जेसीबी हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं..साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं?
शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं..
इंजिनाचं नाव होतं जेसीबी..हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याची आद्याक्षरं होतं..
शोधकर्त्याचं नाव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’.
‘जोसेफ’ यांचा जन्म इंग्लंडमधील स्टॅफोर्डशायर इथल्या एका कॅथलिक कुटूंबात झाला.
‘बॅमफोर्ड शेतकी अभियांत्रिकी उद्योग प्रा.लि.’ हा या त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता.
योक्साॅलमध्ये जन्मलेले त्याचे अजोबा हेनरी यांचं धातू विक्रीचं दुकान होतं जिथं पन्नास माणसे-दहा मुले आणि तीन बायका नोकरी करत.हळूहळू त्यांचं हे दुकान देशातलं कृषी साहित्य मिळण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. सुक्या गवताच्या पेंढ्या बनवण्याचं यंत्र,दाताळे,उपणणी यंत्र,कापणी यंत्र,ट्रॅक्टर इ.कृषी साहित्य त्यांच्याकडं मिळत असे पण काही कारणास्तव हे सगळं एके दिवशी बंद झालं. लॅंकेशायर इथल्या स्टोनीहर्स्ट महाविद्यालयातून आपलं औपचारिक शिक्षण संपवून जोसेफनं काॅव्हेन्ट्री या ठिकाणी अल्फ्रेड हर्बर्ट कं. इथं काम सुरू केलं..
त्यावेळी ही कंपनी तिथली सगळ्यात मोठी यंत्र उत्पादक कंपनी होती,जोसेफ त्यांचा प्रतिनिधी म्हणुन ‘घाना’ या ठिकाणी रुजू झाला. तिथून परतल्यावर मात्र त्यानं आपल्या घरचा व्यवसाय जॉईन केला मात्र तिकडं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला रॉयल एअर फोर्स विभागाकडून बोलवणं आलं.
इथं ‘रसद पुरवठा’ विभागात काम केल्यानंतर तो ‘अमेरिकन’ विमानं मध्यपुर्वेत जाण्यापुर्वीचं स्टेशन चालवण्यासाठी डिझेल इंजिनीअर म्हणून ‘आफ्रिकेत’ रवाना झाला.
दुसरं महायुद्ध तर संपलं आणि जोसेफचं कामंही पण आता त्याच्या पाठीशी मोठा अनुभव गोळा झाला होता. त्याला वेल्डिंगचं तंत्र आणि मंत्र अवगत झालं होतं तो पुनश्च एकवार कृषी साहित्य निर्मितीत उतरला.त्यानं एक जुनं गॅरेज साप्ताहिक ३० शिलींग भाडेतत्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.
‘आपलं कुटूंब आहे अन् आपल्याकडे पैसे नाहीत’ या एकाच विचारानं जोसेफ अहोरात्र मेहनत करू लागला. इकडं युद्धपश्चात शेतीचं थोडं आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत होतं..
कृषी साहित्यानंतर जोसेफनंही हायड्रोलिक्स संयंत्राचं उत्पादन सुरू केलं आणि हाच त्याच्या व्यवसायात ‘टर्निंग पाॅईंट’ ठरला. १९५३ साली जोसेफच्या कंपनीनं पहिलं उत्खनन यंत्र बाजारात आणलं जे ट्रॅक्टर वर बसवलं होतं पण हा ट्रॅक्टर १८० अंशात वळू शकेल अशी योजना केली.
१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला.
कुठल्याही कंपनीचं यश त्यांच्या उत्पादनाच्या दर्जावर आणि मार्केटींगच्या कौशल्यावर अवलंबून असतं आपण भारतीय कुठंतरी एका ठिकाणी मार खातो पण जोसेफ वक्तिश: या दोन्ही ठिकाणी शब्दश: बॉस होता. त्याचं अभियांत्रिकी कौशल्य आणि समस्या दूर करण्याची जिद्द यांचा संगम त्याच्या या व्यवसायाला प्रचंड पुरक ठरला.
जोसेफचं एक सोपं तत्व होतं ‘सिम्प्लिकेट डोन्ट काॅम्प्लिकेट’ जे त्यानं आयुष्यभर पाळलं..
आपल्या ‘मोडेल पण वाकणार नाही’ या मराठी बाण्याला हे अतिशयोक्ती वाटेल पण अभियांत्रिकी कौशल्यांच्या पलिकडं जात जोसेफनं जेसीबी ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये किटलीचीही योजना केली अन् पहिल्या १०० जेसीबींची डिलिव्हरी स्वत: पर्सनली दिली..
ज्या जेसीबीमुळं इकडंतिकडं नोकरी करणारा जोसेफ रोल्स रॉईसमध्ये बसला होता त्या जेसीबीशी तो स्वत: नेहमीच कृतज्ञ राहिला.. त्यानं त्याच्या रोल्स रॉईसच्या नंबर प्लेटवरही जेसीबी चितारला होता.
परदेशी ग्राहकांना भेटण्यासाठी जोसेफनं खाजगी विमान विकत घेतलं ज्यात तो नेहमी ठराविक आसनावरच बसत असे. जोसेफनं अत्यंत उच्च दर्जाचा पारितोषिक विजेता कारखाना तयार केला होता. एकदा तर अगदी फॅशन शो प्रमाणे जेसीबीचा ‘रॅम्प वाॅक’ असलेला ‘डान्सिंग डिगर्स’ नावाचा शो त्यानं आयोजित केला होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत सुक्ष्म मार्केटिंग कौशल्य आणि इंजिनीअरिंगवरचं प्रेम दडलं होतं. जोसेफनं ‘मोक्कार’ मार्केटिंग करत ‘चिक्कार’ पैसा छापला पण काही मुलभूत तत्व कधी सोडली नाहीत.
त्यानं कुणाची लाच घेतली नाही अन् दिलीही नाही किंबहुना व्यवसायातून आलेला फायदा उत्पादन अजून दर्जेदार कसं होईल यासाठीच वापरत संशोधनावर खर्च करण्यावर भर दिला.
त्यानं आपल्या व्यवसायाची जागा पहिल्या दिवसापासून निकोप ठेवण्यावर मेहनत घेतली..
आपल्या कर्मचारी वर्गाशी बोलतांना तो नेहमी एक गोष्ट सांगत असे,”स्पर्धेची एक समस्या असते ती लवकर उठायला अन् लवकर झोपायला भाग पाडते.” जोसेफच्या कंपनीनं ४५०० लोकांना रोजगार दिला आणि जवळपास बारा कारखान्यांतून सुमारे तीस हजार यंत्र ते तीन खंडांना पुरवू लागले..
या कंपनीनं जगभरातल्या १४० देशात ८५० मिलियन $ इतकी उलाढाल केली.
जोसेफ वयाच्या ७५व्या वर्षी औपचारिकपणं निवृत्त झाला तरी जबाबदारी मुलाच्या खांद्यावर सोडत तो थेट स्वित्झर्लंडला निघून गेला आणि याट्चचं डिझाईन आणि जमिनीच्या संरचनेवर अभ्यास करू लागला. त्याचं प्राणप्रिय इंजिनीअरींग त्यानं शेवटपर्यंत सोडलं नाही..
जोसेफ सिरिल बमफोर्ड यांचे निधन १ मार्च २००१ लंडन येथे झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply