गोष्ट फार जुनी आहे. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. मी सरकारी नोकरीत होतो. उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ औरंगाबाद विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली होती तेव्हाची. त्यावेळचे औरंगाबाद विभाग प्रमुख मि. रशीद अहमद निवृत्त होत होते त्यांचे जागी माझी नेमणूक झाली होती. नोकरी निमित्ताने मी मुंबई, पुणे, नागपूर या विभागात काम केले होते पण औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यात काम करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. त्याकाळी आणि थोडेफार आजही, मुंबई पुण्यापेक्षा नागपूर, औरंगाबाद विभाग म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा हे मागासलेलेच समजले जात. विदर्भावर मध्यप्रदेश या हिंदी भाषिक राज्याचा प्रभाव होता आणि मराठवाड्यावर हैद्राबादच्या निजामशाहीचा प्रभाव होता. गंमतीशीर गोष्ट म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद येथील भुताखेतांचीही नावे आणि कहाण्यात फरक असे. मराठवाड्यात भुतांना भटकंतीमुळे सोबतीचा प्रश्नच नसे. पण आता त्या विश्रामगृहाचा खानसामा म्हणजे रखवालदार, स्वैपाकी, हरकाम्या असा सबकुछ एकमेव असल्यामुळे त्या अवाढव्य विश्रामगृहात मुक्काम म्हणजे अंगावर काटाच यायचा. बरे त्या काळात गावात हॉटेलची वगैरे काही सोय नसायची. त्यामुळे आमच्यासारख्या भटकंती करणाऱ्या सरकारी नोकरांपुढे दुसरा पर्यायही नसे.
सांगायचा मुद्दा- या अशा वास्तव्यामुळे मला त्या त्या विभागातील भुताखेतांच्या कहाण्या आणि त्यांची नांवे यांचा चांगलाच परिचय होता. एक गोष्ट मला पक्की ठाऊक होती की, ही मंडळी माणसांनी गजबजलेल्या परिसरात, दिवसा उजेडी कधीच फिरकत नाहीत. ती फक्त अंधाऱ्या रात्री, अवस पुनवेला, वडा पिंपळावर वस्ती करतात आणि त्यांच्या या निवांत वास्तव्यात आपण उगाच ढवळाढवळ करु नये. त्यामुळे अशा कित्येक कहाण्या – जवळपास प्रत्येक आजूबाजूच्या विश्रामगृहाशी एखादी तरी कहाणी जोडलेली असे – ऐकूनही मी त्यांची विशेष दखल घेत नसे, असो.
मी ठरलेल्या दिवशी विभाग कार्यालयात सकाळी बरोबर दहा वाजता हजर झालो. वास्तविक पहिलाच दिवस असल्यामुळे मी थोडा सावकाश गेलो असतो तरी चालणार होते. त्या काळी मुंबईहून औरंगाबादला थेट रेल्वे सेवा नव्हती. मनमाडला रात्री अपरात्री दुसरी गाडी बदलून जावे लागे. तो त्रास नको म्हणून मी डोंबिवली-औरंगाबाद एस्.टी रातराणीने गेलो. मी राहायचो ठाण्याला पण गंमत म्हणजे ठाण्याहून औरंगाबादला थेट बस नव्हती! डोंबिवलीहून मात्र होती! आणि बॉम्बे सेंट्रलहून बऱ्याच होत्या. पण ठाणे बॉम्बे सेंट्रल द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा डोंबिवली परवडली. पण मी उगाच त्या फंदात पडलो असे झाले. रातराणी नाव पण ही राणी फाटक्या वस्त्रांची म्हणजे जुनाट गाडी, खिडक्या धड उघडत नाहीत बंद होत नाहीत अशा, रात्रीचा प्रवास, रस्त्यावर भरपूर खड्डे, थंडी मी म्हणतेय, असा संध्याकाळी सात ते पहाटे पाच पर्यंतचा प्रवास, हाडे खिळखिळी झालेली, झोपेचे खोबरे झालेले, असे असूनही मी शिस्तीचा भोक्ता त्यामुळे सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात फक्त एक शिपाई आणि देशपांडे आणि जाधव हे दोन कर्मचारी सोडता चिटपाखरुही नाही! देशपांडे मला ओळखत होते. काही कामानिमित्त ते मुंबईच्या मुख्यालयात आले होते तेव्हा आमची ओळख झाली होती. माझ्या शिस्तीची त्यांना कल्पना होती. मला पहाताच ते पुढे आले.
“या साहेब, सुस्वागतम्’ त्यांनी मला रशीद अहमद साहेबांच्या केबिनमध्ये नेऊन बसवले. बसतो ना बसतो तोच शिपाई आत आला. अतिशय अदबीने त्याने पाण्याचा ग्लास माझ्यासमोर धरला आणि म्हणाला.
“जी पानी साब.” डाव्या हातावर पाण्याचा ग्लास उजवा हात ग्लासवर पालथा धरलेला आणि अत्यंत अदबीने लवून तो ग्लास देण्याची त्याची पध्दत मला फारच भावली, मी पाणी घेतले, त्याला हसून प्रतिसाद दिला तसा तो दोन पावले मागे गेला आणि मला सलाम करून बाहेर गेला, मी देशपांडेकडे पाहून म्हणालो.
“देशपांडे हे ऑफिस आहे का नबाबाचा दरबार?”
“साहेब ही सगळी रशीद अहमद साहेबांची शिकवण. ते हैद्राबादच्या निजामाचे म्हणे दूरचे नातेवाईक आहेत. हैद्राबाद खालसा झाल्यावर ते महाराष्ट्र सरकारच्या नोकरीत वर्ग झाले. पण वागण्याबोलण्याच्या पध्दतीत तोच नबाबी थाट चालू आहे. इथे लोकांची मिठास बोली आणि नबाबी देखावा सोडला तर बाकी सर्व कारभार’चलता है’ आणि ‘अच्छी बात है’ या दोन परवलीच्या शब्दांवर चालतो.”
“गंमतच आहे, बरं पण दहा वाजले तरी तुम्हा दोघांतिघांशिवाय अजून कोणाचाही पत्ता नाही? कधी येतात सगळे?”
“साहेब ती दहाची वेळ तिकडे पुण्या मुंबईकडे ठीक असेल पण इथे अकराशिवाय आपल्याच काय पण इतर कोणत्याच कार्यालयात कामकाज सुरु होत नाही.”
“काय सांगता? म्हणजे खानसाहेबही अकरा वाजता येणार? आज कार्यभार द्यायचा आहे हे तरी ठाऊक आहे ना त्यांना?”
“साहेब जुन्या जमान्यातली माणसं. त्यातून खानदानी रीतीरिवाज अंगी” मुरलेले. आता एकदम सुधारणे कठीण. पण माणूस मात्र एकदम दिलदार, दिलखुलास.”
“ठीक आहे, पण मला हे चालणार नाही. आज ठीक आहे. उद्यापासून मी माझ्या पध्दतीने बघतो काय ते. बरं आता थोडा वेळ आहे तर मला तुम्हीच इथल्या कामाची थोडी माहिती द्या. विशेष म्हणजे काही अत्यंत तातडीचे काम असेल तर ते आधी सांगा.”
“साहेब तशी कामे खूप आहेत पण खानसाहेबांनी टो टो पद्धतीने ती पुन्हा तिकडून आली तिकडे पाठवली आहेत.”
“टोटो पद्धती म्हणजे?”
“टो टो पद्धती म्हणजे टोलवाटोलवी पद्धत. एखादे काम आले की दुसऱ्याच दिवशी त्यात काहीतरी उणे काढून ते परत आले तिकडे टोलवायचे. एकदा बॉल दुसऱ्या रिंगणात टोलवला की पुन्हा तो कधी परत येईल याची चिंता करायची नाही. आगे जो होगा देखा जायेगा असा पवित्रा घ्यायचा. त्यामुळे साहेब आपल्या कार्यालयाकडे पेंडिंग केस म्हणजे प्रलंबित प्रकरण एकही नाही. हा एक केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे पण खानसाहेब म्हणतात त्याच्याशी आपला काय संबंध? तो केंद्र सरकार आणि पुरातत्व खात्याचा मामला आहे.”
“असं? काय आहे हा प्रस्ताव?”
“साहेब वेरुळ आणि अजिंठा इथली लेणी जागतिक वारसा म्हणजे वर्ल्ड हेरिटजच्या यादीत समाविष्ट केली आहेत. त्यांचे योग्य पद्धतीने जतन व्हावे म्हणून केंद्र सरकारची योजना आहे आणि जपान सरकारने त्यात पुढाकार घेऊन सर्व प्रकारची मदत देण्याचे कबूल केले आहे. त्याबाबतीत जपानी तज्ज्ञांच्या शिष्टमंडळास योग्य ते सहकार्य करावे अशा केंद्र सरकारकडून सर्व संबंधितांना सूचना वजा आदेश आहेत. वास्तुशास्त्रज्ञ म्हणून आपल्या कार्यालयालाही कळवले आहे. गेल्या वर्षी जपानी तंत्रज्ञ आले होते. त्यांनी सखोल पहाणी करुन आपल अहवालही केंद्राला सादर केला होता. त्यावर आपले अभिप्रायही मागवले होते.’
“मग? काय कार्यवाही केली आपण?”
“टोटो पध्दतीप्रमाणे खानसाहेबानी तो प्रस्ताव पुरातत्त्व खात्याच्या अंगणात टोलवून दिला आहे. आपल्याला काहीच करावयाचे नाही.”
“काय सांगताय? अहो आपल्या विभागातले एवढे महत्त्वाचे काम, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नोंद घेतलेले, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने या विभागाचा कायापालट घडवू शकणारे इतके महत्वाचे काम आणि आपल्याकडे प्रस्ताव पाठवूनही आपण खाका वर करायच्या? देशपांडे अहो अशा संधी वारंवार मिळत नसतात. जागतिक दर्जाच्या योजनेमध्ये काम करण्याची ही सुवर्ण संधी आपण सोडायची नाही. खानसाहेबांचे मत काहीही असो मी याचा पाठपुरावा करणार आहे. ते सर्व कागदपत्र तयार ठेवा. थोड्यावेळाने खानसाहेब येतील. मी कार्यभार घेईन. आपण त्यांना निरोप देऊ आणि लगेच या कामाच्या मागे लागू. बरंती जपानी मंडळी पुन्हा कधी येणार आहेत?”
“उद्या संध्याकाळी, परवा ते पुन्हा कामाचा आढावा घेण्यासाठी वेरुळला भेट देणार आहेत.”
काय परवा? देशपांडे मग तर आपल्याला फार घाई करायला हवी. अरेरे हा विभाग मागासलेला आहे पण इतका? ओ गॉड! देशपांडे’ आपल्या कार्यालयाला गाडी नाही. पल्याला वेरुळला जायचे तर आपण कसे जायचे?”
“साहेब तांत्रिक कारणामुळे आपल्याकडे गाडी नाही. पुणे विभागात कॉमनपूलमध्ये गाड्या आहेत. आपण मागणी केली तर आपल्याला मिळेल.
“ठीक आहे तशी व्यवस्था करा. खानसाहेबांकडून कार्यभार घेताच आपण खुलताबादला जाऊ.” खुलताबादमध्ये वेरुळची लेणी येतात. औरंगाबादहून तिथे जायला साधारण दीड दोन तास लागतात.
(क्रमश:)
–विनायक अत्रे
Leave a Reply