नवीन लेखन...

काही माणसं ” अशीच ” असतात !

” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी.

अशी दीर्घ आणि सुश्राव्य आलापी राज कपूरने आणखी दोनवेळा तिच्याकडून गाऊन घेतलीय- ” आ अब लौट चले ” आणि “सत्यम शिवम सुंदरम ” च्या टायटल सॉंगमध्ये !

खोलवरची दुखापत “योग्य “कानी जावी यासाठी हा खटाटोप . आर्जवी शब्दातील ” एक दिल के दो अरमान ” वगैरे विनवणी . आणि शेवटी भात्यातील ब्रम्हास्त्र – ” ये धरती हैं इन्सानोंकी, कुछ और नहीं इन्सान हैं हम I ” ही चिरकालीन समज. बाबारे आपण “इन्सान ” आहोत, चुकणं हा आपला धर्म आहे. तेव्हा झालं गेलं विसरून जा ( जो बीत गया एक सपना था I )

आणि गाण्याच्या शेवटचं नृत्य – सगळे बाण निकामी झाल्यावर हताश होऊन कोसळणं , हार स्वीकारणं आणि होश्यमIणाला सामोरे जाणं.

संपूर्ण गाणं शब्दशः वैजयंतीभोवती !

मात्र मी आज लिहितोय राज कपूरच्या या गीतातील चेहेऱ्यावरील विभ्रमांबद्दल आणि मुकेशच्या शब्दांबद्दल !

पराकोटीचा झोकून देणारा प्रियकर राजने या चित्रपटात दिलाय. क्षणभरही प्रेमाला नजरेआड न करणारा, पण तितकेच प्रेम मित्रावरही करणारा ! काय काय क्लृपत्या करून तो आपलं प्रेम हस्तगत करतो आणि पार्टीला जाण्यापूर्वी फाडून फेकलेल्या चिठ्ठीचे कपटे तर जोडतो पण स्वतः मात्र विदीर्ण होतो. म्हणूनच पार्टीत एका कोपऱ्यात स्वतःचा ग्लास घेऊन तो अलिप्तपणे तिला सांगतो – ” गा, नृत्य कर. सगळ्यांची फर्माईश पूर्ण कर. ” तिच्या मनःस्थितीचा विचार न करता तो तिच्यावर वार करतो आणि मजा बघतो.

गाण्याच्या सुरुवातीला लबाड निळ्या डोळ्यातून तिच्यावरचा यथासांग अविश्वास दाखवतो. तिच्या विद्ध डोळ्यांना वाकुल्या दाखविणारं स्मित ओठांवर आणतो. लताचे स्वरही त्यांच्यातील अंतर कमी करू शकत नाहीत.  “आपण किती दुखावलो गेलोय ” हे गाण्याच्या दरम्यान चेहेऱ्यावरील  झरझर बदलणाऱ्या भावनांमधून तिला आणि आपल्यालाही दाखवत राहतो. सगळ्या विनवण्या फोल ठरण्यापूर्वी तो तिला सुनावतो- ” प्रेमाच्या दुनियेत दोन व्यक्ती म्हणजेही गर्दीच असते बयो ! इथे फक्त एकाकार व्हावे लागते.” ( एकाच गाण्यात किती ठिकाणी आणि किती सुंदर तत्वज्ञान)

” हमने आखिर क्या देख लिया,क्या बात हैं क्यूँ हैरान हैं हम I” हेही तिला एकटीला समजेल असं बजावतो. तेव्हा कोठे तिला जखमेच्या खोलवरपणाचा अदमास येतो. विनोदाच्या मुखवट्याखालील निस्सीम प्रेम करणारा गंभीर प्रियकर दिसतो. सगळ्याच समजूती एका क्षणात फोल ठरतात.आपण काय गमावलंय हे त्याच्या “विरळ ” मिठीतून तिला जाणवतं.

अशा “इस पार या उस पार ” माणसांना जोडणं अशक्य असतं.म्हणूनच कदाचित त्यांना जीवापाड जपावं लागतं.  ( असाच पराकोटीचा “अमीर खान” आपण “राजा हिंदुस्थानी” मध्ये पाहिलाय.)

शब्दांचा हात सोडून ती शेवटी नृत्याला साद घालते. तो आत थोडाथोडा हलतो. तिचे सच्चेपण किंचित पोहोचते त्याच्यापर्यंत !

आणि गीताच्या शेवटी तो तिला सावरायला जातो. ती जिंकते का ?

मैफिलीत ही मोडतोड न समजताच सगळे टाळ्या वाजवतात.

देहबोलीचा, विशेषतः चेहेऱ्यावरील आविर्भावांचा आदर्श वस्तूपाठ राज कपूरने येथे संयतपणे दाखवलाय.

काही माणसं “अशीच ” असतात.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..