नवीन लेखन...

काटेपुराण…

जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो…

काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. अगदी राजघराण्यात जन्मलेला असला तरी त्याच्याही पायात काटा कधीना कधी रुतलेला असतोच. कसा ते माहित नाही. पण हे होतं. गवतावर चालताना, शेतात काम करताना काट्यांशी सामना होत असतो. शेतकऱ्याच्या पायात किती काटे टोचले असतील त्याची मोजदाद कुठेच नसते. कदाचित त्याच्या नशीबाचा ते भाग असावेत. काटेही विविध प्रकारचे असतात. काही बोचणारे असतात, काही टोचणारे असतात, काही रुतणारे असतात, काही रक्त काढणारे असतात, काही आग करणारे असतात. काट्यांचे जितके प्रकार आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याही पेक्षा अनेक प्रकारचे काटे या पृथ्वीतलावर आहेत. अगदीच गुगलवर काटा हा शब्द जरी टाकला तरी २ कोटी ८ लक्ष इतकी पानं सेकंदभरात उघडतात. त्यात काट्यांचे शास्त्रीय नाव, औषधी उपयोग, प्राचीन काळातील संदर्भ आदी सविस्तरपणे असलेली माहिती आपल्यासमोर येते.

आपल्या जीवनातही काट्याला महत्व आहेच. कसे ? खडतर ज़ीवनाचे विश्लेषण करतांना अनेकदा गुलाबाचे उदाहरण दिले जाते. काट्यांवर राहुनही गुलाबाची मोहकता सर्वांना आपलीशी करते, त्यामुळे फुलांचे राजेपण गुलाबाकडे आलेय. गुलाबाला असलेले काटे पसरट पण टोकदार असतात, टोचले की आग करतात. बाभळीचे काटे लांब असतात. टोचले की लगेच तुटतात. कॅक्टसचे काटे बारीक पण टोचणारे असतात. गव्हाच्या ओंबीला येणारे काटे केसांप्रमाणे बारीक पण तितकेच टोकदार असतात, टोचले की शरीराची आग व्हायला लागते. या सारख्या अनेक वनस्पतींचे रक्षण काटे करत आलेले आहेत. भाज्यांचा विचार केला तर भेंडीला बारीक काटे असतात, डोळ्यांनी दिसत नाहीत पण हाताला टोचतात. वांग्यांना असलेले काटे वांगे तोडतांनाच टोचतात. फणसाचे कवच काटेरीच असते पण त्याखाली आतमध्ये असतो फणासाचा गोडवा असलेला गर.

सजीव प्राण्यांचा विचार केला तर विंचवाचा काटा विषारी असतो, त्याच्या इंगळीत तो असतो. मधमाशीचा काटा शरीराची आग करायला लावतो. माशांचा काटा घशात रुतणारा असतो. साळशिंगी हा प्राणी त्याच्या शरीरावर असलेल्या काट्यांपासुनच स्वत:चे रक्षण करतो. हे झाले प्राण्यांचे. मानवी काट्यांचे काय? मानवी काटेही असतातच की. विशिष्ट प्रसंगात, भीतीदायक प्रसंगात शरीरभर उठणारा काटा वेगळा असतो. आनंदाच्या प्रसंगात हर्षभराने शरीरावर उठणारी संवेदना काटेरीच असते. हृदयात बोचणाऱ्या सलीचा काटा निराळा असतो. काव्यपंक्तीत येणाऱ्या काट्यांची दुनिया निराळीच असते. प्रेयसीच्या वाटेतील काटे वेचण्यासाठी प्रियकराची आतुरता अनेक कवींनी वर्णन केलेलीच आहे.

काटेरी गुलाब असतो, काटेरी हलवा असतो. वजनकाटाही असतोच ना. थोडक्यात काय तर आपले आयुष्य ‘काटे भरा’ प्रवास आहे. रस्त्यात पडलेले दु:खाचे काटे बाजुला सारत आपल्याला चालायचे आहे. कधी काटे बोचतीलही, मनाच्या अंतरंगात ही बोच घर करेलही… पण त्यावर मात करून पुढे चालायचे आहे. काटे आहेत म्हणुन चालणे सोडणे माणुसपणाचे लक्षण नाही. चालणे, लढणे आणि यशस्वी होणे हेच माणुसपणाचे लक्षण… वाट कितीही काटेरी असली तरीही…!

दिनेश दीक्षित, जळगाव.

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..