एका घरामध्ये एक गोजीरवाणं बाळ जन्माला आले. गोरे, गोरेपान. गोबरे, गोबरे गाल. लालचुटुक जिवणी. पाणीदार डोळे, मानेवर रुळणारे कुरळे जावळ आणि इवले, इवलेसे हातपाय. त्या गुटगुटीत बालकाला पाहून सर्वजण मोहून जायचे. त्याला अंजारायचे, गोंजारायचे.
एके दिवशी ते बाळ आजारी पडले. तापाने फणफणले. त्या घरात एक आजीबाई होत्या. आजीने बटव्यातील जडीबुटी बाळाला उगाळून दिली. बाळ सुधारु लागले. आजीबाईंच्या मनात आले अमक्या तमक्याची नजर लागली असेल, इडापिडा टळू दे, अमक्या तमक्याची दृष्ट न लागो. असे म्हणत आजीबाईंनी बाळाची मीठ मोहर्यांनी दृष्ट काढली. आझीबाईंनी निरांजनावर अंजन तयार केले व ते काळे अंजन बाळाच्या पाणीदार डोळ्यात घातले. गोर्या गालावर तीट लावली.
डोळ्याला ते काळे काजळ काही आवडले नाही. डोळ्याला वाटले इतर अवयव बघा किती भाग्यवान ! कानाला मिळाली सोन्याची कर्णफुले, हाताला सोन्याच्या बांगड्या, बोटाला सोन्याची अंगठी, पायाला चांदीचे वाळे, कमरेला साखळी, गळ्याला गोफ तोही सोन्याचाच ! माझ्या वाट्याला मात्र भिकारडे काजळ !
इतर अवयावांचे सौंदर्य दाग दागीन्याने वाढले. माझे सौंदर्य मात्र काळ्या काजळाने कमी केले. मला एखादा दागीना दिला असता तर बरे झाले असते. चेहर्याचे सौंदर्य तर पाणीदार, टपोर्या डोळ्यातच आहे. त्याला मात्र काळे काळे कवडीमोल काजळ. डोळ्याला वाईट वाटले. डोळ्यातले पाणी खळकन बाळाच्या गालावर ओघळले.
आजीबाईंनी बाळाच्या डोळ्यातले पाणी पाहले व त्या म्हणाल्या “छकुल्या, काजळ घालताना डोळ्यात पाणी येणारच. पण आता तुला कुणा कुणाची दृष्ट लागणार नाही. कारण सगळ्यांची नजर आधी काळ्या काजळाकडे जाईल मग माझ्या छकुल्याकडे.
अशातर्हेने आजीबाईने काजळाला महत्व प्राप्त करून दिले आणि सौंदर्यप्रसाधनात स्थान देऊ केले ते आजतागायत !
— स्वाती ओलतीकर
Leave a Reply