अभिनेत्रींचं जीवन, हे चढ उतारांचं असतं, हे सर्वश्रुत आहे. मात्र डिंपल एवढी जीवनातील वादळं, फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला आली असावीत.
चुन्नीभाई कापडिया हे एक व्यापारी होते. ते आपल्या पार्ट्यांना, फिल्मी कलाकारांना आमंत्रित करायचे. अशाच एका पार्टीत राज कपूर यांनी, त्यांच्या मोठ्या मुलीला पाहिलं. त्यावेळी ते ‘बाॅबी’ चित्रपटासाठी नवीन षोडशवर्षीय नायिकेचा शोध घेत होते. तिला पाहून, त्यांचा ‘नायिकेचा शोध’ पूर्ण झाला.
‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशानंतर त्यांना, व्यावसायिक चित्रपट करायचा होता. सोळा वर्षांच्या डिंपलला घेऊन त्यांनी आपला सुपुत्र, ऋषी कपूर बरोबर एक रोमॅंटिक चित्रपट सादर केला. कथा, गाणी, मुक्त प्रणय यामुळे या चित्रपटाने अफाट यश मिळविले. त्या वेळच्या तरुणपिढीला, या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले.
पहिल्याच चित्रपटाला डिंपल कपाडियाला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. मात्र त्याच दरम्यान तिचं राजेश खन्नाशी लग्न झाल्यामुळे संसारासाठी, तिला चित्र’संन्यास’ घ्यावा लागला. अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म आठ तारखेचा असतो, त्यांच्या जीवनात फार संघर्ष असतो.
लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी तिला पहिली मुलगी झाली, ती ट्विंकल! तीन वर्षांनी झाली, ती रिंकी. दहा वर्षे तिने मुलींचं संगोपन करत, घरात बसून काढली. दरम्यान राजेश खन्नाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. त्यांचे अनेक चित्रपट अयशस्वी होऊ लागले होते.
दोघांमध्ये मतभेद होतच होते. शेवटी डिंपलने बारा वर्षांनंतर, चित्रपटात पुनरागमन केले. १९८५ मधील ऋषी कपूर सोबतच्या, ‘सागर’ चित्रपटाने तिला दुसऱ्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. यानंतर तिने सलग उत्तम चित्रपट देऊन त्या काळातील श्रीदेवी, जयाप्रदा, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री यांच्या स्पर्धेत टिकून राहिली.
‘राम लखन’ मध्ये ती जॅकी सोबत होती. ‘नरसिंम्हा’ मध्ये सनी देओल, ‘प्रहार’ मध्ये नाना पाटेकर, ‘रुदाली’ मध्ये राज बब्बर, ‘दिल चाहता है’ मध्ये अक्षय खन्ना सोबत. अशा विविध भूमिका तिने साकारलेल्या आहेत.
सनी देओल सोबत काम करताना, त्याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. अशा गोष्टींमुळे राजेश खन्ना नैराश्यात गेले. त्यांना ‘आप की कसम’ चित्रपटातील ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है मुकाम, वो फिर नहीं आते.’ गीताप्रमाणे प्रत्यक्षात जगणं नशिबी आलं.
डिंपलची मोठी मुलगी, अभिनेत्री ट्विंकलचं अक्षयकुमार बरोबर लग्न झालं. रिंकीनं चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश काही मिळालं नाही. २०१२ साली राजेश खन्ना नावाच्या ‘सुपरस्टार युगा’चा अस्त झाला.
डिंपलनंही नंतर निवृत्ती स्वीकारली. तिच्या आयुष्यात चित्रपट कारकिर्दीच्या, दोन इनिंग झाल्या. पहिली एकाच ‘बाॅबी’ चित्रपटाची, तर दुसरी सुमारे सत्तर चित्रपटांची. पहिल्या चित्रपटात ती नवखी होती. मात्र ‘सागर’ चित्रपटापासून या सिनेसृष्टीत टिकून रहाण्यासाठी तिनं स्वतःला ‘बोल्ड’ असल्याचं सिद्ध केलं. चाळीशीनंतर तिच्या अभिनयाला खरा कस लागला.
‘क्रांतीवीर’ चित्रपटात नाना इतकीच लक्षात राहते, ती ‘कलमवाली बाई’! त्यात ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा ‘सहायक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. आज क्रांतीवीर चित्रपटाला प्रदर्शित होऊन अठ्ठावीस वर्षे झालेली आहेत, तरीदेखील पत्रकार महिलेचे, नानाने केलेले ‘कलमवाली बाई’ हे तिचं ‘बारसं’, सिनेरसिक कधीही विसरू शकत नाही.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-६-२२.
Leave a Reply