“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.”
रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते.
“होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान पटवून दिले होते.”
“काका अशीच एक त्यांची मुलाखत सरकारने जो ज्येष्ठांसाठी कायदा केला आहे त्याबाबत घ्यायची आहे आणि ते काम तुमच्याखेरीच कोण करणार? आपला ज्येष्ठांचा विशेषांक पुढच्या महिन्यात येतो आहे, आहे ना लक्षात?”
“साहेब मी आता सत्तरी ओलांडून पंचाहत्तरीत पोचलो. आपण विशेषांक सम्राट झालात. मी मात्र वार्ताहर एके वार्ताहर राहिलो. मला काही ज्येष्ठांच्या सुविधा मिळणार आहेत की नाहीत? तुमचे आपले ही मुलाखत संपते न संपते तोच दुसरी, ती संपते न संपते तोच तिसरी असे आपले चालूच असते. आपल्या रोजची पहाटच्या ज्येष्ठांना कधी ज्येष्ठांच्या सवलतीचा सूर्य बघायला मिळणार आहे की नाही?”
“काका तुमचेच काय मी पण आता पंचाहत्तरी पार करून ऐंशीच्या घरात जातोय अहो हे ज्येष्ठ वगैरेचे खूळ आपल्याला परवडण्यासारखे नाही. म्हणूनच सरकारने ज्येष्ठांसाठी तरतूद केली आहे का नाही ते पाहायचे यासाठी तर तुम्हाला ही मुलाखत घ्यायला पाठवत आहे. त्यातून तुमचा झाला तर काही फायदाच होईल.”
“हो ते पण खरंच. परस्पर आपले हलवायच्या घरावर तुळशीपत्र! हा सरकारी कायदा येण्यापूर्वी आणि उद्याची पहाट उगवण्यापूर्वीच आम्ही झोपलो नाही म्हणजे झाले!”
“काका काय भलते सलते बोलता? अहो आजपर्यंत तुम्हीच नाही का रोजची पहाट मधून झोपवलेत कित्येकांना? आणि आता स्वत:च झोपायच्या गोष्टी करता? जाऊद्या, सरकार जे काय करायचे ते करील पण मी मात्र ठरवले आहे की रोजची पहाट मधल्या ज्येष्ठांना महिन्यातून कमीत कमी एक दिवस तरी सुटी द्यायचीच!”
“साहेब आपल्या कर्मचाऱ्यांना तर महिन्याचे सगळे रविवार किंवा त्या बदल्यात इतर कोणताही वार अशी चार पाच दिवस सुटी मिळतेच. त्यात ज्येष्ठही येतात. मग त्यांची सुटी कमी करणार की काय?”
“हो काका. हे ज्येष्ठ घरातल्या लोकांना नको असतात, म्हणून त्यांनी कामावरच जास्त वेळ घालवावा असे आमचे मत आहे. शिवाय तरुणांना बायकापोरांना घेऊन हिंडावेफिरावे असे वाटते. त्यामुळे त्यांना कामावर आल्यावर उत्साह वाटतो. ज्येष्ठांचे तसे नसते. गुडघेदुखी, संधिवात, दमा, खोकला घेऊन ते कुठे जाणार?”
“साहेब, सरकारने ज्येष्ठांच्या कायद्यासाठी जी सल्लागार समिती नेमली होती त्यात आपण नव्हता हे आमचे भाग्यच म्हणायचे!”
“काका, तुम्हाला काय सुचवायचे आहे?”
“साहेब, ज्येष्ठांना जर आपणच ही अशी नकोशी जमात मानत असाल तर आणखी काय म्हणणार?”
“काका, हा जगाचा आणि निसर्गाचा न्यायच आहे. जुने जाऊ द्या मरणालागुनि, त्याशिवाय नव्यांना वाव कसा मिळायचा?”
“साहेब हे आपल्यालाही लागू नाही का होत?”
“काका, नियमाला अपवाद असतात. बरं आता हा वाद पुरे. तुम्ही उद्या त्या खुशालरावांची मुलाखत घ्या. सरकारने कायद्यांत काय तरतूद केली आहे पाहा. शेवटी सरकारी कायद्याचे पालन आपल्याला करायला हवे. हो ना?”
“हो साहेब. खरे आहे.”
दुसऱ्या दिवशी सकाळी-ठीक आठ वाजता काका खुशालरावांच्या बंगल्यावर -सिंधुगर्जनावर पोचले. साहेबांच्या पी.ए.नी., काका कावळेंनी त्यांचे स्वागत कले.
“या या काका बसा. साहेब येतीलच आता.”
तेवढ्यात कायदेमंत्री खुशालरावजी चिंधडे येतात.
“नमस्कार काका. आमची अंधश्रद्धा कायद्याची मुलाखत रोजची पहाटने फार झकास छापली!”
“साहेब ते तर सगळे आपलेच श्रेय. इतक्या किचकट कायद्याची आपण फार सुंदर फोड करून सांगितलीत. विशेषतः हा कायदा श्रद्धावाले आणि निमूर्लनवाले या दोघांनाही कशी समान वागणूक देतो हे आपण अत्यंत समर्पकपणे थोडक्यात समजावलेत. असो आज मी ज्येष्ठांसाठी सरकारने जो नवा कायदा केला त्याबद्दल आपली मुलाखत घ्यायला आलो आहे. काय आहे हा कायदा? तो कधीपासून अंमलात येणार आहे?”
“काका, हा कायदा त्वरित अंमलात आणला जाणार आहे. आता ज्येष्ठांचा कायदा याबद्दल सांगतो. काका खरे तर हा ज्येष्ठ शब्द किंवा त्या शब्दाने सूचित होणारी मंडळी हे आपल्याला काही नवीन नाही. सगळा घोळ झाला तो या ज्येष्ठ शब्दाची तुलना आपण सिनियर सिटिझन या शब्दाबरोबर करतो त्याचा.”
“घोळ? तो काय?”
“काका हे ज्येष्ठांचे खूळ आपल्याकडे या सिनियर सिटिझन शब्दाने पसरवले आहे.”
“खूळ?”
“अहो खूळ नाहीतर काय? आपल्या पुरातन श्रेष्ठ संस्कृतीमध्ये ज्येष्ठ, वडील हे पूजनीय, वंदनीय नाहीत का? ते आपल्याला नव्याने कशाला शिकायला पायजेल आहे. पूर्वी नव्हता कधी हा ज्येष्ठांचा प्रश्न! माणसं म्हातारी होत होती. त्यांची जबाबदारी त्यांच्या घरची मंडळी घेत होती. तो त्यांचा घरगुती मामला होता. पण हे साहेबाचे सिनियर सिटिझनचे खूळ आले आणि आपली ही पांढरी कॉलरवाली म्हातारी मंडळी खुळावली. आपणही त्या गोऱ्या साहेबाच्या नसत्या भानगडी उरावर घ्यायला लागलो आहोत. त्याला ही आमची मंत्रालयातली सचिव मंडळी जबाबदार आहेत.”
“ती कशी?”
“काका, ही बहुतेक मंडळी निवृत्तीला आलेली असतात. या ना त्या कारणाने कायम परदेश दौऱ्यावर जायची संधी शोधत असतात. मग आपल्या निवृत्तीनंतर आपल्याला काय सुविधा मिळणार याचाच कामाऐवजी विचार करत बसतात. त्यातूनच मग हे सिनिअर सिटिझनचे खूळ निर्माण झाले आहे. नसत्या भानगडी करत असतात.”
“नसत्या भानगडी? म्हणजे?”
“काका आपली संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती यात फार फरक आहे. त्यांच्याकडे मुलं वयात आली की घरातून बाहेर पडतात. आपापल्या पायावर उभे राहतात. मुलं आणि आईवडीलही दोन-दोन, चार-चार लग्न करतात. घटस्फोट घेतात, मग म्हातारपणात कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. मग या सिनिअर सिटिझनांची जबाबदारी त्यांच्या सरकारावरच येऊन पडते. बरं त्यांची लोकसंख्या पण कमी. अहो रस्त्यावर एक माणूस दिसत नाही. इथं आपल्याकडे फुटपाथच काय रस्तेही माणसांनी खचाखच भरलेले असतात. गाडीत, बसमध्ये तरणाताठ्यांना उभं रहायला मिळत नाही तिथे या ज्येष्ठांना म्हणे आरक्षण ठेवा. नोकऱ्यात, शिक्षणात, प्रत्येक क्षेत्रात आरक्षण ठेवता ठेवता आमच्या नाकी नऊ येतात. त्यात हे ज्येष्ठांच्या आरक्षणाचं खूळ ! गपगुमान घरी बसावं हरी हरी करीत तर चालले गाव फुंकायला!”
“साहेब इकडे नोकरीत साठनंतर निवृत्ती घ्यावी लागते पण तिकडे राजकारणात जराजर्जर झालेले, चालताना आधार लागणारे, मान थरथरणारे म्हातारे खुशाल राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री होतात. भत्ते घेतात, पेन्शन घेतात. सगळ्या सुविधा मागतात. वर्षानुवर्षे जागा, बंगले सोडत नाहीत. वीज बिले, भाडे भरत नाहीत. जवळपास सगळ्या राज्य सरकारांच्या मंत्री मंडळाची वयाची सरासरी साठच्या पुढेच असते. हे कसे चालते? मग ज्येष्ठांनीच काय पाप केले?”
“काका राजकारण हा फार वेगळा प्रांत आहे. इथे वयाचा काही संबंध येत नाही. सगळेच देवानंद ! काका, खरं राजकारण रंगतं ते ज्येष्ठपदी पोचल्यावरच! एकदा खुर्चीची चटक लागली की ती कायमचीच!”
“समजलं साहेब. म्हणजे ज्येष्ठांच्या कायद्यातून ही मंडळी वगळली असणार असेच ना?”
“होय काका, या मंडळींना ज्येष्ठांच्या कायद्यातून वगळावे याला सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.”
“वा साहेब. निदान याबाबत तरी सगळे पक्ष एकत्र आले म्हणावयाचे!”
“होय काका, अशा सर्व प्रश्नांत आम्ही सर्व एक असतो. एकमताने निर्णय घेतो.”
“वा! फारच छान! आता आपण ज्येष्ठांच्या कायद्याकडे वळूया का?”
“हो काका, या ज्येष्ठ शब्दाची व्याख्या करताना आम्ही सिनिअर सिटिझन या पाश्चात्त्य कल्पनेला फाटा देऊन आपली पूर्वजांची वैदिक कल्पना अंमलात आणायचे ठरवले आणि आमच्या असे लक्षात आले की, आपल्या पूर्वजांनी ज्येष्ठांची समस्या ही समस्या न मानता तिला वनपद्धतीमध्ये अगदी बेमालूमपणे सामील केले होते.”
“म्हणजे वेदात पूर्वी सर्व शास्त्रे, विज्ञान, विमान, आधुनिक शोध आपण हजारो वर्षापूर्वी लावले होते असे म्हणतात तसेच का?”
“होय काका. याचा अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की आपल्याकडे एवढी समृद्ध जीवनपद्धती असताना आपण उगाचच काखेत कळसा आणि गावाला वळसा घालत बसलो आहोत.”
“वा! काय आहे ही पद्धत? आणि तिचा आधार घेऊन आपण ज्येष्ठांचा कायदा कसा तयार केलात?”
“काका आपल्या पूर्वजांनी सामाजिक जीवन पद्धती चार आश्रमात विभागली होती. प्रथम ब्रम्हचार्याश्रम हा वयाच्या सहाव्या वर्षापासून अठराव्या वर्षापर्यंत होता. या अवस्थेत विद्यार्थ्याने गुरुगृही राहून विद्यार्जन करावे असा नियम होता.त्यानंतर गृहस्थाश्रम हा वयाच्या अठराव्या वर्षापासून साठ वर्षापर्यंत होता. यात माणसाने संसार करावा अशी तरतूद होती. साठ वयानंतर पंचाहत्तर वयापर्यंत वानप्रस्थाश्रम. यात त्याने सर्वसंगत्याग करून वनात जाऊन राहायचे. कंदमुळे भक्षण करून निसर्गाच्या सान्निध्यात वानप्रस्थाश्रमाचा काल आनंदाने घालवावा. त्यानंतर संन्यासाश्रम हा तुमचे उर्वरित आयुष्य संपेपर्यंत. कालावधीत त्याने वायुभक्षण करून जपजाप्य करत ईशचिंतनात घालवून ऋषीपद प्राप्त करून घ्यावे. या उदात्त परंपरेचा आपणास विसर पडला आणि इतकी छान जीवनपद्धती सोडून आपण ही सिनिअर सिटिझनची डोकेदुखी उगाचच निर्माण केली आहे. नवीन ज्येष्ठांचा कायदा करताना आम्ही ही प्राचीन जीवनपद्धती पुनरुज्जीवित करून भारताची उज्वल परंपरा पुढे नेणार आहोत.”
“ती कशी?”
“काका वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येकाने वानप्रस्थाश्रमास जावे असा कायदा केला आहे. त्यासाठी निरनिराळ्या अभयारण्यात आम्ही मोठमोठ्या पर्णकुट्या, एकावेळी हजार वृद्ध राहू शकतील अशा बांधणार आहोत. तिथे त्यांना वल्कले आणि कंदमुळे मिळतील. वानप्रस्थाश्रमात त्यांनी ईशचिंतानात, विपश्यनेत किंवा ज्याला जसे जमेल तसे आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करावे.”
“त्यांच्या आरोग्यसेवेचे, औषधपाण्याचे काय?”
“औषधं जान्हवी तोयं. काका निसर्ग हाच एक मोठा धन्वंतरी आहे. सकाळ, संध्याकाळ सूर्योदय, सूर्यास्त, दोन वेळा नदीवर, तळ्यावर स्नान, कंदमुळे भक्षण आणि शारीरिक व्यायामासाठी आवश्यक वाटले तर कुदळ आणि फावडे मिळेल.”
“कुदळ आणि फावडे?”
“होय. माती उकरावयाची, खड्डे करायचे, ते पुन्हा भरायचे असे सतत उद्योगात रहायचे. सर्व भार परमेश्वरावर अथवा निसर्गावर, जसे ज्याला वाटेल तसे त्याने जगावे. आपल्या शरीराचे फुकट चोचले करू नयेत.”
“अहो पण साहेब, या वयात हे सारे फार कठीण वाटते. कोणीही याला तयार होईल असे वाटत नाही.”
“काका कायद्यानेच तशी तरतूद केली आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी आपले ज्येष्ठपद आपल्या हिंमतीवर सांभाळावे. तो त्यांचा घरगुती वैयक्तिक प्रश्न असेल. आम्ही जनगणना करतानाच कुटुंबातील ज्येष्ठांची गणती करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. अशा ज्येष्ठांना वानप्रस्थाश्रमाचा पास मिळेल. हा पास दाखवला की त्यांना देशातल्या कोणत्याही वानप्रस्थाश्रमात जायला, बसने, रेल्वेने, बोटीने व विमानाने फुकट प्रवास करता येईल. एकदा वानप्रस्थाश्रमात प्रवेश घेतला की त्यांना उर्वरित जगाशी संपर्क ठेवता येणार नाही. वानप्रस्थाश्रम ही कायद्याने तरतूद असली तरी ती पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. वानप्रस्थाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात परतण्याची त्यांना मुभा असेल.”
“साहेब हा कायदा म्हणजे ज्येष्ठांना सवलती तर सोडाच पण एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा नाही का वाटत?”
“काका काळे पाणी गुन्हेगारांसाठी आहे. अशांना काम द्यावे लागते, राहण्याची, खाण्यापिण्याची, वैद्यकीय सेवेची व्यवस्था करावी लागते. तो समाजात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. परंतु वानप्रस्थाश्रमी वास करणारे ज्येष्ठ हे अत्यंत मानाचे समजले जातील. वानप्रस्थाश्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना आपोआप संन्यासाश्रमाची दारे खुली होतील. ते ऋषीपद प्राप्त करू शकतील.”
“कायद्याने संन्यासाश्रमासाठी काय तरतूद केली आहे?”
“वायाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेले आणि ज्यांनी वानप्रस्थाश्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. अशानाच संन्यासाश्रमात प्रवेश मिळेल. हे संन्यासाश्रम हिमालयाच्या कुशीत, गुंफात असतील. फारच थोडे ज्येष्ठ या अवस्थेपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. एकदा संन्यासाश्रमात प्रवेश मिळाला की त्यांचे दर्शन पुन्हा होणार नाही म्हणजे जसे पूर्वी काशीयात्रेला गेलेला पुन्हा परत येण्याची शक्यता नसे तसे. ज्या कुटुंबातील व्यक्ती संन्यासाश्रमात यशस्वी पदार्पण करतील त्या कुटुंबातील लोकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते खास सत्कार करण्यात येईल. या कायद्यामुळे ज्येष्ठांची समस्या कायमची मिटून आपल्या देशात पुन्हा ती प्राचीन ऋषीमुनींची परंपरा निर्माण होईल. भारतीय संस्कृतीचा झेंडा पुन्हा दिमाखाने त्रिखंडात फडकू लागेल.’
“वा साहेब, या उज्वल परंपरेचा विचार करून यापूर्वी कुणीही ज्येष्ठांच्या समस्येकडे पाहिले नाही. हा कायदा जिथे लोकसंख्येचा प्रश्न ऐरणीवर आहे अशा देशात फारच लोकप्रिय होईल. विशेषत: आपला शेजारी आणि लोकसंख्येच्या बाबतीत आपला मोठा भाऊ शोभणारा चीन आपले अनुकरण करेल आणि हा कायदा त्यांना फार पसंत पडेल असे वाटते. जागतिक लोकसंख्यावाढीचा भस्मासूर रोखण्यातच हा कायदा विशेष योगदान देईल हे नक्की.”
“काका त्यात काहीच शंका नाही. अहो चीनचे राष्ट्राध्यक्ष खाऊ तूप हिंग यांनी तर आपल्या पंतप्रधानांकडे या कायद्याच्या मसुद्याची विचारणा केली आहे. पण काका एक समस्या उद्भवली आहे.’
“समस्या? ती काय?”
“या कायद्यामुळे किती ज्येष्ठांसाठी तरतूद करावी लागेल याचा अंदाज यावा म्हणून जनगणनेची आकडेवारी तपासली तर असे दिसून आले की फारच थोड्या कुटुंबात वयाची साठी ओलांडलेली माणसे आहेत!”
“काय सांगता?”
“हो ना. अहो जनगणनेचा तक्ता भरताना त्यात वयाच्या रकान्यात ज्यांची वये दिसायला साठ ते सत्तर वाटत होती अशा ज्येष्ठांनी आपले वय पन्नास ते पंचावन्न असे नोंदवलेले आढळले. साठीच्यावरचे वृद्ध अभावानेच आढळले.”
“मग त्यात समस्या कसली साहेब? हे तर बरेच झाले नाही का? ज्येष्ठांना सवलती देणे नको आणि त्यांची जबाबदारीही टळली.”
“अहो पण काका ज्येष्ठांची पुरेशी संख्या नसेल तर मग या वानप्रस्थाश्रमांचे प्रयोजनच काय? शिवाय यापूर्वी एवढे ज्येष्ठांचे संघ, संघटना होत्या त्यांनी एकदम टाळे लावले असे कसे झाले? सध्या कुठेही एकही ज्येष्ठ संघ, कार्यालय अस्तित्वात नाही. कायदा येण्यापूर्वी ही परीस्थिती तर कायदा आल्यावर काय होणार?”
“साहेब, याचा अर्थ सरळ आहे. यावरून हेच दिसते की आपल्या देशाच्या लोकसंख्येचे आयुर्मान वार्धक्याकडे न जाता हळूहळू तारुण्याकडे झुकणार असे दिसते. घरोघरी आता ज्येष्ठ वृद्ध मंडळी न आढळता सत्तर ऐंशी वर्षांची दिसणारी पण प्रत्यक्षात चाळीशीची तरुण मंडळी दिसू लागणार. या कायद्यामुळे हा एक मोठा चमत्कारच होणार असे वाटते.”
“हो तुम्ही म्हणता ते खरे आहे. काका तुमच्याकडे पाहता तुम्ही सत्तरी पार केल्यासारखे वाटते. तुम्ही असे करा, हे आमचे पी.ए कावळेसाहेब आहेत ना, हे तुम्हाला वयाचा मसुदा देतील. त्यात तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख भरून द्या. ते तुमचा ज्येष्ठांचा पास घरपोच पाठविण्याची व्यवस्था करतील.”
“आपला आभारी आहे साहेब. मी जरी सत्तरीचा दिसत असतो तरी अजून चाळिशी ओलांडली नाही. पण साहेब, आमचे संपादक साहेब आता पंचाहत्तरी ओलांडत आहेत. त्यांच्यासाठी फॉर्म भरून देतो. त्यांना पाठवा पास. बरं येतो साहेब, धन्यवाद!”
-विनायक रा. अत्रे
Leave a Reply