आपल्यातील सुंदर नात्याचा अस्त कधी,कसा आणि कां झाला, कळलेच नाही.
एकेकाळी फार गळ्यात गळा नसले तरी गेलाबाजार आपल्यात बऱ्यापैकी संबंध होते. खूप काही सुचायचं, आत काहीतरी रटरटत असायचं. खूपदा सकाळी उठल्यावर मस्त लिखाण व्हायचं. त्याला कुठलाही फॉर्म वर्ज्य नव्हता. हातात हात धरून मस्त वाटचाल सुरु होती. लिहिलेलं छापूनही यायचं. बोटांना जणू परीस चिकटला होता. उमटलेला,हाती घेतलेला प्रत्येक शब्द झळाळून जायचा. थोडंफार नांव झालं. शब्दांमुळे कधी व्यासपीठही मिळालं. किंचित आणि क्वचित कमाई झाली.खूप जीवाभावाचे मैत्र झाले-ही कमाई अधिक मोलाची !
कधीच पैशासाठी लिहिलं नाही. कैफ,उन्माद,उधळलेपण अधिक महत्वाचं. लिहिलं त्यावर कधी मतं आली, कोणी भाष्य केलं, काहींची खुषीपत्रे आली. थोड्या लिखाणाची पुस्तके झाली.काही किरकोळ पुरस्कार मिळाले. स्पर्धांमध्ये नांव झालं. परिचयाचं वर्तुळ अधिक रुंदावलं. हे सगळं बाह्य !
आतल्या आत सतत जाणवत राहिलं – आपण प्रगल्भ होतोय, सजग /डोळस होतोय. दर्जात सातत्य ठेवतोय. शब्दांशी कागदाच्या साक्षीने होणारा खेळ भावतोय. विषयात वैविध्य आहे, फॉर्म्स हाताळता येताहेत, मुख्य म्हणजे आपण पोहोचतोय लोकांच्या मनात- त्यांच्या भावविश्वात ! स्वतःचं लेखन आणखी एकदा वाचावंसं वाटतंय. कसं छान अन घट्टमुट्ट प्रकरण होतं हे !
त्याला कधीतरी, का दृष्ट लागली, कळलंच नाही.
एकतर थोडासा दंडक घातला होता-लिहिलेलं प्रकाशित झालं पाहिजे. तोवर थांबायचे. नवं लिहायचं नाही. दुसरं-मागणी आल्यावर अगदी शेवटच्या क्षणी लिहायचं – येणाऱ्या स्पर ऑफ द मोमेन्ट वर विसंबून !
तिसरं आणि महत्वाचं- बदललेले अग्रक्रम ! शब्दांना कागदाचा तितकासा लोभ राहिला नाही की काय, पण लळा उतरणीला लागला. क्वचित सठीसामासी अधून मधून लिहितोही पण त्यात उत्स्फूर्ततेचा भाग अधिक ! मनात अजूनही प्रकल्प येतात, पण कागद आणि हात सर्जनासाठी एकत्र येत नाही. रियाझ असा कधी नव्हताच. तपश्चर्येचं सातत्य नव्हतं. असायचा एक सहज,स्वाभाविक आविष्कार. बघता बघता शब्दांनी बोट सोडलं. सगळं आतल्या आत राहायला लागलं. साचलेपण वाढत गेलं. काहीवेळा ते डोळ्यांमधून वाहून गेलं, तर कधी न बोलताच संक्रमित झालं.
या काळात काहीजण वर्षातून किमान एकदा तरी आवर्जून विचारायचे- ” यंदा कुठल्या दिवाळी अंकात आहात ? ” त्यांनीही ते नंतर सोडून दिलं.
मी आणि शब्द वेगळाल्या वाटेने प्रवाहित व्हायला लागलो. क्वचित पत्र तर क्वचित अभिप्राय यातून बोटांची आणि कागदांची ऊरभेट व्हायची. पण व्यक्तच व्हावंसं न वाटणं अधिक प्रवाही! त्यापेक्षा इतरच वाटा चोखाळून झाल्या. इतरांच्या सातत्याचं कौतुक वाटायचं पण आपण काही गमावलंय असं उसासूनही नाही वाटलं.मिळालेल्या नव्या ओळखीत उबदार वाटायचं.
अचानक शाश्वताचे हुंकार कानी घुमू लागले. मध्येच सोडलेल्या पायवाटेवर काय गमावले, याची बोच जाणवतेय. शब्दांचं पात्र भरू लागलंय आणि त्यात लेखणीचा खळखळाट उमटतोय. जी ए ,आरतीप्रभूंसारखे कोणाला तरी भरभरून सांगावं. मग ते कागदालाच का नको? ती कागदापेक्षा माझीच निकड वाटायला लागलीय.
खूप जवळच्यांबद्दल आतवर काही वाटत असतं- काहींना ते सांगितलं जाण्यापूर्वीच अशी मंडळी अनंताच्या वाटेने निघून गेले ,तर काहींना अजूनही ते सांगितलं जात नाहीए.
इतरांबद्दल आपल्याला जे वाटतं, त्यांनी ते आपोआप समजून घ्यायला हवं ,हा अट्टाहास यानिमित्ताने सोडावासा वाटतोय. म्हणून कागदापुढे केलेला हा दोस्तीचा हात ! नव्याने प्रतिभेच्या अटी घालणे नको ,प्रकाश दिसलाच पाहिजे हा हट्ट नसावा, व्यासपीठ हा निकष कधीच नव्हता.
असावे ते निर्मळ खळाळणे, आतले बरे-वाईट ओहोळ त्यात मिसळून मनाचा निचरा व्हावा. शब्दांमधून आपल्या,परक्यांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे,जमलेच तर तिथलीही किल्मिषे दूर व्हावीत. अंतर्बाह्य स्वच्छता व्हावी. बस्स !
कागदा,आता बोलण्याची तुझी पाळी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply