रात्रीच्या गप्पांमध्ये खडसे साहेबांनी सांगितले होते की या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने एक छोटीशी दीड दोन फूट रुंदीची कॉक्रीटची पाय वाट आहे ती थेट वेरुळाच्या कैलास मंदिराच्या माथ्याच्या उंचीपर्यंत जाते आणि तिथून जगातील एकमेव असे ते डोंगरातून खोदून काढलेले परंतु एक स्वतंत्र इमारत आहे असे वाटणारे मंदीर फार छान दिसते. दिवसा उजेडी तर ते मंदीर अप्रतिमच दिसत असणार परंतु अशा टिपूर चांदण्यातल्या देखाव्याची मजा काही औरच असणार. माझी पावले आपोआप त्या दिशेने पडू लागली. मी त्या पायवाटेजवळ पोहोचलो. जेमतेम दीड दोन फूट रुंद अशी ती सिमेंट काँक्रीटची पायवाट होती आणि चांदण्यात अशी चमकत होती जणू चांदीच्या रसाचा एक
ओहोळ त्या पठारवजा डोंगरावरुन वहात चाललाय! जस जसा मी त्या पायवाटेवरुन पुढे पुढे जाऊ लागलो तसतसे नजरे समोर येणारे दृश्य अत्यंत मोहक भासू लागले. चांदण्या रात्रीत मी खूप भटकंती केली होती पण असा नजारा मी कधी अनुभवला नव्हता. अशा सुंदर स्वर्गीय वातावरणाची निवड त्या प्राचीन बुध्द महंतांनी का केली असावी याचे मला नेहमीच गूढ वाटत असे. आज मात्र त्या निवडीमागे त्यांचे निसर्गप्रेम आणि निसर्गाशी तादात्म्य होण्याची भावना मला कळल्यासारखे वाटले. मी हळूहळू चालत का तरंगत? त्या कैलास मंदिराजवळ येऊ लागलो. त्याचे शिखर आणि त्या पठाराची उंची एकाच पातळीवर होते. पठारातून कोरुन, पठार फोडून ते मंदीर वेगळे काढले होते आणि जणू एखादी स्वतंत्र इमारत बांधावी तसे ते दगडातून अक्षरशः कोरुन काढले होते! मी जस जसा जवळ जाऊ लागलो तस तसे ते मंदीर आणि आसपासचा प्रदेश दिसू लागला आणि एका वेगळ्याच दृश्याने मी अचंबित झालो आणि डोळे फाडून ते दृश्य पाहू लागलो!
मंदिराच्या सभोवारच्या गुंफा शेकडो दीपांनी उजळल्या होत्या! मंदिरासमोरचा भाग रांगोळ्यांनी सुशोभित केला होता! स्त्री पुरुषांची लगबग चालू होती आणि ते सर्व स्त्री पुरुष जवळ जवळ नग्नच होते! लज्जा रक्षणापुरतेच त्यांच्या कटिबंधावर पांढऱ्या शुभ्र आणि रंगीत मोत्यांच्या आणि रत्नांच्या, सोनेचांदीच्या दागिन्यांच्या माळा, हार, इत्यादी होते. बाकी स्त्री पुरुषांचे देह संपूर्ण उघडे होते! आता माझ्या लक्षात आले की ते सर्व मंदिरातील आणि लेण्यातील शिल्पांसारखेच होते. जणू ती शिल्पे जिवंत होऊनच वावरताहेत! त्यांच्या बोलण्याचे आवाजही वर माझ्यापर्यंत येत होते पण त्यांची भाषा आणि ते काय बोलताहेत हे मला कळत नव्हते. एवढे मात्र लक्षात येत होते की ती सगळी मंडळी कुणाच्या तरी स्वागताची तयारी करत असावी. एखाद्या वास्तूचे, प्रकल्पाचे उद्घाटन करायला एखादी महत्त्वाची व्यक्ती येणार असावी आणि तिच्या स्वागतासाठी लगबग चालू असावी तसेच ते दृश्य होते!
मी आश्चर्याने पहात असताना खाली गलबलाट आला, जणू, आले, आले! पाहुणे आले! अशा प्रकारचा! खरोखरच एक अत्यंत राजबिंडा, लखलखता मुकुट धारी, उंचापुरा कोरीव शिल्पाप्रमाणे देखणा, राजपुरुषा सारखा पुरुष उतरला! अत्यंत दिमाखाने त्याने आजूबाजूला दृष्टी फिरवली! तो खूप खूष झाल्यासारखा दिसला. रुबाबाने त्याने मंदिराकडे चालायला सुरुवात केली. तो मध्येच थबकला आणि त्याने आपल्या बरोबरच्या लोकांना काहीतरी विचारले. काय विचारले कोण जाणे पण जो तो त्याला काहीच उत्तर न देता एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला! त्याने अत्यंत रागाने पुन्हा काहीतरी विचारले. त्यातील फक्त एकच शब्द मला कळला, ‘पद्मावती’ मग माझ्या लक्षात आले की तो पद्मावती कुठे दिसत नाही ती कुठे आहे अशासारखे काहीतरी विचारत असावा आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना समजत नसावे असे भाव त्यांच्या देहबोलीतून दिसत होते.
इतक्यात त्याचे लक्ष वर डोंगराकडे जाणाऱ्या अरुंद पायवाटेकडे गेले आणि तिथून जाणाऱ्या दोन आकृती त्याला दिसल्या. मी ही तिकडे नजर टाकली! डोंगराच्या उतरणीवरुन दोन व्यक्ति वर चढत होत्या. त्यातली एक स्त्री होती नखशिखांत हिरे माणकांच्या मोत्यांच्या दागिन्यांनी लगडलेली, डोक्यावर त्या राजपुरुषाच्या डोक्यावरील लखलखत्या राजमुकुटाप्रमाणेच परंतु थोडा लहान आणि नाजूक मुगुट होता. तिची चाल अत्यंत मोहक वाटत होती. अप्रतिम शरीर सौंदर्याचा ती अद्भुत नमुनाच होती. तिचा हात पकडून चालणारा युवकही अत्यंत देखणा, रुपवान होता. मानेपर्यंत रुळणारे काळेभोर केस, रुंद मजबूत खांदे, सिंह कटी, अत्यंत देखणे प्रमाणबध्द शरीर, अजंठा वेरुळ मधील सुंदर शिल्पांचा तो जिवंत नमुनाच वाटत होता. ते दोघेही आपापसात काहीतरी बोलत बोलत डोंगर चढत होते. ते एकमेकांत इतके गुंग होते की खाली चाललेल्या गलबलाटाकडे त्यांचे लक्षही नव्हते. मधेच थांबून तो युवक त्या स्त्रीला हातवारे करुन कैलास मंदिराकडे आणि सभोवारच्या गुहांकडे पाहून काहीतरी सांगत होता. तो बहुतेक तिला त्या कलाकृतीची माहिती देत असावा. इतक्यात त्यांच्या कानावर खालून जोरात मारलेली हाकपडली! “पद्मावती! थांब!!!”
त्या दोघांनी चमकून हाकेच्या दिशेने पाहिले! पद्मावतीची दृष्टी खाली उभ्या असलेल्या त्या राजबिंड्या पुरुषावर पडली आणि तिने घाबरुन प्रियकराचा- हो तो तिचा प्रियकरच असावा हात घट्ट पकडला ! ते दोघे घाईघाईने वर चढू लागले! तो मुकुटधारी आणि त्याच्या बरोबरचे अंगरक्षकही त्यांच्या मागे धावले! डोंगर चढू लागले! पद्मावती थांब, पद्मावती थांब, म्हणून आवाज देऊ लागले! परंतु त्यांना बिलकुल दाद न देता ती दोघे अत्यंत त्वरेने वर पठारावर आली. आता मला ते दोघे अगदी स्पष्टपणे दिसू लागले. वेरुळच्या शिल्पाप्रमाणे आणि अजिंठ्याच्या भित्ती चित्रात दाखविल्याप्रमाणे काळी सावळीच परंतु इतकी प्रमाणबध्द सुंदर देहयष्टीची माणसे खरोखरच असतील का ती फक्त शिल्पकार आणि चित्रकार यांनी कल्पना शक्तिच होती असा मला प्रश्न पडत असे. पण आज ती सर्वच चित्रे, शिल्पे जिवंत वावरतांना मी पाहात होतो!
ते प्रेमी युगुल धावत पळत मंदिराच्या मागच्या डोंगर माथ्यावर आले. मी तिथे जवळच एका झाडामागे उभा होतो. तो युवक त्या त्रिभुवन सुंदरीला वरुन मंदीर आणि आसपासचा परिसर दाखवून काहीतरी सांगू लागला. इतक्यात तो राजासारखा दिसणारा पुरुष आणि त्याच्या बरोबरचे अंगरक्षकही वर पोहोचले! दुरुनच पद्मावतीला अत्यंत जरबेने जागेवरच थांब. हलू नको अशी आज्ञा केली. पद्मावती थरथर कापत होती! परंतु तिच्या प्रियकराने तिला घाबरु नको असे काहीतरी समजावून सांगितले. तो राजपुरुष दमदार पावले टाकत आणि हातातील तलवार परजत त्यांचेकडे येऊ लागला! पद्मावतीचा आणि तिच्या प्रियकराचा अंत आता मला पहावा लागणार असे वाटून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले! कारण आता डोंगराच्या दुसऱ्या बाजूनेही अंगरक्षकांचे एक पथक वर आले होते! ते दोघे आता कोंडीत सापडले होते!
त्या युवकाने पद्मावतीचा हात घट्ट पकडला आणि तो पठाराच्या वरच्या बाजूला पळू लागला! पण त्याचे पळणे निरर्थक होते. कारण तो राजा, म्हणजे राजपुरुष आणि त्याचे अंगरक्षक यांची संख्या पहाता त्यांच्या तावडीतून त्या दोघांची सुटका होणे शक्यच नव्हते. बरे मंदिराकडे जावे तर मंदिराच्या आसपासचा संपूर्ण डोंगर कोरुन काढलेला होता त्यामुळे जवळ जवळ शंभर एक फूट खोल कडा उभाच्या उभा तासलेला होता! त्या कड्यावरुन उडी मारणे म्हणजे कपाळमोक्ष करुन घेणे! दोन्ही कडून मरणच! आता काय पहावे लागणार त्या नुसत्या कल्पनेनेच मी थरथरु लागलो! पण पुढे जे पाहिले ते मात्र अद्भुत, अविश्वसनीय, कल्पनेच्या पलिकडचे होते! चित्तथरारक होते!!
त्या युवकाने आपल्या प्रेयसीचा हात पकडला होताच. तो आता पुन्हा कैलास मंदिराकडे वळला! क्षणभर श्वास घेतला आणि दोघेही जोरात मंदिराकडे धावू लागले! कड्याच्या टोकापर्यंत आले आणि त्यांनी उडी मारली! माझ्या काळजात धस्स झाले! तो राजपुरुष आणि त्याचे अंगरक्षकही क्षणभर थक्क झाले! पण पुढे जे घडले ते अकल्पित! त्या तरुण युगुलाने उडी मारली ती थेट त्या कैलास मंदिराच्या कळसावरच! चांगली पन्नास एक फूट दूर! आणि तिथून जी झेप घेतली ती थेट वर आकाशात! आणि दोघेही तरंगत तरंगत वर वर जात अदृश्य झाले!! ते दृश्य पहाणारी सगळी मंडळी थक्क झाली!! मी नुकताच एक चिनी सिनेमा पाहिला होता. त्यातील राजकुमारी राजवाड्याच्या पटांगणातून झेप घेते ती थेट राजवाड्याच्या छतावर आणि तिथून थेट आकाशात आणि तिच्या मागोमाग तिच्या पाठलागावर असलेला खलनायकही तशीच झेप घेतो! मला त्याच दृश्याची आठवण झाली!
क्षणभरातच सगळे भानावर आले आणि मग मी जे पाहिले ते तर फारच भयानक! तो राजपुरुष आणि त्याच्या बरोबरच्या सर्व अंगरक्षकांनीही कड्याकडे धाव घेतली आणि कड्याच्या टोकावर येताच त्या सगळ्यांनी कळसाकडे झेप घेतली! पण त्यांची झेप तिथपर्यंत पोहोचलीच नाही! ती सर्वजण कड्यावरुन थेट खाली शंभर फुटावर खालच्या दगडी फरसबंदीवर कोसळली!! त्यांचा कपाळमोक्षच झाला!! आणि त्यांच्या कर्णबधीर करणाऱ्या किंचाळ्यांनी सगळा आसमंत निनादून उठला!!
इतका वेळ अत्यंत आल्हाददायक, नयनमनोहर, रोमांचित करणारे ते टिपूर चांदणे आणि स्वर्गीय वातावरण एकाएकी बदलले! एखाद्या रुग्णालयातल्या शवागारासारखे ते अभद्र वाटू लागले! चारी बाजूंनी अदृश्य परंतु ज्याची जाणीव होत होती अशा थंडगार स्पर्शानी मला घेरल्यासारखे झाले! त्यांच्या अक्राळ विक्राळ भेसूर पांढऱ्या फटफटीत आकृत्या बनून वावटळी सारख्या माझ्याभोवती नाचू लागल्या माझी शुध्द कधी हरपली कळलेच नाही!!
जाग आली ती दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सूटवर बिछान्यात! बशीरभाई समोर उभा होता! मला जाग आली तसा तो म्हणाला.
“साहेब काल त्रिपुरी पौर्णिमा होती. मी सांगायचे विसरलो. त्या दिवशी तिकडे लेण्यांच्या बाजूला कोणी जात नाही.”
“का?”
“साहेब असे म्हणतात शेकडो वर्षापूर्वी ज्या राजाने ती लेणी कोरली तो राजा, त्याची राणी आणि शिल्पकार यांचे आत्मे त्या परिसरात भटकतात! तुमचा बिछाना रिकामा दिसला, म्हणून मी तुम्हाला शोधायला निघालो तर वर पठारांवर तुम्ही बेशुध्द झालेले सापडलात!! खैर अल्लातालाने आपको बचाया!”
कधी वेरुळला गेलात तर कैलास लेणे पाहिल्याशिवाय वेरुळच्या लेण्याची गंमत कळणार नाही. फारच अप्रतिम शिल्प आहे ते जगातील एकमेव आणि भारतीय शिल्पकारांच्या अजोड कौशल्याचे प्रतीक.
शिल्पकलेतील कैलासच जणू! शिवाय खुलताबादच्या विश्रामगृहाच्या मागच्या अंगाने जाणाऱ्या पायवाटेने जाऊन थेट शिखराच्या उंचीवरुन ते कैलासमंदीर आणि त्याचा परिसर जरुर पहा. फक्त चांदण्यारात्री आणि विशेष करुन त्रिपुरी पौर्णिमेला त्या भागात फिरकू नका! तशा सूचना तिथे लावाव्यात असा प्रस्ताव होता पण अंधश्रध्देला खतपाणी घालणे झाले असते ते. म्हणून ती सूचना बाद झाली. पण विश्रामगृहाचा खानसामा जरुर सांगतो. बाकी काय करायचे ते तुम्ही ठरवायचे, काय? सूज्ञास इशारा काफी, काय खरं ना?
(समाप्त)
–विनायक अत्रे
Leave a Reply