आजचे युग विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाकडे जो डोळेझाक करील तो, आजच्या युगात जगत असूनही मागासला समजला जाऊ लागला आहे. तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला एका सूत्रात गुंफून जवळ आणले आहे. क्षणात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती वा स्थळाशी संपर्क साधता येतो. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने खगोलशास्त्रातही मानवाने भरारी घेतली आहे. विद्वानांच्या संशोधानांनी ज्ञानाचे क्षेत्र व्यापक झाले आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने प्रत्येक काम सोपे होऊ लागले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मात्र आज तंत्रज्ञानही अभिशाप ठरू पाहत आहे. अभियांत्रिकीचे विधार्थी असलेले कैलाश कोगेकर यांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्या संकेतस्थळांचा शोध लावला.
आज भ्रमणध्वनी(मोबाईल) जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे, याच मोबाईल क्रमांकाच्या आधारे अनेकांना फसविण्याचे प्रकार काही संकेतस्थळांच्या माध्यमातून सुरु झाले. कोणत्याही मोबाईल क्रमांकाचा वापर, खोटा कॉल करण्यासाठी केला जाऊ शकतो. बंद असलेल्या क्रमांकाचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. खोटा कॉल करून आर्थिक फसवणूक, धमकी देणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे केले जाऊ शकतात. परंतु गुन्हेगार मात्र नामनिराळाच राहू शकतो.
अश्या प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्यांना, मदत करणाऱ्या एकंदर अठरा संकेतस्थळांचा, अमरावतीतील धारणी येथील कैलाश कोगेकरांनी शोध लावला आहे. या सायबर गुन्ह्याचे प्रात्यक्षिकही “तरुण भारत” वृत्तपत्राला करून दाखविले, तसेच धारणी पोलिसांना माहितीही दिली. कैलाश कोगेकर या संगणक तज्ञाने यानंतर या सायबर गुन्हेगारी विरोधात जनजागृती करण्याचे ठरविले आहे. कैलाश कोगेकरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अश्या चिकित्सक तज्ञांना सरकारने प्रोत्साहन देऊन योग्य त्या सोयी देण्याची गरज आहे.
Leave a Reply