विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत. ही शस्त्रक्रिया एक यशस्वी जीवन देत असे; परंतु काही वर्षानंतर हा स्टीलचा गोळा अॅसेट्याब्युलम या उखळीला हळूहळू घासून खराब करीत असे व पुन्हा खुब्याच्या सांध्यात दुखायला सुरुवात होत असे. सर जॉन चानले या इंग्रजी सर्जनने उखळसुद्धा प्लास्टिकची बनवून हाडाच्या सीमेंटने बसविण्यास सुरुवात केली, तसेच स्टीलच्या गोळ्याचा आकार लहान केला. त्यामुळे चानले या सर्जनने बनविलेले सांधे संपूर्णपणे सांधे टोटल हिप या नावाने प्रसिद्ध झाले आणि अधिक यशस्वी व दीर्घकाळ चालू लागले. ज्या वैज्ञानिकांनी हाडाच्या सीमेंटचा (बोन सीमेंटचा) शोध लावला व ज्या इंजिनीअर लोकांनी सांध्याचे डिझाइन बनविले, तसेच अधिक काळ चालणाऱ्या प्लास्टिकचा शोध लावला त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. आज हे सांधे निरनिराळ्या धातूंनी बनविलेले व निरनिराळ्या आकाराचे उपलब्ध आहेत. प्रत्येक सर्जन आपल्या अनुभवाप्रमाणे निरनिराळे सांधे वापरतो. त्यामागील हेतू हा, की रुग्णाला जास्तीत जास्त फायदा व्हावा. यात प्लास्टिक, सिरॅमिक, स्टील, टायटॅनियम आदी पदार्थांपासून बनविलेले निरनिराळे सांधे आहेत. कधी कधी खुब्याचा सांधा खराब होऊन दुखू लागतो. त्याचे कारण म्हणजे टीबी किंवा इतर जंतूंनी झालेला जंतूसंसर्ग, तसेच सांधा निखळण्याने किंवा उखळीला फ्रॅक्चर झाल्याने किंवा रक्तप्रवाह खंडित झाल्याने हाड मरणे, अशी कारणे असतात. या सांधेदुखीमळे किंवा (ॲन्किलेझिंग यासारख्या स्पॉन्डिलोसिस) अगम्य रोगामुळेही खुब्याचे सांधे हळूहळू कडक होतात व माणसाला चालणे, बसणे उठणे अवघड होते. कधी कधी लहानपणी झालेल्या इजेमुळे किंवा रोगाने ऐन उमेदीत हा सांधा कडक होतो व दुखू लागतो. या सर्व कारणांसाठी कृत्रिम सांधारोपण ही खुब्याच्या सांध्यासाठी अतिशय यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. खुब्याच्या सांध्याजवळ हाडाचा कॅन्सर झाल्यास ही हाडे सर्जन काढून टाकतात व तेथे कृत्रिम सांधारोपण करतात.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply