नवीन लेखन...

कहो ना.. ‘आज भी’..प्यार है

कहो ना प्यार है ची २२ वर्ष

14 जानेवरी 2000…जानेवरी महिना हा सर्वार्थाने आशावाद दाखवणारा महिना.. एकतर वर्षातला पहिला महिना..नवीन सुरुवात करायची उमेद आणि ऊर्जा देणारा म्हणून जानेवारी ओळखला जातो. बरं मग साल 2000 चं काय म्हणताय असं विचाराल मला..

तर हो ..१४ जानेवारी, साल 2000  या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला ‘कहो ना प्यार है’ सिनेमामुळे एक ‘अजिंक्यतारा’ मिळाला…हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास! ‘कहो ना प्यार है’ आणि हृतिक रोशन या जणू एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या..खान लोकांचं अधिराज्य असलेल्या बॉलीवूड मधे 6 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी , घारे डोळे, चाफेकळी नाक व भन्नाट जाॅ लाईन असलेला एक तरुण पदार्पण करतो. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा नातू , दिग्दर्शक व अभिनेता राकेश रोशन यांचा मुलगा व सुप्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा पुतण्या या सगळ्या ओळखी जणू पुसल्या गेल्या आणि लक्षात राहिला तो फक्त हृतिक रोशन.

त्याच्या सोबत हिरोईन होती अमिषा पटेल..बॅरिस्टर रजनी पटेलांची नात बरं का ही! तशी उंचीने हृतिक पेक्षा खूपच बुटकी पण तिच्या चेहऱ्याच्या गोडव्यापुढे तिची उंची नगण्य ठरली. आधी म्हणे करीना कपूर ची निवड झालेली सोनिया च्या रोल करता, पण बाजी मारली आमिषाने…पण या नव्या जोडीचं प्रेक्षकांकडून जंगी स्वागत झालं याबद्दल वाद नाही.

माझ्या वयाच्या मुली तेव्हा शाळकरी. ‘कहो ना प्यार है’ चे प्रोमोज पाहताना हा कोण नवीन चेहरा हे समजत नव्हतं …पण एक एक दृश्य आणि विशेष करून एक एक गाणी समोर येऊ लागली तशी ‘कहो ना प्यार है’ ची जादू दिसत गेली. मला आठवतंय मी घरी हट्ट करून तब्ब्ल तीन वेळा थियेटरला जाऊन हा सिनेमा बघितला. हृतिक रोशनचे फोटो मिळतील तिथून शोधणं , छोट्यातला छोटा फोटो सुद्धा जीवापलीकडे जपून एका वहीत मी चिकटवून ठेवले होते. आपण याच्यावरंच खरं प्रेम करतो असं माझ्यासारखं तेव्हा सगळ्या 11-12 वर्षांच्या मुलींना वाटू लागलं होतं इतकं जबरदस्त फॅन फॉलोईंग होतं त्याचं.

राजेश रोशन यांनी दिलेलं बहारदार संगीत, उदित नारायण, लकी अली, आशा भोसले, अल्का याज्ञिक सारखे एक से एक अनुभवी गायक..अजून काय हवं होतं? लकी अली चं  खऱ्या  अर्थाने बॉलीवूड पदार्पण झालं ते इथे. त्यात सोने पे सुहागा म्हणतात तसं, हृतिक रोशन चं नृत्य लोकांसमोर आलं ..’ए मेरे दिल तू गयेजा’ ची साइन स्टेप तर जणू जो तो करून पाहू लागला. कोरिओग्राफर फराह खान ने अतिशय कुशल पद्धतीने हृतिक चा डान्स लोकांपुढे आणला. राकेश रोशन यांनी हृतिकच्या पदार्पणाचा विचार करताना त्याच्या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेऊन कथा लिहिली असावी असं वाटतं. चित्रपटाच्या पहिल्या भागातला सोज्वळ साधा रोहित व दुसऱ्या भागातील राज, हृतिक ने इतका सफाईदारपणे रंगवला की प्रेक्षकांनी त्याला थेट हृदयात स्थान दिलं.

डबल रोल आणि बॉलीवूड हे खरंतर नेहमीचं समीकरण आहे. पण यावेळी त्यासाठी निवडलेला नवा चेहरा, नवीन हिरोईन , संगीताचा नवीन बाझ , न्यू झीलंड ची निसर्गरम्य लोकेशन्स, कोरिओग्राफी चा नेहमीपेक्षा वेगळा थाट आणि या सगळ्यावर खरा उतरणारा सिनेमाचा नायक हृतिक रोशन ..

हे सगळं एवढ्यावरंच थांबलं नाही तर १० कोटी चं बजेट असलेल्या सिनेमाने तब्ब्ल ८० कोटी चा धंदा केला. सर्वोत्कृष्ट नायक, दिग्दर्शक , संगीत चित्रपट असं करत सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याबद्दल गिनिझ बुक व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने दखल घ्यावी एवढं देदीप्यमान यश या सिनेमाच्या पदरी पडलं.

सिनेमाचं यश हे तांत्रिक बाजूंवरही अवलंबून असतं , मात्र ‘काहो ना प्यार है ‘ च्या बाबतीत पटकथा, छायांकन इ. सगळ्या बाजूच जमेच्या होत्या हे स्पष्ट झालं.

हृतिक रोशन ने मात्र, ‘कहो ना’ पासून गेली 22 वर्ष हे ‘अजिंक्यतारा’ पद टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतोय. त्याची 6 बोटं, त्याचं तोतरेपण या सगळ्याचा लवलेशही चित्रपटात त्याने जाणवू दिलेला नाही. अपार मेहनत घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी घरोघरी पोहोचलेला हा तरुण मुलगा..वडिलांबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापासून सुरुवात केलेला राकेश रोशन चा मुलगा ते सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट पदार्पण असे दोन्ही पुरस्कार मिळालेला एकमेव सुपरस्टार असा महासागर त्याने पार केला.

आज ‘कहो ना’ प्रदर्शित होऊन 22 वर्षांनंतर, “कहो ना प्यार है’ से आज भी बहूत प्यार है.”, असंच म्हणावंसं वाटतंय..

— गौरी सचिन पावगी

image courtesy: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..