“कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !!
तेच तेच रहाटगाडगं ढकलत “रटाळ” झालोय आपण !!
कधी जुन्या आठवणींचं मळभ दाटून “ढगाळ” झालोय आपण !!
आजचं काम उद्यावर ढकलून “ढिसाळ” झालोय आपण !!
क्रोध आणि अविचाराना एकत्र आणत “वाचाळ” झालोय आपण !!
श्रद्धा – अंधश्रद्धा वाद कवटाळत “विटाळ” झालोय आपण !!
वेगवेगळ्या समस्यापूर्तीसाठी मानगुटीवर बसणारा “वेताळ” झालोय आपण !!
कुटुंब आप्तेष्टांच्या भाव भावनांमध्ये गुंतून “वेल्हाळ” झालोय आपण !!
की मायेचा ओलावा हवेत विरून “दुष्काळ” झालोय आपण !!
आयुष्याला पिळून पिळून चिपाड काढणारं “गुऱ्हाळ” झालोय आपण !!
तर कधी मानसिक आघात झेलत झेलत “घायाळ” झालोय आपण !!
कधी हतबलपणे सगळं स्वीकारत “मवाळ” झालोय आपण !!
उगाच कशाच्याही समर्थनाचे गोडवे गात “मधाळ” झालोय आपण !!
स्वैरपणे स्वतः साठीच जगण्यात “खट्याळ” झालोय आपण !!
समाजाची कसलीच तमा न बाळगत “टवाळ” झालोय आपण !!
विविध अविष्कारांतून नवरसांचा आस्वाद घेत “रसाळ” झालोय आपण !!
कधी रोज डेली “सोप” घासून घासून “फेसाळ” झालोय आपण !!
पारदर्शी विश्वासात गैरसमजाची भेसळ करत “दुधाळ” झालोय आपण !!
संयम आणि धीर सोडून, उतावीळ होत “तात्काळ” झालोय आपण !!
साऱ्या जगाच्या अपेक्षा, चिंता स्वतःहून कवेत घेणारं निरभ्र “आभाळ” झालोय आपण !!
की इच्छेविरुद्ध गृहीत धरत टिळा लावण्यासाठी हक्काचं “कपाळ” झालोय आपण !!
कळतंच नाही आजकाल काय झालोय आपण, कसे झालोय आपण !!
तात्पुरते असे कितीही आले टप्पे, तरी अंधारातून उजेडाकडे नेणारी प्रसन्न “सकाळ” होऊया आपण !!
तोडणाऱ्या शक्ती कितीही आल्या, तरी कायम एकसंध राहणारी घट्ट “माळ” होऊया आपण !!
दोन्ही हाताना जवळ आणत नादनिर्मिती करणारी “टाळ” होऊया आपण !!
पुढच्या – मागच्या पिढीला सतत जोडून ठेवणारी “नाळ” होऊया आपण !! पुढच्या – मागच्या पिढीला सतत जोडून ठेवणारी “नाळ” होऊया आपण !!
© क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply