नवीन लेखन...

कलासरगम – एक स्वगत

कलासरगम ही ठाण्यातील सांस्कृतिक नाट्यचळवळ घडवणारी हौशी नाट्यसंस्था. या संस्थेने आम्हाला काय दिलं? सांगू…
‘शून्यातून विश्व कसं उभं करायचं’ ते या संस्थेने शिकवलं. झिरो balance असताना गणेशोत्सवात १० x १० च्या स्टेजवर श्याम फडके, बबन प्रभू, वसंत सबनीस इत्यादी विनोदी लेखकांची तीन अंकी नाटके बसवून दहा दिवस ट्रेन, एसटीने किंवा टेम्पोने (boxset) प्रवास करून ठिकठिकाणी साखर कारखाने, गल्लीबोळात प्रयोग करायचे आणि जमा झालेला पैसा राज्य नाट्यस्पर्धेत ओतायचा आणि परत शून्यावर यायचं. कुठलाही स्वार्थ नाही की चढाओढ नाही. नटांचे नखरे नाहीत, मिळेल आणि पडेल ते काम, हमाली सगळं निमूटपणे कुठलीही कुरकुर न करता आनंदानं करायचं.

त्यावेळी मॉबच्या नाटकांची लाट असायची. ग्रुप मोठ्ठा फोफावत असल्याने कमी अनुभव असणारे पण उपजत नट मी सुहास डोंगरे सारखे कमी रोल असल्याने दिग्दर्शकाला भंडावून सोडत. मग तालमीतून दिग्दर्शक विजय जोशीचा सभात्याग. मग त्याला समजावणारे आम्हीच. राज्यनाट्याच्या एका तालमीत गडकरीची पॉवर गेली. म्हटलं, चला तालीम सुटली. पण विजय जोशीची जिद्द. मंडईतून भाजीवाल्यांकडून पेट्रोमॅक्सच्या बत्त्या आणल्या. आमच्याकडूनच आणि पुढे तालीम चालू, प्रसंगावर मात कशी करायची ते शिकलो यातून. कठीण इंग्रजी नावं असणारी नाटकं आम्ही करायचो. मुळात त्यातले अर्थ समजून घ्यायची पोचच आमची नव्हती. पण विजय जोशी पूर्ण नाटकात एक वाक्य असलं तरी त्याचा अर्थ तो अर्धा तास समजावून सांगे. डोक्यात किती जायचा तो भाग वेगळा. पण त्याचं महत्त्व आज कळतंय. प्रत्येकाकडे काटेकोर लक्ष दिलं जायचं. दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर हे पण नंतरचे दिग्दर्शक म्हणून धुरा वहायचे. पण ते सौम्य वृत्तीचे. मी राहायला मुलुंडला, ठाण्यालाच पडलेला असायचो. दीड महिना ‘असायलम्’ नाटकाची तालीम. नाटकात एकच वाक्य. पॉझ घेतला आणि प्रफुल्ल आठवलेंनी संधी साधली. माझं वाक्य तो म्हणाला, मला संपूर्ण नाटकात काही नाही, नेमके वडील नाटकाला आलेले… असा झापला घरी! दीड महिना हेच करत होतास का? आयुष्यात मला परत बोलवायचं नाही असा हग्या-दम भरला. तोच मॉबचा म्होरक्या आज व्यवस्थापनातला मॉब लीड करतोय.

अचाट, अफाट कल्पना तसेच वेडेवाकडे पण अर्थपूर्ण नेपथ्य. ‘अश्वमुद्रा’साठी सायकलचे रिम मग फिरताहेत, सगळे सायकलीच्या दुकानावर, मरमर मरायचं. त्यावेळी सांगकाम्या सारखी काम करायचो. पण प्रयोगात सेट लागला की त्या मरमरीच सार्थक व्हायचं. दुसरं वसंत आबाजी डहाकेंचं ‘श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कुणाचाही खून ः संदर्भ भाऊबंदकी’ असलं लांबलचक नाव असलेलं दुमजली नेपथ्य असणारं नाटक म्हणजे नाट्यवेडेपणाचं मूर्तिमंत उदाहरण. विजय जोशीच्या गच्चीवर याची तालीम. विश्वास कणेकरने नोसिल कंपनीतून आणलेले स्कँफोल्डिंग. हे नाव उच्चारायची वेगळी तालीम आम्ही आपसात करायचो. त्यात महाराज (अनंत गोखले) चे वेगळेच latin words आम्ही ‘कन्फुज.’ राजा कणेकर हा त्यावेळी अंबानीसारखा भासे. अशा नाटकाच्या प्रयोगाला झालेले गच्चीवर एकमजली सेटवर तालीम करताना वरून खाली पाहताना बऱ्याच जणांना व्हर्टिगोचा त्रास होई, तालमीपुरता. नौपाड्याचा ट्रॅफिक कंट्रोल आम्ही तालीम करत करत बघत असत. प्रत्यक्ष प्रयोगावेळी किस्से खूप घडले. उदय सबनीसची अनाऊन्समेंट मस्त व्हायची. आजच्या त्याच्या डबिंग कारकीर्दीचा तो पाया असावा बहुदा. चिंचोळ्या जिन्यातून तुळोजी (गारदी) झालेला, मी नारायणरावाचा खून करून त्याला उचलून एक मजली जिना चढून घेऊन जाताना झालेली दमछाक, त्यात तलवार म्यानात जात नव्हती. ही ‘भंबेरी, ब्रह्मांड आठवणे’ म्हणजे काय ते त्यावेळी कळले. बरं वर पोहोचल्यावर दाराला लाथ मारली, नारायणाला टाकायला तर पुढच्या सीनमधल्या सुवासिनी रंजना भडसावळे आणि इतर बायका ओवाळणी घेऊन उभ्या. रोल कमी. त्यात त्या सिनियर. त्यामुळे ओरडायची पण सोय नाही. निमूट नारायणाला फेकला आणि सुटलो. परीक्षणात लगेच माझा उल्लेख श्रीहरी जोशींनी केला. ‘भूषण तेलंग तुळोजी दिसले, वाटले मात्र नाहीत.’ या सगळ्याचं तेव्हढ्यापुरतं वाईट वाटायचं, नंतर चूक उमजून पुढची चूक करण्याच्या तयारीला लागायचो.

सुरुवातीचा पोरकटपणा नंतरच्या काळात कमी झाला. मग आपण आणि आपली संस्थाच ग्रेट. दुसऱ्याच्या तालमीला गेलो की संस्थेच्या दबदब्यामुळे इतर दिग्दर्शक आणि कलाकार कॉन्शस होत. मग ती टिमकी वाजवली जायची. पण तेवढेच कुमार सोहोनीच्या नाटकांना किंवा उज्ज्वला टकले म्हणजे आताची श्रद्धा सोहोनीच्या अभिनयाला आम्ही सलाम करायचो. ‘मा अस साबरीन’, ‘अथं मनुस जगन हं’ला संस्था विरोध विसरून आमच्यातलं कोणीतरी कुमारला म्हटलं होतं. प्राथमिक फेरी काय, फायनलला पण पहिलं येणार आणि तेच झालं. स्पर्धा, हमरीतुमरी, असुया असायची. पण निखळ स्पर्धा पण होती. अभिवादन कल्याणच्या रवी लाखेचं नाटक ‘कलासरगम’ करायची, अशोक बागवेच्या ‘कलासरगम’च्या नाटकात रवी लाखे अभिनय करायचा. मित्रसहयोगचे अशोक साठे, नंदू नाईक, प्रबोध कुलकर्णी, विनायक दिवेकर, शशी जोशी, आदर्शचे केशवराव मोरे. सगळ्या संस्थांना नाटक पुरवणारे श्रीहरी जोशी, पुष्पाताई जोशी, भालचंद्र रणदिवे, डोंबिवलीचे नेपथ्य, प्रकाशयोजनाकार सुरेश मगरकर या सगळ्यांची नाटकाबद्दल असणारी आस्था यामुळे थोडेफार असणारे वैचारिक मतभेद वगळता सगळे ‘कलासरगम’ जोडलेलेच होते.

‘कलासरगम’ने नंतर पी. सावळारामांच्या गाण्यांचा ‘अक्षय गाणी’ हा कार्यक्रम नरेंद्र बेडेकरच्या संकल्पनेतून भाऊ डोके, प्रफुल्ल आठवले, नेपथ्यकार प्रसन्न ढगे यांच्या परिश्रमातून साकार केला आणि जुन्या भावगीतांच्या या कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ‘कलासरगम’ने नाटकाप्रमाणेच संगीताचे नवीन दालन उघडलं, ज्यात नरेंद्र बेडेकरचं अभ्यासपूर्ण निवेदन. उदय सबनीस सारख्या नटातल्या गायकाला पण ‘अक्षय गाणी’मुळे संधी मिळाली.

आम्ही ‘कलासरगम’मध्ये यायच्या आधी स्वतबद्दलच्या अचाट आणि अफाट कल्पनेत, हवेत वावरायचो. विजय जोशी यांनी केलेले संस्कार, माणूस म्हणून घडवण्याचे मोल मोठे आहे. आज जमिनीवरून चालतो आहोत तेही मानाने, नावानिशी, अभिमानाने ते केवळ ‘कलासरगम’मुळे. असे घडलो, घडवले गेलो. ‘कलासरगम’मुळे!

–भूषण तेलंग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..