का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने
का निवडावे माझे लिहण्याचे तुमच्या म्हणण्याने॥
स्वतंत्र अाहे कधीही काही
मनात तेच घोळत राही
शब्दांस निवडून उतरत जाई
तन मन त्यात रमे ठायी ठायी
का ठरवावे माझे बोलण्याचे तुमच्या अादेशाने॥
का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने ॥
माणूस,प्राणी,वृक्षझाडीवेली
कितीक अाणिक असे भवताली
अाकाश,डोंगर मज साद घाली
या सगळ्यांचा असे कोण वाली
असते का त्यांचे झुकणे तुमच्या इशार्याने ?
का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने ॥
बुडवा,गाडा,मारा,फसवा
उसळून येती ते का बरं वा
इतिहास बघा अाज काल परवा
डोक्यात काय कुणाच्या भरवा
विसरलात का ? बंड केले होते तुक्याने ॥
का थांबवावी माझी कविता तुमच्या सांगण्याने ॥
— कौशल
१२/०९/२०१९
Leave a Reply