक यांचे १८ जुलै २०२१ रोजी निधन झाले.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply