नवीन लेखन...

काय म्हणावं याला? योगायोग, चमत्कार की काही?

आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात, की ज्यांचा संदर्भच लागत नाही. हे नक्की काय घडून गेलं हे ही समजत नाही, याला काय म्हणावं ते लक्षात येत नाही.
तर सांगत काय होतो, मी काही नास्तिक वगैरे अजिबात नाही. देवधर्म, कुळाचार पाळणाऱ्या कुटुंबातच माझं आयुष्य गेलं. परंतु या गोष्टींचं अवडंबर मात्र मी कधीही माजवलं नाही. भक्ती, श्रद्धा, विश्वास याकडे नेहमी डोळसपणे पाहिलं. आणि ज्या स्थानी मनाला प्रसन्न वाटलं, मन भरून आलं, प्रामाणिकपणे, श्रद्धेने, मन:पूर्वक, निस्वार्थी भावाने दुसऱ्यासाठी, गरजवंतासाठी काही केलेलं दिसलं तिथे हात नकळत जोडले गेले.
पण अशा काही घटना माझ्या, माझ्या परीचीतांच्या आयुष्यात घडून गेल्या, ज्या आजही मी विसरू शकत नाही.
घटना पहिली –
मी शाळेत असतानाची गोष्ट. आम्ही सगळे, म्हणजे आईवडील आणि आम्ही तीन भावंडं साऊथच्या प्रवासाला गेलो होतो. ही गोष्ट आहे साधारण १९६८-६९ सालातली. आंध्रच्या सीमेवरचं गाव, तिरूवन्नमलै. जिथे तिथल्या वातावरणाने मन प्रसन्न करणारा एक आश्रम आहे. आश्रम म्हणजे, त्या परिसरात एक शंकर मंदिर, वेदविद्याध्ययन करणारी पाठशाळा, आश्रमात येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची उत्तम सोय, ध्यानधारणा करण्यासाठी शांत प्रसन्न वाटणारी एक प्रशस्त खोली. या ठिकाणी रमण महर्षी नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांच्याच नावाने हा आश्रम आहे, रमाणाश्रम. आश्रमात सकाळ संध्याकाळ धार्मिक विधी, वेदपठण सुरू असे. आश्रमाच्या मागच्या बाजुला, पसरलेला अरुणाचल पर्वत आहे. सकाळचा उपाहार, आणि दोन्ही वेळच्या जेवणासाठी आश्रमात भला थोरला सभामंडप, सार्वजनिक स्नानगृहात कडकडीत पाण्याची सोय, सकाळी उपहाराला दोन मोठ्या इडल्या, त्यावर लोणकढं तूप, सोबत चविष्ट सांबार आणि कॉफी. तर जेवणात भरपूर भात, सांबार, भाजी, लोणचं. संध्याकाळी कॉफी आणि रात्री जेवण. आणि हे सगळं विनामूल्य. तिथून निघताना आपल्याला वाटल्यास, आपल्या कुवतीनुसार आपण देणगी देऊ शकतो. अर्थात त्याची अपेक्षा अजिबात नाही. तसंही जवळपास हॉटेल वगैरेची सोय नसल्याने दुसरा पर्यायही उपलब्ध नव्हता. आश्रमाच्या मागे असलेल्या अरुणाचल पर्वताची परिक्रमा करणं हे एक भक्तीचं प्रतिक मानलं जातं. सकाळी उपाहार करून निघालं तर दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत आश्रमात पोहोचता येत असे. फक्त सकाळी सांगून मात्र ठेवायचं, आपण परिक्रमेला जातोय म्हणून. म्हणजे थोडा उशीर झाला तरी उपाशी रहावं लागत नसे. साधारण चार पाच तासांची ही परिक्रमा होती. आम्ही दुपारी जेवून निघायचं ठरवलं. जेवून थोडी विश्रांती घेतली, आणि निघालो. परिक्रमेच्या सुरवातीला आणि शेवटी वाट बांधून काढलेली होती. पुढे मात्र विचारत जावं लागत असे. तसा रस्ता एकच होता, पण मध्येच दोन वाटा फुटल्या की पंचाईत व्हायची. शहरासारखी वर्दळ नसल्याने, मार्ग विचारायला कुणीच भेटत नसे, रस्ते सूनसान आणि दुकानंही फारशी नाहीत. क्वचित एखादं बंद दुकान दिसायचं. आम्ही निघालो, अर्धा पाऊण तास सरळ रस्त्याने चालत राहिल्यावर मध्येच रस्त्याला दोन वाटा फुटल्या. कोणत्या रस्त्याने पुढे जावं कळेना. वाट चुकली तर? संध्याकाळ झाल्यावर तर काहीच कळलं नसतं. पाच दहा मिनिटं आम्ही विचार करत उभे होतो. रस्त्याला चिटपाखरूही नव्हतं. अगदी अचानक एका वाटेने एक पांढरा स्वच्छ शर्ट आणि लेहंगा घातलेला एक मध्यमवयीन माणूस आला. आम्हाला हायसं वाटलं आणि आम्ही हिंदीमध्ये संवाद साधून त्याला पुढचा रस्ता विचारला. त्यावर त्याने हसून आमच्याकडे एकदा पाहिलं. आमचा प्रश्न त्याला कळला की नाही कोण जाणे. पण हाताने त्याने आम्हाला आपल्यामागे येण्याची खूण केली, आणि आमच्यापुढे पंचवीसेक पावलांच अंतर ठेऊन तो चालू लागला. आम्हीही दुसरा पर्याय नसल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून आणि मनात देवाचं नाव घेत त्याच्यामागून जाऊ लागलो. एकूण अविर्भावावरून तो मुका असावा असं जाणवत होतं. वाटेत अधून मधून रस्त्याच्या कडेला छोटी घुमटीसारखी देऊळं दिसायची. तो लगेच त्यासमोर साष्टांग नमस्कार घालायचा आणि हसून खुणेने आम्हालाही नमस्कार करायला सांगायचा. दुसऱ्या कुणाकडे वाट विचारायला रस्त्यात कुणीही दिसत नसल्याने, आम्ही आपले त्याच्यामागून चालत होतो. हळुहळु उन्ह कलून संध्याकाळ झाली. थोडा अंधारही होऊ लागला. परिक्रमेचा बराचसा टप्पा आम्ही पार केला होता. तुरळक मनुष्यवस्तीही दिसू लागली. आश्रमात शिरण्यापूर्वी बांधलेली वाट जवळ आली. एव्हाना अंधार झाला होता. रस्त्याच्या कडेला एक देऊळ लागलं. त्याने नमस्कार घातला, आणि आम्हालाही खूण केली. आम्हीही भक्तिभावाने नमस्कार करून त्याचे मनापासून आभार मानण्यासाठी नजर उचलली. आजूबाजूला जाऊद्या, दूरदूर नजरेच्या टप्प्यातही तो कुठेही दिसत नव्हता. आम्ही मात्र सुखरूप, सुरक्षितपणे आश्रमात पोहोचलो होतो.
घटना दुसरी –
माझ्या वडिलांचे एक गुरुबंधू होते, वाणी म्हणून. म्हणजे त्यांचं आडनाव वाणी. आपल्या गुरूंवर त्यांची नितांत श्रद्धा होती. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयापूर्वी ते मनापासून त्यांचं स्मरण करायचे. संसारात कितीही संकटं आली, दुःख आली तरी त्यांची गुरुंवरची श्रद्धा तीळभरही कमी झाली नाही. एक दिवस अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला, आणि तो वाढतच गेला. डॉक्टरना दाखवलं. एका निष्णात सर्जननी शस्त्रक्रिया करणं अनिवार्य आहे असं सांगितलं. आता त्या दृष्टीने त्यांच्या घरच्या मंडळींची तयारी सुरू झाली. वाणीकाका तसे मनाने घाबरट होते, आणि शस्त्रक्रिया म्हटल्यावर ते फारच घाबरले. आपल्या गुरूंची सतत आठवण काढू लागले. शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणं गरजेचं होतं. अखेर तारीख निश्चित ठरली. वार सोमवार होता. शुक्रवारी म्हणजे शस्त्रक्रियेपूर्वी दोन दिवस वाणीकाकांना सगळ्या टेस्ट करण्यासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं. ते सतत गुरुस्मरण करत होते, आणि त्यांना विनवत होते की शस्त्रक्रियेपूर्वी तुमचं एकदा दर्शन घडूदे, मग माझं काहीही झालं तरी हरकत नाही. या इस्पितळाचे मुख्य सर्जन जे वाणीकाकांची शस्त्रक्रिया करणार होते त्यांचा एक नियम होता, की ते रविवारी इस्पितळात येत नसत. अगदी गेली अनेक वर्ष हे असच चाललं होतं. रविवार हा त्यांनी स्वतःची ध्यानधारणा, योगा यासाठी ठेवलेला होता.
वाणीकाकांच्या सगळ्या टेस्ट झाल्या होत्या. शनिवारचा दिवस संपून रात्र झाली. वाणीकाकांनी अगदी कळवळून आपल्या गुरूंना साद घातली, मला एकदा दर्शन द्या. रविवारची सकाळ उजाडली, आणि….. आणि इतक्या वर्षांत कधीही न घडलेली, इस्पितळातल्या सगळ्याच कर्मचारी, परिचारिका सगळ्यांनाच तोंडात बोट घालायला लावणारी घटना घडली. नित्याप्रमाने बरोबर नऊ वाजता डॉक्टरांची Volkswagen इस्पितळाच्या पोर्च मध्ये येऊन उभी राहिली, आणि गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर उतरले. कुणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुणीतरी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, परंतु त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टर थेट शिरले ते वाणीकाकांच्या खोलीत. मागून लगबगीने येणाऱ्या परिचारिकेलाही त्यांनी हाताने बाहेरच थांबायला सांगितलं, त्यामुळे आत काय घडतंय हे कुणालाही समजत नव्हतं. पाच मिनिटात डॉक्टर बाहेर आले आणि कुणाकडेही न पहाता, काहीही न बोलता गाडीत बसून निघूनही गेले. नुकत्याच घडलेल्या या प्रकाराने सगळेच दिडमुख होऊन गेले होते. इस्पितळाचा सगळा स्टाफ या स्थितीत असताना, आज वाणीकाका मात्र अगदी आनंदात होते. आतापर्यंत ताण असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान आणि आत्मविश्वास दिसत होता……..त्यांच्या कळकळीच्या विनंतीला मात्र आज यश मिळालं होतं. रविवार सरला आणि सोमवारची पहाट उजाडली. आज वाणीकाकांची शस्त्रक्रिया होणार होती. सगळा कर्मचारीवर्ग आपापल्या कामात मग्न होता. डॉक्टर आपल्या नेहमीच्या वेळेवर हजर झाले. स्टाफचं good morning स्वीकारत ते आपल्या केबिनकडे जात असताना, त्यांचा मूड चांगला आहे हे पाहून एका ज्येष्ठ परीचारिकेने डॉक्टरना विचारण्याचं धाडस केलच,
सर, तुम्ही काल रविवार असूनही इस्पितळात कसे आलात? प्रश्न न कळून डॉक्टरनी विचारलं,
तुमची तब्येत बरी आहे ना सिस्टर? काय बोलताय तुम्ही?
परिचारिकेला घाम फुटला. तरीही डॉक्टरांचं उत्तर न कळल्यामुळे धीर करून ती म्हणाली,
हो सर, तुम्ही नेहमीच्याच वेळेवर काल आलात आणि सरळ त्या वाणींच्या खोलीत गेलात. आम्हा कुणालाही आत येऊ दिलं नाही तुम्ही. आणि आश्चर्य म्हणजे बाहेर येऊन कुणाशीही न बोलता तुम्ही सरळ निघून गेलात. आम्हाला काहीच कळेना.
आता मात्र डॉक्टर जरा चिडलेच, आणि म्हणाले,
what is this nonsense. तुम्ही काय बडबडताय सिस्टर. काल मी माझ्या घरीच होतो understand. आणि आता काहीतरी वायफळ बडबडत न बसता शस्त्रक्रियेच्या तयारीला लागा.
डॉक्टरांचा नाराज सूर पाहून सिस्टर yes sir म्हणत तिथून सटकलीच. पण तिच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही पुसलेलं नव्हतं.
(वाचकहो, ही कल्पित कथा नाही, तर घडलेली गोष्ट जी वाणीकाकांनी स्वतः माझ्या वडिलांना सांगितली)
काय म्हणायचं याला???
घटना तिसरी-
माझी थोरली बहिण लग्नानंतर इंदोर(मध्य प्रदेश) इथे रहात असतानाची गोष्ट. तिकडे हिवाळ्याच्या दिवसात थंडी प्रचंड असायची. आम्ही एकदा हिवाळ्याच्या दिवसातच तिच्याकडे गेलो होतो. एके दिवशी सकाळी माझे आई वडील आणि ताई, काही किरकोळ वस्तू आणण्यासाठी आणि जरा उन्हात पाय मोकळे करून येण्यासाठी बाहेर पडले. ताईचं भाड्याचं पण स्वतंत्र आणि प्रशस्त बंगलेवजा घर होतं. मी त्यांच्याबरोबर जाण्याचा कंटाळा केला आणि घरातच वाचत पडलो होतो. बराच वेळ झाला तरी मंडळी परतली नव्हती. मला काहीच कळेना, थोडी काळजीही वाटायला लागली. खिडकीकडे उभा राहून मी त्यांची वाट पहात होतो. अचानक ताईच्या घराच्या बाजूला रहाणारे गृहस्थ स्कुटरवरून आले,आणि मला म्हणाले,
तुमच्या आई आणि बहिणीला अपघात झालाय. त्यांना एका मोठ्या व्हॅनने उडवलय. त्यांना इस्पितळात नेलय, पण कुणी नेलं ते मात्र माहित नाही. तुमच्या वडिलांना मात्र नशिबाने अजिबात काहीही झालेलं नाही. ही साधारण १९७६-७७ सालातली घटना असावी. हे ऐकून मी प्रचंड घाबरलो. मग त्यांनीच मला आपल्या स्कुटरवरून हॉस्पिटलमध्ये नेलं. जाताना माझ्या मनात आलं,
त्यांना इस्पितळात कोणी नेलं असेल? ते कोण असतील? आम्ही इस्पितळात पोहोचलो. तीन अत्यंत फाटक्या कपड्यातली अगदी तळागाळातील,म्हणजे नॉर्मल आयुष्यात ज्यांच्या वाऱ्यालाही आपण उभे रहाणार नाही अशी ही माणसं, हात जोडत पुढे आली, आणि हिंदीत संवाद साधत म्हणाली, भाईसाब कैसी है अब मांजी और बहनजी?
खरं म्हणजे हात आम्ही जोडायला पाहिजे होते. ही माणसं आमची वाट पहात थांबली होती ती त्या दोघींकडे मिळालेली पैशाची पाकीटं चाव्या या गोष्टी परत करायला. मी माझी ओळख सांगितल्यावर, सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित माझ्या हातात ठेवल्या, वर म्हणू लागली,
एक बार देख लो सब ठीक है ना. कुछ नही होगा तो हम उस जगह पे जाकर फिर एक बार ढुंढते है. आप चिंता मत करना. एक वेळच्याही खाण्या जेवण्याची भ्रांत असलेली ही माणसं, बक्षिसी देण्यासाठी खिशातून काढलेल्या पैशाची जराही अपेक्षा न करता हात जोडत निघून गेली.
काय म्हणायचं याला? संपूर्णपणे अनोळखी ठिकाणी आलेला माणुसकीचा आणि माणसांमधल्या देवत्वाचा जिवंत अनुभव डोळ्यांच्या कडा ओलावून गेला.
घटना चौथी-
जुनी घटना आहे. आम्ही, म्हणजे माझं आणि माझ्या थोरल्या बहिणीचं कुटुंब, असे आम्ही माथेरानला गेलो होतो. एका दुपारी चहा वगैरे घेऊन फिरायला गेलो. परतेपर्यंत वाटेतच अंधार झाला. रस्त्यावर मिणमिणते दिवे होते, परंतु त्यांचा फारसा उजेड रस्त्यांवर पडत नव्हता. आम्ही आपले रमतगमत, धमाल गप्पा करत हॉटेलकडे चाललो होतो. माथेरान मार्केट, स्टेशनकडचा भाग मागे पडला, आणि रस्त्यावरची जागही विरळ झाली. पुढे तर रस्त्याला कुणीच दिसेना. आमचं हॉटेल तसं अजूनही दहाएक मिनिटांवर होतं. आम्ही आपले मजेत पुढे जात होतो. आणि अचानक माथेरान मधला विद्युतप्रवाह बंद झाला. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार पसरला. आम्ही हादरलोच. क्षणभर विचार करून, आम्ही एकमेकांचे हात पकडले आणि पुढे जाऊ लागलो. रस्ता जरी सरळ होता तरी त्याला थोडी वळणं होती. बरं, दिवे येईपर्यंत काळोखात थांबून रहाणंही धोक्याचं वाटत होतं. थोडसं चालून गेलो असू आणि समोरून बारीक टॉर्चच्या प्रकाशात दोघा तिघांच्या पावलांचा आवाज आला. आम्ही लागलीच सावध झालो. अर्थात त्यांना या अचानक जाणाऱ्या विजेची सवय होती. आमच्या तोंडावर टॉर्च मारून त्यांनी विचारलं, कुठे जायचंय?
आम्ही आमच्या हॉटेलचं नाव सांगितलं. ते ऐकून त्यांनी आपला टॉर्च उजव्या बाजूला मारला, आणि म्हणाले,
मग इकडे कुठे मरायला जाताय? रस्ता सरळ आहे. आणि त्या बारीक प्रकाशात आम्ही रस्त्याकडे नजर वळवली, तर अगदी दोन चार पावलांवर तीस चाळीस फुटांची संपूर्ण उतरण होती, जी सरळ मिनी ट्रेनच्या रेल्वे रुळांकडे जात होती. दोन तीन पावलात आम्ही सगळे कोसळून खाली पडणार होतो. आम्हाला नेमक्या रस्त्यावर आणून ती माणसं, जी त्या वेळेला देवासारखी कुठून आली होती, त्या काळोखात एकरूप होऊन दिसेनाशी झाली.
त्यांनी अगदी नेमक्या वेळेला येऊन आम्हाला अपघात होण्यापासून वाचवणं हे काय होतं????
घटना पाचवी-
माझे सासरे वारले, त्यानंतर अकराव्या दिवसाला घडलेला हा प्रसंग.
माझ्या सासऱ्यांचा त्या काळात प्रेमविवाह होता. दोघांचं एकमेकांवर निरातिशय प्रेम होतं, जे त्या उभयतांच्या प्रत्येक कृतीतून जाणवायचं. सासरे गेले आणि सासूबाई खूप एकट्या झाल्या. अकराव्याचे सगळे विधी पार पडल्यावर, गुरुजींनी कावळयासाठी पान वाढून ठेवलं, आणि प्रथेप्रमाणे सगळेच कावळ्याची वाट पाहू लागले. पाच मिनिट झाली, दहा मिनिटं झाली, कावळा काही फिरकेना. त्यांचा कुठे जीव अडकला असेल तर त्यांच्या सगळ्या आठवणी मनात आणून प्रार्थना करायला गुरुजींनी सांगितलं. पण कावळा काही येत नव्हता. गुरुजींनाही उशीर होऊ लागला, तसा त्यांनी यावर त्यांच्या आजवरच्या अनुभवातून आलेली एक युक्ती काढली. म्हणाले, भातावर दही वाढा. कावळा लगेच शिवेल पानाला. कुणीतरी लगेच दही आणायला गेलं. वरती झाडावर प्रचंड कावकाव ऐकू येत होती, आमच्या बाजूला चाललेल्या दुसऱ्या कुणाच्या पानाला कावळा शिवून त्यांचे विधी आटोपून मंडळी निघूनही गेली होती. आमच्या पानाकडे मात्र त्यांनी बहिष्कार घातला होता. अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला, आणि धावतच मेहुण्याच्या कानात ती गोष्ट मी सांगितली,
की आईला जराही अंतर देणार नाही, तिची संपूर्ण काळजी घेईन, तुम्ही अजिबात चिंता करू नका,. असं मनात म्हणून पाहा. अर्थात तो असाच वागला असता याबद्दल जराही शंका नव्हती म्हणा. पण तरीही त्याने हे म्हटलं, आणि गेला अर्धा पाऊण तास सगळ्यांना तिष्ठत ठेवणारा कावळा अगदी एका क्षणात झेप घेऊन आला आणि नेमक्या पानाला शिवला. मेहुण्याचे डोळे भरून आले. केव्हढं घट्ट प्रेम. अगदी या जगातून गेल्यावरही. आणि त्याहीपेक्षा या घटनेला काय म्हणायचं? काहीच समजेनासं होऊन जातं.
घटना सहावी, सातवी, आठवी… याची संगती कशी लावायची? याला योगायोग म्हणायचं, अंधश्रद्धा, चमत्कार की आणखी काही? एखाद दिवशी कुणा आपल्या व्यक्तीची अगदी खूप आठवण येत असते, आणि ती व्यक्ती अचानक घरी उपस्थित होते, किंवा त्याच व्यक्तीचा फोन येतो. सारंच अनाकलनीय.
आपापल्या परीने आपण त्या घटनांची सांगड घालत रहातो, आणि आपलं समाधान करून घेतो झालं.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..