नवीन लेखन...

‘जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

आता प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ लागल्या आहेत, तशी गेले दोन वर्षांचं ऑनलाईन शाळांचं रूटीन सर्रकन डोळ्यांसमोरून गेलं. या ऑनलाईन शाळा सुरू झाल्या होत्या, तेव्हा सर्वांच्याच नाकी नऊ आले होते, आम्हीही त्यातलेच एक! ज्यांना दोन मुलं आहेत, साधारणपणे त्यांच्यासारखीच, तरीही (मी नेहमी म्हणते त्याप्रमाणेच) थोडी जास्त अवघड परिस्थिती आमची, जुळ्या मुलांच्या पालकांची अशी असते की, थोड्या फार समजुतीची, किंवा आम्हाला सहकार्य मिळण्याची अपेक्षा एकाही मुलाकडून करता येत नाही. आणि एकाच वेळी दोघांनाही तेवढयाच attentionची गरज असते!

तर आम्हाला जुळ्या मुली आहेत. सर्व पालकांप्रमाणेच आमचंही नियोजन सुरू झालं. प्रश्न पहिला – क्लासेस अटेंड कसे, कशावर करायचे? कामांमुळे आमचे दोघांचेही फोन दोन तास बाजूला ठेवता येण्यासारखे नव्हते. त्यामुळे आम्ही आमचा घरचा लॅपटॉप एकीसाठी ठेवला आणि दुसरीसाठी ‘टॅबलेट’ मागवला. कारण दोघी सिनियर केजीत असल्या तरी शाळेने दोघींना वेगळ्या तुकडीत बसवलं होतं. शाळेत ठीक आहे, इथे? इथे दुसरा प्रश्न – बाबा आणि मुली यांना एकमेकांच्या आवाजाचा त्रास होणार नाही, असं बसवायचं. कसं? आमच्या बाबाचं ऑफिसचं बस्तान आधीच एका खोलीत बसवलेलं होतं. त्यामुळे दोघींपैकी एक एका खोलीत, आणि दुसरी बाहेर हॉलमध्ये. म्हणजे स्वयंपाक घरातून मला दोघींवर समान लक्ष ठेवता येतं. एकीला माझ्याबरोबर स्वयंपाकघरात बसवलं तर दुसरीच्या वर्गात काय चालू आहे ते ऐकू येत नाही.

पुढे तिसरा प्रश्न – घरकामांसकट (कामवाली नसताना) मुलींचं आवरायचं कसं? याला प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा, या मुलींच्या जन्मानंतर आम्ही दोघे टीमवर्कमध्ये असे एक्सपर्ट झालो आहोत नं, की आयत्यावेळी पाहुणे येवोत, प्रवासाची तयारी किंवा बाहेर जायचं असो, आम्ही पटापट कामं वाटून घेत रेडी होतो! तर मग मुलींचं प्राथमिक आवरण्याची जबाबदारी बाबावर सोपवून तोपर्यंत मी त्यांच्या खोल्या आवरून घेत असे. मग मी दूधं, वेण्या (हं.. आम्हाला रापुंझेलसारखे लांब केस हवेत) आवरेपर्यंत बाबा त्याचं आवरून दोघींना zoomवर लॉग इन करून देणार. मग एकदाच्या दोघी आपापल्या वर्गाला बसल्या, की नाश्ता करून आम्ही आपापल्या कामांच्या मागे जायला तयार! तसं यांच्या शाळांकडे लक्ष द्यायचं असल्यामुळे, माझे दोन्ही कान दोन खोल्यांमध्ये चिकटवून मी स्वयंपाकाचा फडशा पाडत असे. तर अशी ही वर लिहीलेली दिनचर्या ही अगदी क्वचित जेव्हा सगळं आमच्या मनासारखं होतं तेव्हा अशींच्या अशी घडते बरं! नाही तर आंघोळ करुन कपडे घातल्यानंतरच नेमकी शी होते! दूध पिताना सांडलंच जातं, अमुक कपड्यांवर तमुक हेअर स्टाईल केली तर स्क्रीनवर म्हणे चेहरा क्यूट दिसत नाही! तिच्या दोन आणि हिची एकच वेणी घालून दिली, आज शाळेत बसायचा मूडच नाहीये, दुसरीचा टॅबलेट चार्जच केलेला नाही! आज उठल्यापासून आईने तिलाच जवळ घेतलं, हिला नाही घेतलं; रोज सकाळी बाबाच ब्रश करून देतो, आज आईच हवी आहे; हिचा लॉग इन तिला; तिचा पासवर्ड हिला; हिच्या वर्गात कधीतरी चुकून तीसुद्धा..! तिच्या बॅगेत हिची पेन्सिल पुस्तकं, आणि सापडत नाहीत म्हणून ही रडून रडून आम्हाला रडवून हैराण!! यातलं आणि यासारखं काहीही रोजच्यारोज घडतच असतं. आणि हे सगळं करून त्यांना तिथे बसवून दिलं की आमचं एकमेकांवर आरोपसत्र सुरू! मी कसं अजून लौकर उठून आवरलं पाहिजे, त्याने कसं घरकामात अजून लक्ष घातलं पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी आपण खरंतर अजून काय काय नीट केलं पाहिजे, वगैरे वगैरे..

तर सांगायचं मुद्दा असा की, कितीही नीट प्लॅन केलं तरी दोघींपैकी कुणीकडून emergency mode ऑन होईल, याचं पूर्वनियोजन करता येऊच शकत नाही. आणि त्यामुळेच पालकांच्या पेशन्सची सुमार परिक्षा इथे होते. त्यात आमच्या पिढीला मुलांच्या कलाकलांनी घ्यायचं असतं.. आज आवाज वाढवल्यावर, हात उगारल्यावर, उद्या आमच्या नात्यामध्ये किंवा अगदी त्यांच्याच वागणुकीतून दिसेल असा परिणाम आम्हाला नको असतो. जुळ्यांमध्ये ही दखल घ्यावी लागते की, काल मी ज्या स्वरात/शब्दांत त्यांच्याशी बोलले असेन, त्याचं (in fact त्यांनी शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचं पहिलं प्रात्यक्षिक) प्रात्यक्षिक आज त्या एकमेकींवर करताना दिसतात! त्यामुळे मारणं सवाला बाहेरच जातं!

करता करता गेलं वर्ष सरलं, आणि यावर्षी दोघींची इयत्ता पहिली सुरू झाली. ऑनलाईन शाळेचे तास, अभ्यासक्रम आणि गृहपाठही वाढलाय. सर्व मुलांप्रमाणे यांनाही या प्रकारच्या शाळेची छान सवय झाली आहे. जिथे एकट्या वाढणाऱ्या मुलाला एकटं घरी राहायचा त्रास व्हायचा, तिथे यांना अगदी आपल्याला हवा तसा खेळगडी कायम घरात मिळत होता. याचा जेवढा सद्ध्या फायदा वाटतो आहे, तेवढंच ते आम्हाला नंतर जड जाणार आहे, पुढच्या सदरात बोलेनच मी याविषयी.

जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. उदा. अगदी दहा दहा वर्षांची मुलंसुद्धा आई पाहुण्यांशी बोलत असताना मधेच येऊन, “आई, पाणी दे, आई टॉवेल दे” करतात, त्याचा संताप येतो मला! असो, निदान आमच्या केसमध्ये पालकत्वाचा, सगळी कामेच फक्त दिवस-रात्र करत बसण्याचा ताण पडू नये म्हणून म्हणा, किंवा त्यांच्या त्या त्या वयाप्रमाणे गोष्टी अंगवळणी पाडायच्या या विचाराचे आम्ही दोघेही असल्यामुळे आम्ही दोघींची क्षमता बघून त्यांना स्वतंत्र बनवू लागलो. यात थोडं श्रेय माझ्याकडे घेईन की, चुका झाल्या तरी जमेल तसं त्यांना आपापलं करू देणं, त्यासाठी पुरेसा वेळ देणं, माझी पद्धत न लादता, त्यांच्या पद्धतीने, आवडीने त्यांना कामं करू देणं, आणि पसारा, त्रास, वैताग झालाच तरी तो सोडविण्याची पद्धतसुद्धा शांतपणे दाखवणं, समजावून देणं, हे अगदी या दीड दोन वर्षांच्या असल्यापासून करायचे. त्यामुळे आता लॉग-इन लॉग-आऊट, किंवा mute unmute करणे एवढंच नाही तर, स्वतःचं वेळापत्रक बनवून, आपापल्या वर्गाची आवश्यक ती तयारी ठेवणे, गृहपाठाचे फोटो काढून classroom वर अपलोड करणे, मधल्या ऍक्टिव्हिटीज् साठी लागेल ती तयारी करणे, हे ही हळूहळू त्यांना स्वतःचं स्वतः करायला शिकवलं. प्रत्येक वर्गाला त्यांच्या शेजारी बसून त्यांना जमेल की नाही, हा अविश्वास न बाळगता, “तुला छानच जमतंय की!” किंवा एखाद दिवशी लिहून घ्यायच्या राहिलेल्या गोष्टीबद्दल न बोलता, दुसऱ्या दिवशी “वा! सगळं कसं न विसरता लिहून घेतेय तू!” अशा बोलण्याचा छान उपयोग झाला, होतोय. माझं संपूर्ण लक्ष, कान तर त्यांच्याकडेच असतात; पण त्या जातीनं सगळं आपापलं manage करतात, करू शकतात, हा विश्वास मी त्यांच्यावर दाखवला की त्याही न जमणाऱ्या गोष्टींमध्येही रस घेऊन जबाबदारीने कामं करू लागतात. वर्ग चालू असताना कॉम्प्युटरशी खेळ थोडा तरी होणारंच, मुलांनी त्या स्क्रीनमधल्या टीचरकडे पूर्णवेळ लक्षपूर्वक बघावं, ऐकावं, ही अपेक्षाच चुकीची आहे! आणि आपलं मूल तसं करत असेल, तर मग ती खरंच खूप गंभीर बाब आहे! त्यामुळे त्यांचं वय, कुतूहल, मानसिकता, यांचा विचार केला, तर हसत खेळत जेवढं डोक्यात शिरतंय, त्यापलिकडे यांच्याकडून आत्ताच perfectionची अपेक्षा धरणं उचित नाही, असं मी मानते आणि त्या प्रकारे त्यांना वागू देते.

या मुलींच्या पालकत्वाची पहिली दोन वर्षे त्यांचं खाणं-पिणं, झोप, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झालीच पाहिजे हा माझा आग्रह असायचा, पण पुढच्या काही वर्षांमध्ये फोकस त्यावरचा बदलून त्यांचा संवाद, परिसर ज्ञान, स्वतंत्र आणि सह शिक्षणावर; आणि आता जशी पायाभरणी झाली आहे, तशी सभोवतालचा आनंद घेत शिक्षण, विकसन व्हावं, अशा दृष्टीने सुरू आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी चालू झालेला, आमचा हा जुळ्यांच्या पालकत्वाचा प्रवास मी या मालिकेद्वारे तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. तुमच्याही ओळखीत असे पालक असतील, तुम्ही स्वतः यापैकी असाल तर, तुमचा अनुभव, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला निश्चित आवडतील. भेटूया मग… प्रत्येक…

— प्रज्ञा वझे घारपुरे.

1 Comment on ‘जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..