नवीन लेखन...

श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थान : कडगंची

Kadaganchi - The Holy Place where Shree Gurucharitra was Written

कडगंची !

श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ! कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं! श्रीदत्तात्रेयपंथात वेदतुल्य असलेल्या ‘श्रीगुरुचरित्र’ या श्रीदत्तप्रभूंच्या द्वितियावताराचं, ज्यांना भक्तगण अत्यादरानं ‘श्रीगुरु’ म्हणतात अर्थात् श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांचं, अलौकिक चरित्रवर्णन करणा-या दैवीग्रंथाचं लेखनस्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं.

श्रीगुरुंचा कालावधी हा इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ मानला जातो. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्रीगुरुंचे मुख्य ७ संन्यासी शिष्य होते. या बरोबरच संसार करुनही श्रीगुरुंना निरंतर समर्पण भावानं पूजणारे अनेक संसारीजनही श्रीगुरुंचे शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री. सायंदेव साखरे, अर्थात् श्रीगुरुचरित्रकार श्री. सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा, जे कडगंची या मूळ गावी राहून वासरब्रह्मेश्वर (आज आंध्रप्रदेशात असलेलं बासर! या ठिकाणी सरस्वतीमंदिर आहे.) या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते. श्री. सायंदेव-नागनाथ-देवराव-गंगाधर आणि सरस्वती (श्रीगुरुचरित्राचे लेखक) असा हा श्री. सायंदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे.

श्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच ३८ व्या ओवीत ‘भाषा न ये महाराष्ट्र्’ असा उल्लेख करुन स्वतःला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून, केवळ श्रीगुरुंच्या दैवी कृपेनंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनःपुन्हा कथन केलं आहे. सर्वसाधारणपणे राज्यकर्त्यांची भाषा जनमानसात रुजत जाते असा आजवरच्या इतिहासाचा निर्वाळा आहे. मराठी बोलताना आजही आपण त्यात किती इंग्रजी शब्द वापरतो, हे पाहिल्यास याचं अनुमान करता येऊ शकेल. मात्र ज्याची मातृभाषा कानडी आहे, त्यानं मराठीत एवढा काव्यमय ग्रंथ लिहिणं आणि त्यातही ७५९५ ओव्यांमधे एकही यावनी शब्द नसणं हे पहाता श्री. सरस्वती गंगाधरांवर श्रीगुरुंचा अखंड वरदहस्त होता हेच काय ते निर्विवाद सत्य आहे. श्री. सायंदेवांच्या भाग्याचं थोरपण वर्णन करण्यास तर शब्दसंपदाही अपूरी आहे. यवनराज्यात नोकरी करुनही अनन्यभावे श्रीगुरूंच्या श्रीचरणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. श्रीगुरुंच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच आज्ञेनं त्यांनी यवनाची चाकरी सोडली आणि पूर्णवेळ श्रीगुरुसान्निध्यात ते राहू लागले.

श्री. सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री. सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे.

परंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी ‘आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी’ याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कर्दळीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री. सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री. सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात ‘सरस्वती’ असल्यानं श्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख ‘नामधारक’ (श्रीगुरुंच्या ‘श्रीनृसिंहसरस्वती’ या नावातही ‘सरस्वती’ असल्यानं) असा केलेला आहे.

कडगंची हे स्थान गुलबर्गा जिल्ह्यात, आळंद तालुक्यात आळंद-गुलबर्गा मार्गावर आहे. श्री. सायंदेवांचे पुढे वंशज नसल्यानं १९९५ साली, जेंव्हा त्यांच्या कडगंचीतील रहात्या वाडयाचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, तेंव्हा जुन्या झालेल्या एकेक भिंती पाडण्यास सुरुवात झाली. कार्यात एका ठिकाणी ‘करुणा पादुका’ आणि नाणीयुक्त कलश आढळला. आजही त्या पादुका कडगंचीस पहावयास मिळतात. खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं. त्याचा परिमल मैलो न् मैल पसरला होता. श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलेली आणि श्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरुपात आहे. श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून, पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरुंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना (ज्यामधे श्री. सायंदेवही होते), “आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची ४ प्रसादपुष्पं येतील. ती काढून घ्या.” अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंतीपुष्पं श्री. सायंदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसादपुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. ‘अधिकारी’ दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभा-यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे.

मूळ श्रीगुरुचरित्रात श्री. सरस्वती गंगाधरांनी स्वतः लिहीलेला मंत्रशास्त्राधारित असा एक अध्यायही होता. म्हणजेच मूळ श्रीगुरुचरित्र ५३ अध्यायांचं होतं. मात्र श्रीसिद्धसरस्वतीरुपातील श्रीगुरुंच्या आज्ञेनं त्यांनी तो त्यात समाविष्ट केला नाही. “गायत्री मंत्राचं पुरःश्चरण केलेल्यालाच तो वाचता येईल” असं श्रीसिद्धसरस्वतींनी श्री. सरस्वती गंगाधरांना सांगितलं. या ५३व्या अध्यायाच्या रक्षणार्थ श्रीगुरुंनी एक सर्प आणि ‘चंडदुरितखंडनार्थ’ असा एक दंड यांचीही व्यवस्था करुन ठेवलेली आहे.

श्री. सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाडयाच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवन् श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री. शंकराचार्यांनी २५ फेब्रुवारी २००२ मधे स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करुन घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.

खोदकाम सुरु असताना, सन २०१२ मधे, एकावेळेस दोघंजण बसू शकतील अश्या उंचीची, आणि केवळ बसूनच आत प्रवेश करता येईल अशी, आतमधे तेलाचा दिवा बसू शकेल असा कोनाडा असलेली एक गुहाही जमिनीखाली आढळली. याला ६ पाय-या होत्या. हीच श्री. सायंदेवांची ध्यानगुहा आणि याच स्थळी इ.स. १५५८ च्या सुमारास (म्हणजे श्रीगुरूंच्या कदलीवन गमनानंतर सुमारे एका शतकानं), पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन श्रीगुरुंनी परमशिष्य श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं आणि त्यानुसार श्री. सरस्वती गंगाधरांनी ते शब्दबद्ध केलं. मूळच्या ६ पाय-यांपैकी ३ पाय-या अजूनही आहेत. त्याच उतरुन जाऊन, खाली असलेल्या गुहेत बसून साक्षात् श्रीदत्तप्रभूंनी श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र श्रीसिद्धसरस्वतीरुपात सांगितलं.

या स्थानाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी श्री. शिवशरणप्पा अत्यंत प्रामाणिकपणानं आणि पोटतिडकीनं प्रयत्नरत आहेत. श्रीगुरुचरित्र पारायणासाठी एका हॉलची उभारणी झालेली आहे. येणा-या भक्तांच्या निवासासाठी खोल्या, अन्नगृह यासारख्या सोयीही आहेत.

या पावन वास्तूची देवता अजूनही वास्तूच्या रक्षणार्थ तिथेच फिरते आहे. श्री. शिवशरणप्पांचे वडील मूळ वास्तूत (जीर्णोद्धार होण्याआधी) दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी गेले असता, त्यांनी त्या ठिकाणाचं द्वार बंद करुन घेतलं. आडवे झाले नाही तोच कसल्याश्या आवाजानं ते उठून बसले. पहातात तो शेजारीच केसाळ सर्परुपात या पवित्र स्थानाचा वास्तूपुरुष आलेला होता. नमस्कारासाठी त्यांनी हात जोडले आणि क्षणार्धातच तो वास्तूपुरुष गुप्तही झाला.

श्रीगुरुचरित्राच्या पठणाला श्रीदत्तात्रेयपंथात अत्यंत महत्वाचं आणि अत्यादराचं स्थान आहे. हा वेदसमान ग्रंथ ज्या ठिकाणी जन्मास आला, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्राचं लेखन झालेलं आहे अश्या या दुर्लक्षित, अज्ञात परंतु परमपावन स्थानास गाणगापुरी जाणा-या प्रत्येक श्रीदत्तभक्तानं आवर्जून भेट द्यावी.

श्रीसायंदेव साखरे … भगवन् श्रीदत्तात्रेयांच्या (श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी) अंतरंग शिष्यांपैकी एक! यांचेच पाचवे वंशज श्री. सरस्वती गंगाधर हे वेदतुल्य अश्या ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथराजाचे लेखक! या भक्तराज श्री. सायंदेवांचं हे स्तवन!

श्रीसायंदेवस्तवनम्

श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीकुलदेवतायै नमः, श्रीगुरुभ्यो नमः, श्रीमातृपितृभ्यां नमो नमः
अस्य भारद्वाजगोत्रोत्पन्नस्य दत्तप्रसाद थिटे शर्मणाः कृतम् श्रीगुरुभक्त सायंदेवस्तवम्

! आपस्तंबशाखायां कौंडिण्यगोत्रस्य भूषणम् │ वासरब्रह्मेश्वरस्थाने अधिपतीरुपेण संस्थितम्
कडगंची नाम ग्रामस्य मूलतो निवासिनम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥१॥
यवनराज क्रूरस्य पाशमुक्तकारकम् │ श्रीगुरुभक्त न च भयं गुर्वाशिष करोति रक्षणं
गाणगग्रामे वासं कृत्वा श्रीगुरुपादसेवनकारणम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥२॥
गौरवर्णम् शिखाधारी विद्धकर्णद्वय शोभितम् │ कस्तुरीतिलक ललाटस्थानम् सयज्ञोपवित्स्कंध दिप्तितम्
भस्मांकित शरीरस्य श्वेतवस्त्र कटि धारयम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥३॥
श्रीगुरुराजसहितेण शिष्यगणादि आमंत्रितम् │ सुभार्या नाम जाखाई त्रिकरणसहितम् पूजितम्
पुष्पमंडल रचयितम् रंगवल्ल्यादि स्वागतकारणम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥४॥
षोडशोपचारयुक्तेण श्रीगुरुचरण पूजितम् │ श्रीगुरुराजपादतीर्थ सपरिवार शिरसि धारयम्
साखरे कुलदिप सायंदेव श्रीगुरुभक्तानामपि श्रेष्ठम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥५॥
हर्षोल्लास मानसे समारभे च निराजनम् │ साष्टांगे च नमस्कृत्वा सायंदेवं प्रणमाम्यहम्
अपूपादि मिष्टान्नानेक पंचरसयुक्त भोजन योजितम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥६॥
भिक्षाग्रहणेन श्रीगुरुरुपी दत्तस्वामी तोषितम् │ संतुष्टमात्र श्रीगुरुमूर्ती दधति नाना शुभाषिशम्
श्रीसायंदेव य एव गृहस्थधर्मस्य प्रधान दृष्टांतम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥७॥
नागनाथ सुपुत्रस्य श्रीगुरुसेवकेण किर्तीतम् │ सरस्वतीगंगाधर नाम कुलज श्रीगुरुचरितस्य लेखकम्
तद्वत प्राप्त श्रीदत्तकामधेनुस्य कृपारसम् │ श्रीगुरुभक्तमुख्य सायंदेवं नमाम्यहम् ॥८॥
यः स्तवनम् एतत् द्विकाले नर पठितम् │ श्रीदत्तकृपाघनवृष्टि वंशपारंuपार प्रपद्यते
भक्ताभिमानी श्रीदत्तराज अखंड परितुष्टयामि │ अंतकाले वरदहस्तम् पाठकस्य शिरसि धारयेत् ॥९॥

॥अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त॥

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..