अनाउन्समेंट चा आवाज येत असल्याने जाग तर आली पण अनाउन्समेंट इंडोनेशियन भाषेत होत असल्याने कशाबद्दल होतेय ते कळत नव्हतं. आजूबाजूच्या सीटवर बसलेले काहीजण निघायची तयारी करताना दिसले. त्यांना विचारले तर शिप क्रू साठी अनाउन्समेंट झालीय पुढील दहा मिनिटात बोट पोहचेल असं त्यांनी सांगितलं. जकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती. खिडकीतून बाहेर बघितलं तर बोट एका ऑइल प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म च्या जवळून जात होती. प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला पिवळी धम्मक ज्वाला जळताना दिसली. खाली उतरून बोटीच्या मेन डेक वर आल्यावर मी जॉईन होत असलेल्या महाकाय जहाजाचे पहिल्यांदा दर्शन घडले. आमची बोट पोर्ट साईड कडून आल्याने जहाजाला वळसा घालून स्टारबोर्ड साईडला आली कारण सामानाची चढ उतार करणारी क्रेन जहाजाच्या स्टार बोर्ड साईडला होती. माझ्या जन्मापूर्वी 1918-1982 साली बांधणी झालेले 35 वर्ष पेक्षा जुने जहाज समुद्रात दिमाखात तरंगत होते. यापूर्वी जास्तीत जास्त दहा अकरा वर्ष जुने झालेल्या जहाजावर काम केल्याचा अनुभव होता. जहाजाचे अकोमोडेशनचा आकार आणि मिडशिप मध्ये म्हणजे जहाजाच्या बरोबर मधोमध असलेली एक मोठी क्रेन तेवढी जुनाट वाटत होती. जहाजाला पुढील टोकाला समुद्रात एका मोठ्या लोखंडी आणि आतून पोकळ असलेल्या गोलाकार तरंगणाऱ्या गोळ्याला दोन मोठ्या लोखंडी दोरांनी बांधले होते. समुद्राची खोली दोनशे फुटापेक्षा जास्त असल्याने तसेच समुद्रात खाली तेलाचे पाईप इकडून तिकडे गेले असल्याने जहाजाला अशा प्रकारे बांधण्यात आले होते. समुद्रात तरंगणाऱ्या पोकळ गोळ्याला बोया असं म्हटलं जाते. हा बोया खालून समुद्राला सहा ते आठ लोखंडी साखळीने बांधून ठेवलेला असतो. जहाज भरती ओहोटी, वारा आणि समुद्राच्या प्रवाहामुळे या बोया भोवती वर्तुळाकार फिरेल अशी सिस्टिम त्यात बनवलेली असते. समुद्रात दोन अडीचशे फूट खोल खालून बांधलेल्या साखळी पाण्यावर तरंगणाऱ्या बोयाला एका जागेवर जखडून ठेवतात आणि तोच बोया सव्वा लाख टन वजनाच्या जहाजाला वादळ वारा आणि प्रवाहात थोपवून धरतो. आजूबाजूला नजर जाईल तिकडे दूरवर अनेक लहान मोठे तेल विहिरी असलेले प्लॅटफॉर्म दिसत होते आणखीन दोन ठिकाणी ज्वाला जळत होत्या पण तिथं प्रोसेसिंग युनिट नव्हतं.
जसं जशी बोट जहाजा जवळ पोहचू लागली तसतसा बोटीचा स्पीड कमी होत गेला, दोन्ही इंजिनाची घरघर सुद्धा कमी झाली. जहाजावर आणि आजूबाजूला असणाऱ्या लहान बोटिंवर जॉईन करणारे वीस बावीस जण मेन डेकवर आप आपल्या ब्यागा घेऊन रेडी होऊन वर जहाजाकडे बघत होते आणि जहाजावरून सुद्धा घरी परतणारे खाली बोटीत बघत होते.
बोटीतून जहाजा कडे माझ्याच प्रमाणे इतर सगळे जण पडलेल्या चेहऱ्याने बघणारे निरूत्साही वाटत होते तर याउलट जहाजावरून घरी परतणारे एकदम उत्साही आणि आनंदाने खाली त्यांच्या नेहमीच्या रिलिव्हरना हात करताना दिसत होते. वर उभे असलेल्या पंचवीस तीस जणांमध्ये आपले पाच भारतीय अधिकारी लगेच ओळखून आले. पाच जणांमध्ये चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर, कॅप्टन, इलेक्ट्रिक ऑफिसर आणि एक ट्रेनी इलेक्ट्रिक ऑफिसर एवढेच भारतीय होते. मी ज्याला रिलीव्ह करणार होतो तो सेकंड इंजिनियर मला हॅन्ड ओव्हर करून दोन दिवसांनी दुसऱ्या एका बोट ने जाणार होता, त्यामुळेच पाच भारतीयांमध्ये तोच सर्वात जास्त आनंदी दिसत होता. बोट जहाजाजवळ गेल्यावर क्रेन च्या साहाय्याने एका मोठ्या लोखंडी बास्केट मध्ये घरी परतणाऱ्यांचे सामान आणि ब्यागा पाठवल्या. बोटीतल्या खलाश्यानी त्या काढून झाल्यावर त्याच बास्केट मध्ये जॉईन करणाऱ्यांनी आपापले सामान टाकले. क्रेन ने बास्केट वर घेतले जात असताना बोट जहाजावर चढण्यासाठी असलेल्या ल्याडर जवळ गेली. सगळे जण एका मागोमाग लाईनीत उभे राहिले, समुद्र शांत होता पण लहान लहान लाटांमुळे बोट थोडीफार हिंदकळत होती. प्रत्येकजण लाईफ जॅकेट घालून एका मागोमाग एक जहाजावर आणि ल्याडर असलेल्या प्लॅटफॉर्मला बांधलेल्या दोराला लटकून बोटीतून जहाजावर उडी मारत होता. वर जहाजाच्या मेन डेकवर गेल्यावर जॉईन होणारे आणि घरी परतणारे एकमेकांना हात मिळवून वेलकम ऑनबोर्ड, टेक केअर, गुड बाय वगैरे वगैरे त्यांच्या भाषेत बोलत होते. आपले पाचही भारतीय अधिकारी माझा भांबावलेला चेहरा बघून प्रवास कसा झाला आणि एकमेकांची ओळख करून देता देता आत अकोमोडेशन मध्ये घेऊन गेले. इलेक्ट्रिक ऑफिसरने ट्रेनी ला सांगून माझे सामान घेऊन केबिन दाखवायला पाठवले.
सेकंड इंजिनियर दोन दिवसानी जाणार असल्याने मला दोन दिवस छोट्याशा स्पेअर केबिन मध्ये राहायला लागणार होते. सामान वगैरे केबिन मध्ये ठेवून झाल्यावर, केबिनच्या पोर्ट होल म्हणजेच खिडकी बाहेर बघितले तर मला घेऊन आलेली क्रू बोट समोर दिसणाऱ्या एका आयलंडच्या दिशेने निळ्या पाण्याला कापत वेगाने निघाली होती. क्रू बोटीतून ऑइल प्लॅटफॉर्मवर दिसणारी ज्वाला शांतपणे जळत होती. शांतपणे जळणारी ज्वाला आणि शांत समुद्र आणि त्यात जहाजावर जॉईन झाल्याचा पहिला दिवस एकाकी पणा आणि खिन्नतेची जाणीव करून देत होते.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply