तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील एक अध्यात्मिक संत अहमदी देखील होते. तैमूरलंगाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती समजली होती. सर्व गुलामांना एकत्र केल्यानंतर तैमूरलंगाने त्यातील दोन गुलामांना बाहेर काढले व अहमदीजवळ येऊन तो त्यांना म्हणाला, सांगा या दोन गुलामांची किंमत किती असेल.
अहमदीने त्या दोन गुलामांकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, हे गुलाम समंजस वाटतात त्यामुळे त्यांची किंमत पाच हजार मोहराहून कमी असू शकत नाही. त्यांचे उत्तर ऐकून तैमूर लंगाला अहमदी यांची थट्टा करण्याची इच्छा झाली. तो त्यांना म्हणाला बरं, आता सांगा की, माझी किंमत किती असेल? त्यावर अहमदी चटकन म्हणाले, फक्त दोन मोहरा. त्याचे उत्तर ऐकून तेमूरलंग खूप संतापला. तो अहमदी यांच्या अंगावर धावून ओरडत म्हणाला, तू माझा अपमान करतोस? माझ्याजवळ असलेल्या दस्तीचीच (रुमाल) किंमत दोन मोहरा आहे. त्यावर अहमदी म्हणाले, मी त्या दस्तीचीच किंमत सांगितली. तुझ्यासारख्या अत्याचारी सरदाराची किंमत तर केवडीचीही नाही. त्यानंतर अहमदी यांनी तैमूरलंगाने केलेल्या अत्याचारांची सर्व गुलामांसमोर जंत्रीच सादर केली. सर्व गुलामांना वाटले आता अहमदी यांना तैमूरलंग ठार मारणार.
मात्र अहमदी यांच्या सत्य वाणीने तेमूरलंगाची विवेकबुद्धी जागी झाली व त्याने अहमदी यांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता केली.
Leave a Reply