फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.
पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
एकदा काय झालं…
एका गावात हेमा आणि कुमा नावाच्या दोघी बहिणी राहत होत्या. बहिणी-बहिणी पण सावत्र. हेमा रूपाने नीटनेटकी, नाकीडोळी नीटस. कुमा मात्र बसक्या नाकाची, काळ्या रंगाची होती. हेमा वागायला गोड तर कुमा खाष्ट.
लोकांनी मदत करावी, त्यांच्याशी चांगलं बोलावं, हा हेमाचा स्वभाव, तर येईल त्याच्या अंगावर वसकन् धावायचं, उठसूठ ज्याला त्याला टाकून बोलायचं असं होतं कुमाचं वागणं.
एकदा नेहमीप्रमाणे दिवाळीचे दिवस आले, आकाशात देवांनी दिवाळीचा थाट सुरू केला. हेमा आणि कुमा ती गंमत पहात होत्या. कुमा हेमाला म्हणाली, “ए हेमे, आपल्याला तिथं जाऊन दिवाळी करायला मिळाली तर काय मज्जा येईल नाही?” “होय. का नाही येणार? अगं, आपण मुली. तिथली दिवाळी ही फक्त देवांसाठीच असते.” देव अंतर्ज्ञानी असतात. त्यांना पृथ्वीवरच्या माणसांचं बोलणं ऐकू यायचं.
मात्र देव काय बोलताहेत हे माणसांना ऐकायला मिळायचं नाही. हेमा कुमाचं बोलणं ऐकून परीराणी देवाला म्हणाली, “देवा, हेमा-कुमापैकी कुणाला तरी या वर्षीच्या दिवाळीत इथं बोलवायचं का?”
‘छे, छे! मुलांना आणि सदेह, स्वर्गात आणायचं? अं हं! हे शक्य नाही.
आजवर कधी असं घडलं नाही, आताही तसं करता येणार नाही.’ तरी देखील परीराणीने देवास वारंवार विनंती केली. तेव्हा देवाला दया आली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ‘हे पहा, मुलींना इथं आणायचं की नाही ते नंतर पाहू. पण कुठली वाईट व कुठली चांगली हे अगोदर ठरवू या. मग मी या दिवाळीनिमित्त एक आगळी गंमत सांगेन.”
ब्रह्मदेवाची ही कल्पना सर्वांना पसंत पडली. हेमा आणि कुमाची परीक्षा घेण्यासाठी परीराणीने एका परीक्षकाला पृथ्वीतलावर जायला सांगितले.
छोट्या दोस्तांनो, अन् खरोखरीच एक परी भिकाऱ्या म्हातारीचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली. प्रथम ती म्हातारी कुमाच्या दारात उभी राहिली. कुमा त्यावेळी पणत्यांमध्ये तेल ओतीत होती. म्हातारी कुमाला म्हणाली, “बाळे, तू तू मला थोडं तेल देतेस? माझ्याजवळ शिळी भाकरी आहे, पण कोरडी भाकरी मी कशी खाऊ?”
लटलटती मान, तोंडातून लाळ गळते आहे व अंगावर फाटके मळके कपडे अशा वेषातील ती म्हातारी पाहून कुमाला तिची किळस वाटली. म्हातारीला पाहून ती एकदम मोठ्याने ओरडली, “ईऽऽ कोणऽऽ भिकारडीऽऽ तुला लाज नाही वाटत सणासुदीच्या दिवसात अशा वेषात आमच्या दारात यायला? दुष्ट कुठली. दृष्ट लागेल बाई माझ्या सुखाला चल जा निघ इथून!” असं म्हणून कुमाने तिला हाकलले.
म्हातारीच्या रूपातील ती परी वरकरणी नाराजी दाखवीत परंतु मनातल्या मनात कुमाला हसत पुढे निघाली. पुढचे घर होते हेमाचे. म्हातारी घराबाहेरील अंगणात आली. हेमा त्यावेळी पणत्यांमध्ये तेल भरीत होती.
“बाळ,” म्हातारीने हाक मारली. “काय आजीबाई, या हो!” म्हणत हेमाने तिचे स्वागत केले. धावत अंगणाबाहेर गेली. तिनं म्हातारीला आधार दिला.
म्हातारीचे हात धरून हेमाने तिला घरात आणले. सतरंजीवर बसवले.
“कशाला? कशाला पोरी मला घेतेस घरात?’ म्हातारी बोलली. “वाऽऽ आजीबाई आता दिवाळी सुरू होणार. आणि तुम्ही तर माझ्या पाहुण्या.” हेमा लाघवीपणाने बोलली. “अगं, कसला पाहुणचार करतेस? मला खायला थोडं तेल दे म्हणजे झालं. कोरडी भाकरी चटणी आहे माझ्याकडं. म्हातारी म्हणाली.
“वाऽऽ आजीबाई असं कसं होईल? मी तुमच्या अंगाला तेल लावणार. तुम्हाला न्हाऊ घालणार. मग तेलचटणीचं बघू.’ हेमाच्या या आर्जवी बोलण्यामुळे म्हातारीचा जीव मोठा झाला.
‘गुणाची ग ऽऽ बाई माझी’ म्हणत म्हातारीने हेमाच्या कानावर उलट्या हाताने बोटे मोडून तिची दृष्ट काढली.
हेमाचं तिकडं लक्ष कुठं होतं? तिनं म्हातारीचे हात धरले, तिला घरात नेलं, खरोखरीच तिला तेल लावून न्हाऊ घातलं. म्हातारीची शिळी भाकरी गोठ्यातील गाई वासरांना दिली व म्हातारीला गोड धोड पदार्थ दिले. हेमाचा पाहुणचार घेऊन म्हातारी आभाळात आली.
“देवा, सांगू का कोणती मुलगी?” असं परीराणी म्हणत होती तर तिला मध्येच अडवीत देव म्हणाले, “परीराणी हे का मला सांगायला हवंय? अग, ती हेमा मोठी चांगली मुलगी आहे.”
“मग तिला आणायचे ना या दिवाळीत?” परीराणीचा प्रश्न. अं! पण मी तिला बक्षीस देणार आहे.’ “कसलं बक्षीस?” परीराणीनं पुनः विचारलं. त्यावर देव बोलले, “ही घे जादूची कांडी. नेऊन दे हेमाला. सांग तिला कागदात बांधून दिवाळीत टांगून ठेवायला.”
परीराणी म्हातारीचं रूप घेऊन पुन: पृथ्वीवर आली. तिने हेमाला जादूची कांडी दिली व ती गुप्त झाली. हेमाने एका कागदात ती कांडी ठेवून कागद घराबाहेर टांगला. जादूने त्याचा आकाशकंदील झाला.
अशीच अनेक वर्षे लोटली. ते गाव, हेमा आणि कुमा आता नाहीत. देवाची दिवाळी आहे पण ती दिसत नाही.
मात्र हेमाची आठवण म्हणून तो आकाशकंदील अजूनही दिवाळीच्या दिवसात टांगून ठेवतात.
Leave a Reply