नवीन लेखन...

काय देवा आता पहातोसी अंत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३३)

अमरावतीला एक तरूण व्यापारी रहात होता.
त्याची दोन दुकाने होती व स्वतःचे घर होते.
त्याचं नाव होतं दिनकर शेट्ये.
तो कुरळ्या केसांचा, मोहक चेहऱ्याचा, सुदृढ, तरतरीत तरूण होता.
तो नेहमी आनंदी असे.
त्याला गाणेही आवडत असे.
तो जेव्हा विशीत होता, तेव्हां तो मद्याच्या आहारी जात असे पण लौकरच विवाह केल्यावर त्याने नेहमी मद्य घेणे वर्ज्य केले.
चैत्र महिन्यांत एका जवळच्याच गांवी देवीची जत्रा भरत असे.
त्या जत्रेत त्याने दुकान लावायचे ठरवले.
त्याने प्रवासाची सर्व तयारी केली.
दुसऱ्या दिवशी दिनकर जायला निघणार, तोंच त्याची पत्नी घाब-या घाब-या म्हणाली, “तुम्ही आज जाऊ नका.”
त्याने आश्चर्याने विचारले, “असं कां म्हणतेस ?”
ती म्हणाली, “रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. त्यांत मी तुम्हाला पाहिलं.
तुमचे सर्व केंस पांढरे झालेले होते.
तुमच्या चेहऱ्यावर सुरकूत्या दिसल्या.
तुम्ही खूपच वयस्क दिसलांत.
मला कसली तरी भीती वाटते !”
दिनकर त्यावर हंसून म्हणाला, “हा तर चांगला शकुन आहे.
बहुदा मी नेतो आहे तो सर्व माल संपून मला भरपूर नफा होईल मग वृध्दत्व येईपर्यंत आराम करायला मिळणार.
मी जत्रेतून तुझ्यासाठी छानसं काहीतरी घेऊन येईन.”
त्याने पत्नीचा निरोप घेतला व तो घोडागाडीने निघाला.
अर्ध्या वाटेत त्याला त्याच्या माहितीतला आणखी एक व्यापारी भेटला.
दोघांनी एकाच खानावळीत रात्रीचा मुक्काम केला.
दोघे रात्री जेवले व आपापल्या लागूनच असलेल्या खोलीत झोपायला गेले.
दिनकर नेहमीच्या संवयीनुसार पहाटे उठला आणि उन्हं व्हायच्या आंत जास्तीत जास्त प्रवास करावा म्हणून त्याने गाडीवानाला उठवून घोडे गाडीला जोडायला सांगितले.
लॉजच्या मालकाकडे जाऊन त्याचे एक दिवसाचे पैसे दिले व त्याने पुन्हा प्रवास सुरू केला. पंचवीस मैल अंतर कापल्यावर त्याने घोड्यांना खायला घालण्यासाठी गाडी एका धाब्यावर उभी केली.
स्वतःसाठी एक कप गरम चहा आणायला सांगून त्यांने गिटार वाजवायला सुरूवात केली.
अचानक तीन घोड्यांची एक गाडी वेगाने तिथे आली. त्यांतून एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस उतरले.
तो अधिकारी दिनकरकडेच आला व त्याला प्रश्न विचारू लागला.
त्याच नाव काय, तो कुठून आला, कुठे चाललाय, वगैरे.
दिनकरने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व तो म्हणाला, “बसा ना ! आपण चहा घेणार ?”
परंतु अधिकाऱ्याने उलट तपासणी चालूच ठेवली.
“काल रात्री कुठे होतास ? बरोबर कोण होते ? दुसरा व्यापारी आज सकाळी भेटला होता ? तू खानावळीतून इतक्या सकाळीच कां प्रवासाला निघालास ?”
दिनकरला हे प्रश्न आपल्याला विचारण्याचं कारण कळत नव्हतं व आश्चर्यही वाटत होतं.
पण त्याने खरी ती सर्व माहिती दिली.
मग त्याने विचारले, “पण मी एखादा चोर, दरोडेखोर असावा, असे प्रश्न तुम्ही मला कां विचारत आहांत ?
मी एक व्यापारी आहे आणि त्यानिमित्त प्रवास करत आहे.”
अधिकारी म्हणाला, “मी ह्या जिल्ह्याचा पोलिस अधिकारी आहे.
तू ज्या व्यापाऱ्याबरोबर रात्री जेवलास त्याचा गळा कापून खून झालेला आढळला आहे.
आम्हाला तुझ्या सामानाची झडती घ्यावी लागेल.
दोन पोलिसांनी दिनकररावांच्या गाडीतील सामानाची झडती घ्यायला सुरूवातही केली.
एका पोलिसाने एका बॅगेतून एक चाकू बाहेर काढला व ओरडून विचारले, “हा चाकू कोणाचा आहे ?”
दिनकर रक्ताचे डाग असलेला तो चाकू पाहूनच घाबरला.
त्याच्या तोंडून शब्द फुटेना.
तो अधिकारी म्हणाला, “ह्या चाकूवर रक्ताचे डाग कसे आले ?”
हतबुध्द दिनकर जेमतेम एवढेच बोलू शकला, “मला माहित नाही. तो माझा नाही.”
पोलिस अधिकारी म्हणाला,
“तो व्यापारी आज सकाळी बिछान्यातच गळा कापलेल्या अवस्थेत सांपडला.
फक्त तूच अशी व्यक्ती आहेस की जी हे कृत्य करू शकत होती.
घर आंतून बंद होतं.
दुसरं कुणीही तिथे नव्हतं आणि आता हा रक्ताचे डाग असलेला चाकू तुझ्या बॅगेत सांपडला.
तुझा चेहरा व वागणूकही संशयास्पद आहे.
सांग, तू काय व किती चोरलेस त्याचे ?”
दिनकरने शपथ घेऊन सांगितले की त्या व्यापाऱ्याबरोबर जेवण केल्यानंतर त्याने त्याला पाहिलं नव्हतं, त्याच्याकडे स्वतःचे जत्रेत दुकान लावण्यासाठी घेतलेले वीस हजार रूपये आहेत, तो चाकू त्याचा नाही.
परंतु तो फार घाबरला होता.
त्याला ठामपणे हे पोलिसांना पटवतां आले नाही.
पोलिस अधिकाऱ्याने त्याला अटक करायचा हुकुम दिला.
दिनकरच्या हातापायांत बेड्या ठोकण्यात आल्या व पोलिसांच्या गाडीत टाकले गेले.
त्याचे पैसे व सामान जप्त करण्यात आले.
दिनकर दिनवाणा होऊन रडू लागला.
जवळच्याच एका गांवातील चौकीत त्याला डांबण्यात आले.
त्याच्या गांवात त्याच्याबद्दल चौकशी करण्यात आली.
तिथले काही व्यापारी व लोक म्हणाले, “हा पूर्वी मद्यपी व आळशी होता पण आता तो चांगला व्यापार करतो व तो भला माणूस आहे.”
मग त्याच्यावर त्या दुसऱ्या व्यापाऱ्याचा खून केल्याचा व वीस हजार रूपये चोरल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्यांत आला.
त्याची बायको खूप निराश झाली.
कशावर विश्वास ठेवावा हेच तिला कळेना.
मुलं लहान होती.
एक तर अंगावर पिणारे होतं.
ती त्या सर्वांना घेऊन तो जिथे तुरूंगात होता तिथे भेटायला गेली.
प्रथम तिला भेट नाकारण्यांत आली.
मग तिने खूप अर्ज विनंत्या केल्यावर वरिष्ठांची परवानगी घेऊन तिला त्याची भेट घेऊ दिली.
त्याला कैद्यांच्या वेशांत आणि हाता पायांत बेड्या घालून इतर गुन्हेगारांबरोबर पाहून ती मूर्च्छित झाली.
थोड्या वेळाने तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले व त्याला विचारले, “हे कसे झाले ?”
त्याने खरी हकीकत सांगितली.
ती म्हणाली, “आता आपण काय करायला हवं ?”
तो म्हणाला, “निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून आपण महाराजांकडे अर्ज केला पाहिजे.”
त्याची पत्नी म्हणाली की तिने महाराजांकडे अर्ज केला होता पण तो स्वीकारला गेला नाही.
दिनकर कांही न बोलतां अधोमुख झाला.
त्याची पत्नी म्हणाली, “मला तुमचे केस पांढरे झाल्याचे स्वप्न उगीच नव्हते पडले. आठवतंय ?
तुम्ही त्या दिवशी प्रवासाला बाहेर पडणं योग्य नव्हतं.”
थोड्या वेळाने त्याचे हात हातात घेत ती म्हणाली, “मला खरं खरं सांगा. तुम्ही ते कृत्य केलं नाही ना ?”
दिनकर म्हणाला, “म्हणजे तुलाही माझा संशय येतोय ना !”
दोन्ही हातांनी चेहरा झांकून तो रडू लागला.
पोलिसांनी येऊन वेळ संपल्याचे सांगून पत्नीला मुलांसकट बाहेर काढले.
दिनकरने त्यांचा अखेरचा निरोप घेतला.
मग पत्नीबरोबरचं बोलणं आठवून त्याच्या मनांत आलं की पत्नीला सुध्दा संशय येतोय.
आता फक्त देवच खरं काय तें जाणतोय.
आपण फक्त त्याचीच कृपा होण्याची वाट पहायची.
मग दिनकरने सरकारच्या अर्जविनंत्या करणे सोडले.
सर्व आशा सोडून दिली.
फक्त परमेश्वराची प्रार्थना चालू ठेवली.
त्याला भर चौकात शंभर फटके व कायम जन्मठेप अशी शिक्षा सुनावण्यात आली.
शंभर कोरड्यांनी झालेल्या जखमा भरताच इतर कैद्यांबरोबर त्याची दूरच्या तुरूंगात रवानगी झाली. दिनकर, आतां दिनकरराव, त्या तुरुंगात येऊन सव्वीस वर्षे झाली होती.
त्यांचे सगळे केस पांढरे झाले होते.
त्यांची दाढी पांढरी लांब व बारीक झाली होती.
त्यांच्यातलं चैतन्य नाहीसं झालं.
ते वांकले होते, हळू चालत, कमी बोलत आणि कधीच हंसत नसत.
परमेश्वराची प्रार्थना मात्र ते सतत करत.
तुरूंगात ते बूट तयार करायला शिकले.
त्यांना थोडे पैसे मिळायचे.
त्यांतून त्यांनी संतांची चरीत्रे वाचायला विकत घेतली.
जेव्हा तुरूंगात थोडा उजेड येई, तेव्हा ते ही पुस्तके वाचत.
गुरूवारी सर्व कैद्यांना थोडा वेळ प्रार्थनेसाठी एकत्र दिला जाई.
तेव्हा ते अभंग गात व संत चरित्रांचे सर्वांसाठी वाचन करीत.
त्यांचा आवाज अजूनही गोड होता.
दिनकररावांच्या नम्र वागण्यामुळे ते तुरूंग अधिकाऱ्यांना प्रिय होते तर इतर कैदी त्यांना बाबा किंवा संत म्हणून मान देत.
अनेक कैदी त्यांच्याकडून दयेचे अर्ज, भेटीसाठी अर्ज, लिहून घेत असत.
कैद्यांची आपापसांत भांडणे झाली तर ते येऊन ‘बाबा’ देतील तो न्याय मान्य करत.
दिनकररावांच्या घरून कधी कांही बातमी त्यांच्यापर्यंत आलीच नाही.
त्यांची पत्नी व मुलं आहेत की नाहीत हेही त्यांना कधी कळलं नाही.
एक दिवस कैद्यांची एक नवी तुकडी तुरूंगात आली.
संध्याकाळी सर्व कैदी नव्या कैद्यांभवती जमा झाले.
नवे कैदी कुठले, काय अपराध केले, इ. चौकशी सुरू झाली.
तिथेच नव्या कैद्याजवळ अधोमुख होऊन दिनकरराव बसले होते व ऐकत होते.
त्यातला एक साठ वर्षांचा दणकट शरीराचा बारीक केस केलेला व छोटी दाढी राखून असलेला कैदी त्याला कां शिक्षा करण्यात आली ते सांगत होता.
तो म्हणाला, “मित्रांनो, मी फक्त खुंटाला बांधलेला घोडा घेतला तर मला चोरी केल्याबद्दल अटक झाली.
मी त्यांना सांगितले की मी जरूरी कामासाठी तो तात्पुरता घेतला होता व काम झाल्यावर परत करणार होतो.
घोड्याचा मालक माझ्या ओळखीचा होता.
पण माझे कांही ऐकून घेण्यात आले नाही.
खरं तर मी घोडा चोरल्याचा कांही पुरावाही त्यांच्याकडे नव्हता पण मला एकदम इथे पाठवण्यात आले.
खरं तर पंचवीस-सव्वीस वर्षांपूर्वी मी खरंच मोठा गुन्हा केला होता व केव्हाच इथे यायला हवं होतं पण तेव्हा पकडला गेलो नाही.”
कुणीतरी विचारले, “तू कुठला आहेस ?”
तो म्हणाला, “अमरावतीचा. माझं नाव मोतीराम ससाणे.
दिनकररावांनी डोकं वर केलं, “मोतीराम, मला सांग. त्या अमरावतीतील व्यापारी दिनकर शेट्ये व त्याचे कुटुंब तुला ठाऊक आहे ?
तो अजून जिवंत आहे ?”
तो म्हणाला, “म्हणजे काय ?
अर्थातच मला ठाऊक आहेत.
ती मुलं चांगलीच श्रीमंत आहेत.
आई नाही त्यांची आणि वडील आपल्यासारखेच अपराधी म्हणून दूरच्या तुरुंगात पाठवले गेले आहेत.
पण म्हातारबाबा तुम्ही कसे इथे आलांत ?”
दिनकरराव एवढेच म्हणाले, “माझे पापक्षालन करण्यासाठी मी गेली सव्वीस वर्षे इथे आहे.”
त्याने विचारले, “काय पाप केले तुम्ही ?”
एक सुस्कारा सोडत दिनकरराव म्हणाले, “ही शिक्षा भोगण्यासारखं कांहीतरी घडलं असेल माझ्याकडून.”
मग ते अधिक काही बोलले नाहीत.
त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र दिनकरराव तिथे कसे आले ते सांगितलं.
दुसऱ्याच कोणीतरी खून करून चाकू त्यांच्या बॅगेत लपवला व ते निरपराध असून कसे इथे आले, ते सर्व त्यांनी सांगितले.
जेव्हा मोतीरामने हे ऐकले तेव्हा त्याने दिनकररावांकडे पाहिले आणि स्वतःच्या गुडघ्यावर थापटत आश्चर्याने म्हणाला, “वा: ! ही तर कमाल आहे.
खरंच मजेदार आहे पण बाबा तुम्ही किती म्हातारे झालांत ?”
बाकीच्यांनी विचारलं, “ह्यांत तुला कमाल काय वाटली ?
त्याने दिनकररावांना पूर्वी कुठे पाहिलं होतं ?”
त्याने कांही उत्तर दिलं नाही.
तो एवढचं म्हणाला, “आमची इथे भेट व्हावी हेच आश्चर्य आहे.”
दिनकररावांना हे ऐकून वाटले की त्या व्यापाऱ्याला खरं कुणी मारलं ते ह्याला माहित आहे.
त्यांनी विचारले, “मोतीराम, तू कदाचित ह्या गोष्टीबद्दल तेव्हा ऐकलं असशील किंवा मला पूर्वी पाहिलं असशील !”
तेव्हा मोतीराम म्हणाला, “तेव्हा इतक्या अफवा पसरल्या होत्या की त्या माझ्या कानावर आल्याशिवाय कशा रहातील पण मी आता त्या विसरलो आहे.”
दिनकरराव म्हणाले, “कदाचित त्या व्यापाऱ्याचा खून कोणी केला हे तुला ठाऊक असेल ?”
मोतीराम जोरात हंसला आणि म्हणाला, “सरळ आहे, ज्याच्या बॅगेत चाकू सांपडला, तोंच खुनी.
जर दुसऱ्या कोणी तो चाकू तिथे लपवला असला तरी तो पकडला जात नाही तोपर्यंत अपराधी ठरत नाही.
आणि बॅग तुमच्या डोक्याखाली असतांना दुसरा कोणी कसा तो चाकू त्या बॅगेत ठेवू शकेल ?
तुम्हांला जाग नसती कां आली ?”
हे त्याचे शब्द ऐकून दिनकररावांची खात्री झाली की ह्यानेच त्या व्यापाऱ्याचा खून केला असला पाहिजे.
ते उठले व तिथून निघून आले.
ती पूर्ण रात्र ते जागेच राहिले.
त्यांना खूप वाईट वाटलं.
अनेक चित्र मनांत उमटली.
ते जत्रेत दुकान लावायला निघाले तेव्हा निरोप देणारी पत्नी आठवली.
समोर उभी राहिली, हंसणारी, आनंदी, त्यावेळी लहान असणारी मुलं दिसली, स्वतःचं आनंदी स्वरूप आठवलं, ते त्या धाब्यावर मजेत गिटार वाजवत बसल्याचे आठवलं.
मग पोलिसांची उलटतपासणी, हातापायांतल्या बेड्या, त्यांना मारण्यांत आलेले शंभर कोरडे, तो चौक, ती भोवतालची पहायला जमलेली गर्दी, तो कोरडे ओढणारा, ते बाजूला उभे असलेले पोलिस, कैदखाना, इतर कैदी आणि अंदमानवरची सव्वीस वर्षे आणि त्याला अकाली आलेलं वृध्दत्व, हे सर्व डोळ्यांसमोरून गेलं आणि ते एवढे दुःखी झाले की क्षणभर त्यांना आत्मघातच करावा असं वाटलं.
मग त्यांना मोतीरामचा राग आला.
हे सर्व व्हायला हा दुष्टच कारणीभूत होता.
त्यांना त्याचा एवढा राग आला की त्याचा सूड घ्यावा असे वाटू लागले.
ते नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना करत रात्रभर जागले.
पण त्यांचे मन शांत होईना.
दुसरा संबंध दिवस ते मोतीरामपासून दूर राहिले.
त्याच्याकडे त्यांनी पाहिलेही नाही.
असा एक पंधरवडा निघून गेला.
दिनकररावांना रात्री झोंप येत नसे व काय करावे, हेही कळत नव्हते.
एका रात्री ते तुरूंगात फिरत असतांना त्यांना कैदी झोपायच्या बाकापासून कुठे कुठे माती उकरलेली दिसली.
ते तिथे थांबले.
तेवढ्यात बाकाखालून मोतीराम बाहेर आला आणि त्याने घाबरून दिनकररावांकडे पाहिले.
दिनकरराव त्याच्याकडे दुर्लक्ष करून जाऊ लागले पण त्याने येऊन त्यांचा हात धरला आणि सांगितले की तो तिथून पळून जाण्यासाठी एक भूयार तयार करत होता.
सर्वांच्या नकळत तो माती बाहेर नेवून टाकत होता.
तो दिनकररावांना म्हणाला, “म्हातारबाबा, कुठे बोलू नका.
तुम्हाला पण इथून पळतां येईल.
तुरूंग अधिकाऱ्यांना कळलं तर ते मला चाबूकाने फोडतील पण त्याआधी मी तुम्हाला गळा दाबून मारेन.”
दिनकरराव आपल्या शत्रूकडे पहात रागाने थरथरत होते.
त्यांनी हात हिसकला व ते म्हणाले,
“मला इथून पळून जाण्याची इच्छाच नाही आणि तू मला आता मारायची गरजच नाही कारण तू मला केव्हाच मारलं आहेस.
तुझ्याबद्दल तुरूंग अधिकाऱ्यांना सांगायचं की नाही हे मला देव सांगेल तसं मी करेन.”
दुसऱ्या दिवशी कैद्यांना कामाला बाहेर काढतांना एका रक्षकाला बाहेर टाकलेली ती माती दिसली आणि लक्षांत आलं की कोणीतरी पळून जायची तयारी करत होता.
तुरुंग-प्रमुखाने दुसऱ्या दिवशी सर्व सैनिकांकडे चौकशी केली.
कोणी भुयार खोदले हे कोणीही सांगेना.
ज्यांना माहित होतं तेही गप्प राहिले कारण भुयार खोदणाऱ्याला मरेपर्यंत मारण्यात आलं असतं.
शेवटी तुरूंग-प्रमुख दिनकररावांकडे वळले व म्हणाले, “बाबा, तुम्ही नेहमी खरं बोलतां.
देवाला स्मरून सांगा की हे भुयार कोणी खणलं आहे ?”
मोतीराम आपला काहीच संबंध नसल्यासारखा दिनकररावांकडे पहातही नव्हता.
दिनकररावांना हाता पायाला कंप जाणवत होता.
बराच वेळ त्यांनी शब्दही उच्चारला नाही.
ते विचार करत होते, “ज्याने माझं आयुष्य बरबाद केलं, त्याला मी पाठीशी घालू ?
त्यालाही भोगू दे.
पण जर मी सांगितलं तर त्याला हे मरेमरेतों मारतील आणि माझा त्याच्यावरचा संशय चुकीचा असेल तर !
शिवाय त्याला शिक्षा होऊन मला काय फायदा ?”
तुरूंग प्रमुख परत त्यांना उद्देशून म्हणाला, “बाबा, खरं सांगा !
कोण हे भुयार खणत होता ?”
दिनकररावांनी मोतीरामकडे एक नजर टाकली आणि ते म्हणाले,
“मी कांही सांगू शकत नाही, साहेब.
देवाची मी कांही सांगावं अशी इच्छा नाही.
तुम्ही मला हवं ते करू शकता.
मी तुमच्या ताब्यात आहे.”
तुरूंग प्रमुखांनी खूप प्रयत्न करूनही दिनकरराव कांही बोलले नाहीत.
मग तुरूंगप्रमुखानी त्यांचा नाद सोडला.
त्या रात्री दिनकरराव बिछान्यात पडून जरा डुलकी घेतात न घेतात तोच त्यांना जाणवले की कोणी तरी गुपचूप येऊन त्यांच्या बाजूला बिछान्यावर बसले आहे.
त्यांनी अंधारात डोळे ताणून पाहिले तर तो मोतीराम होता.
दिनकरराव म्हणाले, “तुला अजून काय हवं माझ्याकडून ?”
मोतीराम गप्पच होता.
दिनकरराव उठून बसले आणि म्हणाले, “निघून जा इथून.
नाहीतर मी रक्षकाला बोलावीन.”
मोतीराम दिनकररावांच्या समोर वांकून म्हणाला, “दिनकरराव, मला माफ करा.
दिनकररावांनी विचारले, “कशाबद्दल माफ करू ?”
मोतीराम म्हणाला, ‘त्या व्यापाऱ्याचा खून मी केला होता.
मी तुमचाही खून करून सर्व लुटून पळणार होतो पण मला बाहेर कांही आवाज आला.
तेव्हां मी झटकन चाकू तुमच्या बॅगेत ठेवला आणि खिडकीतून पसार झालो.”
दिनकरराव गप्प होते.
त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं !
मोतीराम उभा राहिला आणि खाली वांकून त्याने दिनकररावांचे पाय धरले.
तो म्हणाला, “दिनकरराव मला माफ करा.
देवाशपथ, मला माफ करा.
तो खून मी केल्याचं जाहिर करून मी तुम्हांला मुक्त करीन.
तुम्हाला घरी जाता येईल.”
दिनकरराव म्हणाले, “हे बोलणं सोपं आहे पण गेली सव्वीस वर्षे मी तुझ्याऐवजी इथे यातना भोगल्या आहेत.
आता मी कुठे जाणार ?
माझी पत्नी मृत झाली.
मुलं मला विसरली आहेत.
मी आता कुठे जाऊ इच्छित नाही.”
मोतीरामने त्यांचे पाय सोडले नाहीत.
तो जमीनीवर डोकं आपटू लागला.
“बाबा, मला माफ करा.
त्यांच्या चाबूकाच्या फटक्यांच्या मारापेक्षा तुमच्याकडे बघतांना मला जास्त त्रास होतो.
सर्व जाणूनही तुम्ही माझा मार वाचवण्यासाठी माझं नांव सांगितलं नाहीत.
मी फार पापी आणि दुष्ट माणूस आहे पण तुम्ही मला माफ करा.”
असं बोलून तो रडू लागला.
त्याला रडतांना पाहून दिनकररावही रडू लागले व म्हणाले,
“देवच तुला माफ करेल. कदाचित मीच तुझ्या शतपटीने पापी असेन.”
ह्या शब्दांबरोबर त्यांचे मन शांत झाले.
घराची ओढ, आपल्या माणसांचा मोह नाहीसा झाला.
आता तुरूंग सोडायची इच्छा त्यांना राहिली नाही.
जे सहन करावं लागलं, त्यामुळे संचित कर्म नष्ट झाल्यासारखे वाटले.
“काय देवा आतां पाहतोस अंत” असं म्हणत ते आतां शांतपणे शेवटच्या दिवसाची वाट पहाणार होते.
दिनकररावांनी कांहीही सांगितले असले तरी आपल्या गुन्ह्याचा भार त्यांनी वहावा हे मोतीरामला सहन होईना.
त्याने तुरूंग अधिकाऱ्यांना त्या खुनाचा लेखी कबुलीजबाब दिला.
लवकरच दिनकररावांच्या सुटकेचा हुकुम तुरूंग प्रमुखांच्या हाती पडला.
ते आनंदाने दिनकररावांच्या कोठडीत आले पण तिथे आधीच देवाघरी निघून गेलेल्या दिनकररावांचा केवळ देह पडलेला दिसला.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – गॉड सीज् द ट्रुथ बट अवेटस्
मूळ लेखक – लिओ द टॉलस्टॉय (१८२८ – १९१०)
तळटीपः शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण निरपराध्याला शिक्षा होऊ नये, असं कां म्हटलं जातं, ते ह्या कथेत सांगितलं आहे. मूळ कथा रशियातील त्झारच्या अन्यायी राजवटीच्या काळांत घडलेली दाखवली आहे. मृत्यूलोकांत विनाकारण यातना भोगणा-याला पण परमेश्वराला न विसरणा-याला तो मरणानंतर सद्गती देतो, असा ख्रिश्चॅनीटीचा संदेश कथेत आहे. रूपांतरात मी पापक्षालन, पूर्व कर्मे असा भारतीय उल्लेख केला आहे.
— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..