जन्म. १० एप्रिल १८४७ हंगेरी येथे.
पुलित्झर हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. जोसेफ पुलित्झर यांचे नाव पत्रकारितेच्या जगात मोठ्या आदराने घेतले जाते. १८६४ मध्ये जेव्हा ते हंगेरीहून अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे ना पैसा होता, ना ओळख आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना इंग्रजी बोलणे देखील जमत नव्हते. त्यांनी एकेकाळी वेटर म्हणून काम केले होते.
यानंतर त्यांना अमेरिकेतील सेंट लुईस येथील जर्मन भाषेतील वृत्तपत्रात नोकरी मिळाली. वर्षभरातच ते पत्रकारावरून व्यवस्थापकीय संपादक बनले.१८७८ मध्ये त्यांनी सेंट लुई पोस्ट डिस्पॅच आणि पाच वर्षांनंतर न्यूयॉर्क वर्ल्ड वृत्तपत्र सुरू केले. ही दोन्ही वृत्तपत्रे उत्कृष्ट पत्रकारितेची उदाहरणे मानली गेली.
जोसेफ पुलित्झर हे डेमोक्रॅटिक पक्षाचाही प्रमुख चेहरा राहिले होते. न्यूयॉर्क मधून निवडणूक जिंकून ते अमेरिकन काँग्रेसमध्येही पोहोचले. एकेकाळी त्यांनी अमेरिकेतील बडे उद्योगपती आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली होती.जोसेफ पुलित्झर यांनी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जिवंत ठेवण्यास मदत केली. त्यांनी आपल्या कमाईतून एक दशलक्ष डॉलर्स स्कूल ऑफ जर्नलिझमसाठी कोलंबिया विद्यापीठाला दिले. १९१७ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने पुलित्झर पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो.
पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात.
२०१७ मध्ये, ही बक्षीस रक्कम $ 10,000 होती. सार्वजनिक सेवा श्रेणीतील विजेत्याला सुवर्णपदक दिले जाते. जोसेफ पुलित्झर यांच्या इच्छेमुळे पुरस्कार सुरू करण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात हा पुरस्कार सुरू करण्यास लिहिले होते.
पुलित्झर यांचे २९ ऑक्टोबर १९११ रोजी निधन झाले.
Leave a Reply