(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री श्यामसुंदर पाटील यांनी लिहिलेला लेख)
विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात.
ज्येष्ठांची महती व कर्तव्य सांगणारा एक श्लोक –
न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
न ते वृद्धा येन वदन्ति धर्मम्।
नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत् सत्यं यच्छलेनाभ्युपेतम्॥
(जेथे वृद्ध (ज्येष्ठ) लोक नाहीत, ती सभा नव्हे
जे धर्माला (नीती) अनुसरून बोलत नाहीत ते वृद्ध नव्हेत
ज्यात सत्य नाही तो धर्मच नव्हे
जे कपटाने भरले आहे ते सत्य नव्हे)
महाभारतातील सभापर्वातीस द्रौपदी वस्त्रहरण, प्रसंगी दुतात पराभूत होऊन कौरवांचा दास झालेल्या युधिष्ठिराला आपणास पणाला लावण्याचा अधिकार नाही असे सांगत त्या प्रसंगी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य व उपस्थितांसमोर आपली बाजू मांडताना द्रौपदीने केलेला हा युक्तीवाद.
वास्तविक सृष्टीतील इतर सर्व प्राणी एकएकटे जगू शकतात. माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो इतरांच्या मदतीशिवाय जगूच शकत नाही. म्हणून समाजशास्त्रज्ञ Man is a Social animal माणूस हा सामाजिक प्राणी आहे असे म्हणतात. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणारी भारतातील सर्वात मोठी अशासकीय संस्था (एनजीओ) आहे. सुमारे पाच हजार ज्येष्ठ नागरिक संघ संस्थेशी संलग्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण व आत्मसन्मानाचे असावे. त्याचवेळी ज्येष्ठांचा प्रदीर्घ अनुभव व ज्ञान याचा समाजासाठी उपयोग व्हावा यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मुख्य समस्या शारीरिक आणि मानसिक व्याधी, अपुरा पोषण आहार, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधोपचाराची उपलब्धता, कुटुंबात मिळणारा आदर, परावलंबित्व आणि एकटेपणा याच्याशी निगडित आहे. 2011 च्या शिरगणती नुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या देशात दहा कोटीहून अधिक आहे. ज्येष्ठांचे सरासरी आयुर्मान आज बहात्तर (72) वर्ष आहे. (1947 साली ते 42 वर्ष होते). विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात. येथे ही गोष्ट लक्षात घेणे गगरजेचे आहे की, फक्त 9 टक्के ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन मिळते व 91 टक्के ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही.
सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांची परवड होऊ नये याकरिता शासनाने केंद्रीय व राज्य पातळीवर अनेक कायदे केले आहेत. परंतु जाचक अटी, अव्यवहार्य व कालबाह्य निकष यामुळे अनेक गरीब ज्येष्ठ नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच मिळणारी रक्कम (आर्थिक सहाय्य) तुटपुंजी आहे.
आईवडील आणि ज्येष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 व नियम 2014 हा कायदा निर्माण करण्यात आला. अत्यंत प्रभावी, परिणामकारक व ज्येष्ठांना उपयुक्त असा हा कायदा आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी प्रभावी प्रशासनिक यंत्रणा शासनाने उभी केलेली नाही. त्यामुळे या कायद्याचे दृश्य परिणाम दिसत नाहीत.
महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 30 सप्टेंबर 2013 रोजी जाहीर केले. यात रुग्णालये, मानसिक आरोग्य केंद्रे, विरंगुळा केंद्र, वृद्धाश्रम, रुग्णवाहिका, ज्येष्ठांना निःशुल्क व सवलतीत उपचार आदी बाबींचा विचार करण्यात आला आहे. मुख्य अडचण अशी आहे हे धोरण ‘अखर्चिक असून’ सर्व सुविधा/व्यवस्था स्वयंसेवी संस्था व खासगी उद्योग अस्थापना यांनी निर्माण करावी असे सांगून त्यांना तसे आवाहन करण्यात आले आहे. स्वाभाविकच त्यास कोणताही प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)ने वेळोवेळी अनेकदा संबंधित मंत्री, मुख्यमंत्री/अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून ज्येष्ठ नागरिक धोरणासंदर्भात निवेदने दिली आहेत. शासनाने सर्व तरतुदींसाठी आपल्या वार्षिक बजेटमध्ये आर्थिक बाबींचा समावेश करणे गरजेचे आहे.
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला श्री श्यामसुंदर पाटील यांनी लिहिलेला लेख)
– श्यामसुंदर पाटील
Leave a Reply