ज्येष्ठ गोमंतकीय कलासमीक्षक, चित्रकार, नाटककार व साहित्यिक गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२० गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरूल येथे झाला.
गोपालकृष्ण भोबे यांना संगीताची फार आवड होती, परंतु घरची परिस्थिती अशा कलेला प्रोत्साहन देण्यासारखी नव्हती. एकत्रित कुटुंबाचे एक पारंपरिक भुसारी दुकान आणि छोटीशी बगायती होती. गोपालकृष्ण भोबे यांना संगीत, नाटक आणि चित्रकला यांची मनापासून आवड होती.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भोबेंनी आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत चार इयत्ता मराठी आणि चार इयत्ता पोर्तुगीज शिक्षण घेतले आणि १९४३ साली वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मुंबईला गेले. गोपालकृष्ण भोबे यांची तेथेच त्यांची संगीतसमीक्षक, चित्रकार, साहित्यिक म्हणून कारकीर्द बहरली.मुंबईत गेल्या गेल्या आरंभी नाटकाचे पडदे रंगविणे, चित्रकलेच्या विविध अंगांचा अभ्यास करणे, नाटकांत कामे करणे अशा काही गोष्टींमध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. नंतर त्यांना ‘नवयुग’या हिंदी नियतकालिकेत चित्रकार म्हणून काम मिळाले. याच काळात त्यांची ओळख सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांच्याशी झाली. आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या भोबे यांनी आपले सर्व लक्ष लिखाणावर केंद्रित केले. १९५८ साला पासून त्यांनी चित्रकला, संगीत या कलाविषयांवर समीक्षणात्मक लेखन करण्यास आरंभ केला. अनेक नियतकालिकांतील चित्रे काढण्याचे आणि समीक्षा लेखनाचे काम त्यांना मिळू लागले. शणै गोंयबाब यांच्या ‘आल्बुर्केकान गोंय कशें जिखलें?’ आणि बाकीबाब बोरकर यांच्या ‘पांयजणा’ या त्यांच्या प्रथम कोंकणी कवितासंग्रहाचे मुखपृष्ठावरील चित्र भोबे यांचे आहे.
मुंबई आकाशवाणीवर त्यांचे गाण्याचे खास कार्यक्रमही होऊ लागले. आकाशवाणीवर श्रुतिका, सांगीतिका, नाटके आणि भाषणे देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. त्यांचा सर्व कलाक्षेत्रांतील हा वावर बघून त्यांना मुंबई आकाशवाणीवर ‘सर्वपल्ली गोपालकृष्णन’ अशा नावाने कौतुकाने हाक मारत. संपूर्ण महाराष्ट्रात संगीत विषयाचे मर्मज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले.
‘चतुरंग रेखा’-१९६१ (गोमंतक मराठी साहित्यसंमेलन सुवर्णपदक), ‘आलाप’- १९६३, ‘असा आहे माझा गोमंतक’- १९६४, ‘पक्षी जीवन’ (अनुवाद) १९६५, ‘नाद’- १९६६, ‘मासे आणि मी’- १९६६, ‘धन्य ते गायनी कळा’- १९६९, ‘कलात्म गोमंतक’- १९७२, ‘सात स्वरश्री’, ‘शापीत गंधर्व’ आणि ‘भारताचे भाग्य विधाते’ अशी एकूण अकरा पुस्तके त्यांनी लिहिली.
संगीतसम्राट तानसेनच्या जीवनावर आधारित ‘धन्य ते गायनी कळा’हे संगीतप्रधान नाटक लिहून त्यांनी नाट्यलेखनात प्रवेश केला. गोमंतकातील जांबावलीच्या संस्थानातील श्रीदामोदर हे त्यांचे कुलदैवत. याच स्थानावर जाऊन हे नाटक लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. हे नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची संहिता घेऊन कुलदेव श्रीदामोदराच्या चरणाकडे ठेवण्यासाठी ते गेले असता तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व १३ फेब्रुवारी १९६८ रोजी निधन झाले.
त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने परेश वासुदेव प्रभू यांनी लिहिलेला ‘गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य’ हा चारशेहून अधिक पानांचा ग्रंथ गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीतर्फे केला आहे.
सखाराम शेणवी बोरकर
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply