नवीन लेखन...

कालातीत

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अंजलि पुरात यांची ही पूर्वप्रकाशित कथा


” टाइम मशीनची थिअरी तोवर सिद्ध होणार नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही, जोवर मागील किंवा पुढील काळात गेलेली व्यक्ती आजच्या काळात परत येऊन तिचे अनुभव पुराव्यानिशी सादर करीत नाही.” टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. देवाशीष रॉय आपले भाषण संपवून प्रेक्षागृहातील श्रोत्यांवर अभिमानाने नजर फिरवीत आसनस्थ झाले. नकळत, अखेरच्या क्षणी त्यांची नजर डॉ. विल्सनवर क्षणभरच विसावली. डॉ. विल्सनच्या चेहऱ्यावरील किंचितशी स्मितरेषा डॉ. रॉयना एक अनामिक दडपण देऊन गेली. पण नेहमीप्रमाणेच डॉ. विल्सनना दुर्लक्षून डॉ. रॉय चाहत्यांच्या गराड्यात अभिनंदन स्वीकारीत आपल्या कारकडे मार्गस्थ झाले.

ड्रायव्हरने दरवाजा उघडल्यावर मागील सीटवर स्वत:ला झोकून देताना मिळालेले पुष्पगुच्छ व रंगीबेरंगी, चकचकीत वेष्टनांत गुंडाळलेल्या गिफ्ट्सवर नजर टाकताना डॉ. रॉय सुखावले. मानेखाली मऊ उशी सरकवताना एका अनोळखी आयताकृती बॉक्सवर त्यांची नजर स्थिरावली. हा बॉक्स कुणी, कधी हातांत दिला, त्यांना प्रयत्न करूनही काहीच आठवेना. क्षणभर मनात पसरलेल्या अस्वस्थपणाला निग्रहाने दूर लोटीत डॉ. रॉयनी आजच्या यशाच्या ग्लानीत डोळे मिटून घेतले.

ड्रायव्हरने अदबीने दरवाजा उघडून धरताना झालेल्या हलक्या आवाजामुळे डॉ. रॉयनी डोळे उघडले. हॉटेलमध्ये प्रवेश करताना दरवानाने पाय जुळवीत मारलेल्या सॅल्यूटने डॉ. रॉय सुखावले. डॉ. रॉयना येताना पाहून काउण्टरवरल्या तरुणीने तत्परतेने रूमची किल्ली त्यांच्या हातात ठेवली. डॉ. रॉय लिफ्टकडे वळले. ड्रायव्हर पुष्पगुच्छांची उतरंड व विविध आकारांचे बॉक्सेस घेऊन त्यांच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरणार, तोच डॉ. रॉयनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ड्रायव्हर वरमला. तो लिफ्टच्या बाहेरच अदबीने उभा राहिला.

डॉ. रॉय आपल्या रूममध्ये शिरले आणि फ्रिजमधून थंडगार व्हिस्कीची बाटली काढून टेबलावरच्या ग्लासात पेग भरत असतानाच दरवाज्यावर हळुवार टकटक झाली. “येस, कम इन !” म्हणताच ड्रायव्हरने शक्य तितक्या अदबीने आत येऊन पुष्पगुच्छ व गिफ्ट्स साइड टेबलावर मांडले. डॉक्टरांची नजर त्याच बॉक्सवर स्थिरावली. त्यांची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तरी शक्य तितक्या बेफिकिरीने ड्रायव्हरला त्यांनी तो बॉक्स खुणेने दाखविला. ड्रायव्हरने अदबीने तो बॉक्स डॉक्टरांच्या हातात ठेवला. ड्रायव्हर, त्यांची नजर बॉक्सवर खिळलेली पाहून, तीच आज्ञा समजून मागे-मागे परतत निघून गेला.

डॉ. रॉयनी त्या बॉक्सचे निरीक्षण करीत, त्यात काय असेल याचा अंदाज बांधत त्या बॉक्सवरील वेष्टन हलक्या हाताने बाजूला सारले. न जाणो, त्यात एखादी किमती नाजूक वस्तू असू शकेल. बॉक्स उघडतानाच एक नाजूक किणकिण कानांवर पडत होती आणि हलका कंपही हातांना जाणवत होता. डॉ. रॉयच्या मनात एक अस्वस्थ हुरहुर दाटून आली. बॉक्स उघडताक्षणी त्यांच्या नजरेला एक कमालीचे सुंदर, नाजूक ‘टाइमपीस’ नजरेला पडले. डॉ. रॉयची नजर त्या टाइमपीसवर खिळून राहिली. ही इतकी देखणी, महागडी वस्तू देणाऱ्याचा चेहरा काही केल्या त्यांना आठवेना. ते टाइमपीसच इतके अनोखे होते, की डॉक्टरांना ते आठवण्याची गरजही वाटेनाशी झाली. त्या डिजिटल व अॅनालॉग, दोन्ही वेळा दाखविणाऱ्या टाइमपीसमध्ये वेळेबरोबर डिजिटल कॅलेण्डरचीही सोय होती. गोल्डन डायलवर हिरव्या रंगात वेळ व डावीकडे निळ्या मंद प्रकाशात आजची तारीख झळकत होती. तारीख आजचीच होती, पण संध्याकाळ होऊनही वेळ मात्र दुपारची होती. डॉ. रॉयच्या कपाळावरची शीर नकळत तटतटली; कारण ती वेळ डॉ. विल्सनसाठी राखून ठेवलेल्या दुपारच्या सेशनची होती. ती तीच वेळ, जेव्हा डॉ. विल्सन भाषणासाठी उभे राहिले होते.

डॉ. रॉयना घड्याळातसुद्धा दिसणारी ती वेळ सहन होईना. त्यांनी लगबगीने टाइमपीसवरील रिसेटचे बटण दाबीत भिंतीवरच्या घड्याळातील वेळेशी वेळ जुळविण्याची खटपट सुरू केली, पण काही केल्या वेळ पुढे सरकेना! पुन्हा एकदा डॉ. विल्सनची मूर्ती डॉ. रॉयच्या मनात तरळून एक अस्वस्थपणा पेरून गेली. त्याच अस्वस्थतेत डॉ. रॉयनी घड्याळाची वेळ मागे फिरविताच मात्र काटे भराभर फिरले आणि सोबतच कॅलेण्डरची तारीखही मागे फिरली. डॉक्टरांच्या मानेवर कुणीतरी थंडगार बर्फाचा खडा फिरविल्याचा भास झाला. त्याच वेळी एसी चालू असूनही हातांच्या तळव्यांना घामही फुटला. एक विचित्र लहर सर्वांगातून फिरली. घशाला कोरड पडली. त्यांनी घाईघाईने टेबलावरचा व्हिस्कीचा ग्लास ओठांना लावला. कडवट चव तोंडात घोळवत, पोटात थोडीशी व्हिस्की गेल्यावर त्यांना थोडी तरतरी आली. त्यांचे मन घड्याळाविषयी आडाखे बांधीत असताना हे नक्कीच ‘टाइम मशीन’ आहे आणि डॉ. विल्सननीच वेळ साधून आपल्यापर्यंत पोहोचविले आहे याची त्यांना प्रथम जाणीव व हळूहळू खात्री पटू लागली.

विस्मयचकित होत, ‘पण का? माझीच निवड का?’, हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. एकदा डॉ. विल्सनशी बोलण्यासाठी त्यांचा हात मोबाइलकडेही गेला. पण त्यानी स्वत:ला आवरले. त्यांनी एका मागोमाग एक शक्याशक्यता प्रयोगशील पद्धतीने मांडण्यास सुरुवात केली. ‘डॉ. विल्सननी आपल्या भाषणासोबत टाइम मशीनचा डेमो सादर केला असता, तर ते जास्त सयुक्तिक झालं असतं. प्रयोग सिद्ध झाला असता तर… जगभर त्यांची वाहवा झाली असती. वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञांनी, रिसर्च सेंटर्सनी, युनिव्हर्सिटीजनी, राजकीय नेतृत्वानं त्यांचा ‘न भूतो न भविष्यति’ असा भव्यदिव्य सत्कार केला असता. विविध परिषदांची अध्यक्षपदे, अमेरिकन प्रेसिडेण्टसह खास मेजवानीचा बेत, ‘टाइम्स’ च्या पहिल्या पानावर टाइम मशीनच्या शोधासंबंधी मोठ्या मथळ्याखाली डॉ. विल्सनचा फोटो झळकला असता आणि… पण नंतर आपलं भाषणच झालं नसतं!’ विचारांती त्यांची अस्वस्थता अधिकाधिक वाढत गेली.

‘मग डॉ. विल्सननी टाइम मशीन आपल्याला पाठविण्याचं कारणच काय? डॉ. विल्सनना मी भूतकाळात शिरून तिथंच अडकून पडावं ही तर अपेक्षा नाही. डॉ. विल्सनच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहताच कायम मंद स्मित झळकण्यामागं आपल्याविषयी कोणती हीन भावना तर जागृत होत नसेल ना? त्या हीन भावनेतूनच आपल्याला या जगातून नाहीसं करण्याची ही योजना असेल का?’ डॉ. रॉय उलटसुलट विचारात गढून गेले.

डॉ. विल्सन कॉलेज जीवनात किंवा त्यानंतरही कधी कुणाशीही सूडबुद्धीने वागल्याचे डॉ. रॉयना काही केल्या आठवेना. डॉ. रॉयनी युनिव्हर्सिटीतील पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. पण तरीही डॉ. विल्सनची तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्यांना सतत डिवचत राही. मग डॉ. रॉय अधिकच हिरिरीने प्रत्येक परीक्षेत, व्यासपीठावर डॉ. विल्सनवर मात करण्याची पराकाष्ठा करीत. डॉ. रॉयना त्यांच्या प्रयत्नात सातत्याने यशही मिळत असे. डॉ. विल्सननी कधीच आक्रमकता दाखविली नाही किंवा डॉ. रॉयच्या प्रयत्नांवर कुरघोडी करण्याचीही तसदी घेतली नाही. ते सतत स्वत:च्याच विचारांत मग्न असत, कुणालाही मदत करण्यास तत्पर असत. रिसर्च प्रॉजेक्ट्समध्ये त्यांच्यातली अभ्यासू वृत्ती जाणविल्याने प्रत्येकालाच त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा वाटत असे.

कॉलेजजीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर अशी एक घटना घडली, की डॉ. रॉयच्या मनात डॉ. विल्सनविषयी अढी निर्माण झाली. फायनल परीक्षेनंतर पुढील रिसर्च फेलोशिपसाठी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये डॉ. विल्सनची झालेली निवड डॉ. रॉयना कमालीची डिवचून गेली. डॉ. रॉयच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीतील फेलोशिप, नंतर कायमचे अमेरिकेतील वास्तव्य या स्वप्नांना तडा गेला. तरुणवयातला तो सल, तो कडवटपणा आणि डॉ. विल्सनची आठवण यांचे एक अनोखे मिश्रण डॉ. रॉयच्या तळमनात गेली छत्तीस वर्षे खोलवर दडून बसले होते. पुढील काळात डॉ. रॉयनीदेखील अनेक रिसर्च पेपर्स वाचले, देशोदेशी मान्यता मिळविली. पण एकाच व्यासपीठावर किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. विल्सनची भेट झाली, की एक विचित्र लहर डॉ. रॉयना शरीरभर पसरलेली जाणवत असे. डॉ. रॉय अशा प्रसंगी अधिकच आक्रमकपणे डॉ. विल्सनचे मुद्दे खोडून काढीत असत.

आज हे सर्व आठवून डॉ. रॉयच्या मनात ‘डॉ. विल्सनची आपल्याला नाहीसं करण्याची ही चाल तर नसावी,’ असा विचार डोकावून गेला. पण एकीकडे टाइम मशीनविषयीची उत्सुकताही त्यांच्यातल्या शास्त्रज्ञाला स्वस्थ बसू देत नव्हती. भूतकाळात डोकावण्याचा निर्णय कधी झाला हे डॉ. रॉयना उमगलेच नाही. ते नकळतच भूतकाळातली कोणती घटना टाइम मशीनच्या आधारे बदलावी, याचा आढावा घेऊ लागले. यश, कीर्ती, पैसा, डॉ. रॉयना कशाचीच ददात नव्हती; पण मन वारंवार एका घटनेकडे ओढ घेत होते.

गेल्याच वर्षी क्वांटम थिअरीच्या एम.आय.टी. रिसर्च सेंटरमध्ये डायरेक्टर पदावर नियुक्ती होऊन अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हायची संधी हातून निसटली होती. या वेळी त्यांच्याच हाताखाली पीएच.डी. केलेल्या तरुण डॉ. गोयलला तो बहुमान मिळाला. परत एकदा युनिव्हर्सिटी ऑफ हार्वर्डसारखीच संधी कुणीतरी हिसकावून घेतली होती. “तरुणांना आपणच वाव दिला पाहिजे,” या शब्दांत सर रिचर्ड्सनी त्यांचे सांत्वन केले होते. ‘आज टाइम मशीनद्वारे ती हुकलेली संधी आपण मिळवू शकू का? का नाही? आपल्याला दोघांचेही प्रॉजेक्ट डीटेल्स माहीत आहेत, आपण सहज प्रॉजेक्टच्या नकाश्याची अदलाबदल करू शकू. आज इथून भारतात परत जाण्याऐवजी आपण अमेरिकेतल्या आपल्या बंगल्यातच जाऊ शकू.’ हळूहळू ही कल्पना डॉ. रॉयच्या मनात रुंजी घालू लागली. काही वेळातच कल्पनेची नशा त्यांच्या तनामनात इतकी भिनली, की इतर कोणत्याही शक्याशक्यता पडताळून पाहण्याचेही भान त्यांना राहिले नाही.

टाइम मशीनवर गेल्या वर्षीची प्रॉजेक्ट सबमिशनच्या आदल्या दिवसाची तारीख व वेळ डॉ. रॉयनी स्वत:च्याही नकळत सेट केली… आणि क्षणार्धात डॉ. रॉय त्या काळातील आपल्या कॅबिनमध्ये पोहोचले. त्यांनी भराभर प्रॉजेक्टमध्ये आवश्यक ते सर्व बदल केले. ठरल्या वेळी प्रॉजेक्ट रिपोर्ट्स सादर झाले आणि डॉ. रॉयचा प्रॉजेक्ट मंजूर झाला. प्रथमच त्यांनी मनापासून डॉ. विल्सनचे आभार मानले. डॉ. रॉयना हातातली ती ऑर्डर पाहून हर्षवायू व्हायचाच बाकी होता. अखेर त्यांची स्वप्ने साकार झाली होती. आता त्यांना घाईघाईने आजच्या क्षणाकडे परतायचे होते आणि तसे ते आलेसुद्धा. सोफ्यावरचा फोन कधीचा वाजत होता. मिसेस रॉय थोड्याशा रागावूनच “घरी न येता हॉटेलवर का गेलात?” म्हणून बोलल्या. त्यांच्या रागावण्याने डॉ. रॉयची खात्री पटली, की आता ते कायमचे अमेरिकेत स्थायिक आहेत.

अमेरिकेतील स्वत:च्या बंगल्यात परतायची त्यांना घाई होती. अचानक, त्याच वेळेस एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला. ‘डॉ. विल्सन अमेरिकेतच वास्तव्याला आहेत. टाइम मशीन आपल्याकडेच आहे आणि डॉ. विल्सनचा बंगलाही इथूनच काही अंतरावर आहे. टाइम मशीनची सर्व सिक्रेट्स, ग्राफ्स, रचना डॉ. विल्सन यांच्या बंगल्यातील व्हॉल्टमध्ये सुरक्षित असणार. जर ते सर्व आपण मिळवू शकलो तर…’ या विचारांनीसुद्धा डॉ. रॉयच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांसमोरून टाइम्सच्या पहिल्या पानावर ठळक मथळ्याखाली त्यांचा कुणीही शास्त्रज्ञ इतक्या सहजासहजी ती हाती लागू देणार नाही. डॉ. विल्सन त्यांच्या बंगल्यात एकटेच राहतात, तेव्हा त्यांना…’

एक क्षणभर त्या विचारांनीसुद्धा डॉ. रॉयच्या मनाचा थरकाप झाला; पण थोड्याच वेळात मनावर ताबा मिळवून ते पुढील योजना कागदावर मांडू लागले. टाइम मशीनची सार्थकता तर त्यांनी अनुभवली होतीच. एकदा डॉ. विल्सनना संपवल्यावर टाइम मशीनच्या आधारे ते व्हॉल्टचा सिक्युरिटी कोडही मिळवू शकले असते. त्यांनी कागदावर नजर फिरवीत पुन:पुन्हा सर्व शक्याशक्यता तपासून पाहिल्या. बस, आजच्या रात्रीत ठरल्याप्रमाणे सर्व पार पडले म्हणजे झाले. टाइम मशीनच्या पहिल्या यशाने त्यांचे मानसिक बळ कैक पटींनी वाढले होते.

प्रथम डॉ. रॉयनी मिसेसना फोन करून आज हॉटेलवरच वास्तव्य करणार असल्याचे सांगितले. मिसेसने चिडखोर स्वरात का होईना, संमती दिली. डॉ. रॉयनी रूममध्येच जेवण मागविले व दाराबाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’ चा बोर्ड लटकावला. भराभर जेवण संपवून त्यांनी ओव्हरकोट चढविला, मानेवरची कॉलर वर चढविली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. हॉटेलमध्ये सामसूम पसरली होती. टेबलावरची फळे कापायची सुरी खिशात ठेवून ते लॉण्ड्री दरवाज्याने बाहेर पडले. टाइम मशीनच्या साहाय्याने यत्किंचितही संशय न येता, आपण सुरी परत होती तशीच जागेवर ठेवू शकू याची त्यांना पूर्ण खात्री होती. डॉ. रॉय टाइम मशीनच्या साहाय्याने भविष्यकाळात जाऊ शकत नव्हते, त्यामुळे डॉ. विल्सनना संपविण्याची कृती त्यांना प्रत्यक्ष काळातच करणे गरजेचे होते. त्यासाठी लागणारी मानसिक तयारीही झाली होती. थोडे चालून गेल्यावर त्यांनी कॅब थांबविली आणि डॉ. विल्सनच्या बंगल्याच्या अलीकडील चौकाचा पत्ता सांगितला. चौकात कॅब पोहोचताच खाली उतरून ते डॉ. विल्सनच्या बंगल्याच्या दिशेने चालू लागले. मनातल्यामनात, ‘डॉ. विल्सनची आपल्याला अचानक समोर पाहून काय प्रतिक्रिया होईल? आपल्याला हवं तसंच सर्व घडेल ना?’ या विचारांची उलथापालथ चालू होती. आता त्यांना काळजी होती ती फक्त चालू काळाची. गतकाळातील कोणतीही परिस्थिती आपण टाइम मशीनच्या साहाय्याने पार पाडू शकू, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला होता.

विचारांनी भारलेल्या अवस्थेतच डॉ. रॉयनी रात्री एकच्या सुमारास बंगल्याच्या पोर्चमध्ये प्रवेश केला. आजपर्यंत डॉ. रॉयनी, जेव्हा केव्हा डॉ. विल्सनना सामोरे जावे लागल्यावर जी थंड शिरशिरी अंगभर पसरत असे, तीच पुन्हा एकदा अनुभवली. भीतीवर मात करीत उजव्या हातातला सुरा पाठीमागे लपवीत डॉ. रॉयनी बेल वाजविली. दार उघडले जाताच सामोरे आलेल्या डॉ. विल्सनच्या पोटात सर्वशक्तीनिशी डॉ. रॉयनी सुरा खुपसला. घावच एवढा वर्मी होता, की दुसऱ्याच क्षणी डॉ. विल्सन खाली कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. विल्सनकडे डॉ. रॉयनी एक कटाक्ष टाकला. डॉ. विल्सनच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे मंद स्मित पाहून पुन्हा एकदा डॉ. रॉयच्या अंगभर एक थंड शिरशिरी व्यापून राहिली. मरतानासुद्धा एखाद्याच्या चेहऱ्यावर तेच मंद स्मित कसे काय असू शकते याचे त्यांना क्षणभर कोडे पडले, पण आता वेळ दवडून चालणार नव्हते. जवळ टाइम मशीन असूनसुद्धा, कारण वर्तमानासाठी त्याचा काहीही उपयोग नव्हता. त्यांनीसुद्धा भराभर बंगल्यातील स्टडी रूम शोधून काढली. त्यांच्या कयासाप्रमाणे बंगल्याच्या वरच्या भागात, मागील बाजूस निसर्गाच्या सान्निध्यात स्टडी रूम होती. स्टडी रूममध्ये पुस्तकांच्या कप्प्यांत ते अशी एखादी जागा शोधू लागले, जिथे पुस्तके किंवा एखाद्या वस्तूचा फक्त आभास असेल. मुळात शास्त्रज्ञ असल्याने मेथॉडॉलॉजी वापरून अशी एखादी जागा शोधणे त्यांच्यासाठी मुळीच अवघड नव्हते. थोड्याच वेळात ती त्यांना सापडली. आता डॉ. रॉय व्हॉल्टसमोर उभे होते.

टाइम मशीनचा उपयोग करून डॉ. विल्सननी कालच्या परिषदेला निघण्यापूर्वीचा काळ निवडला, की व्हॉल्टचा डिकोड सहजी मिळेल आणि आपण आतली शोधफाईल हस्तगत करू. आत्मविश्वासाने भारलेल्या अवस्थेतच डॉ. रॉयनी टाइम मशीनमध्ये वेळ भरली व ते व्हॉल्ट डिकोड व्हायची वाट पाहू लागले. व्हॉल्ट उघडला तर गेला, पण त्याच वेळी त्यांना खांद्यावर एका मजबूत हाताची पकड जाणवली. तो हात दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचा नसून डॉ. विल्सनचाच आहे याची जाणीव डॉ. रॉयना क्षणार्धात झाली आणि परत एकदा तीच थंड शिरशिरी अंगभर पसरली. डॉ. विल्सनच्या चेहऱ्यावर मात्र तेच मंद स्मित पसरले होते. त्यांनी डॉ. रॉयना हाताला धरून जवळच्याच कोचावर बसविले. आता आपली सुटका नाही, आपण हे काय करून बसलो या जाणिवेने डॉ. रॉय ओशाळले, लज्जित झाले. त्यांची ती अवस्था पाहून डॉ. विल्सननी पाण्याचा ग्लास पुढे केला.

डॉ. रॉय थोडे स्थिरस्थावर झाल्यावर डॉ. विल्सन बोलू लागले, “मला माहीत आहे, कॉलेजच्या अखेरीला फेलोशिपच्या हुकलेल्या संधीमुळे तुम्ही दुखावले होतात. पण काळाच्या ओघात तुम्ही सर्व विसराल असं मला वाटलं होतं. शास्त्रज्ञाचं मन आणि बुद्धी संशोधनाशी, शास्त्राशी प्रामाणिक असावी. खऱ्या शास्त्रज्ञाचा तो धर्म आहे. तुम्ही मात्र कायम यश, कीर्ती, पैसा यांच्या मागं लागून अधिकाधिक आक्रमक बनत राहिलात. संशोधन कधीच मागं पडलं, मग इतरांनी केलेलं संशोधन कसं फोल आहे, यावरच तावातावानं शेरे मारीत टाळ्या मिळवीत राहिलात. आणि आज माझा खून करण्यापर्यंत तुमची मजल गेली. तुम्ही तुमची प्रखर बद्धिमत्ता चुकीच्या मार्गाकडे वळविलीत. कॉलेजजीवनात तुम्ही कायम यशाच्या शिखरावर होतात. मला तुमच्याबद्दल आदर होता. कालच्या भाषणात तुम्ही माझ्यावर टीका केलीत, माझ्या स्वभावाप्रमाणे मी टीकेला उत्तर म्हणून तुम्हाला टाइम मशीन भेट दिलं. तुम्हांला टाइम मशीनची उपयुक्तता कळल्यावर तुम्ही मनातलं किल्मिष काढून माझ्याकडे याल अशी मला आशा होती. पण तुमच्या मनात लालसा निर्माण झाली.

तुमच्यातला शास्त्रज्ञही कधीच लोप पावला आहे. नाहीतर, मेथॉडॉलॉजीअनुसार तुमच्या सहज लक्षात आलं असतं, की तुम्ही माझा खून केल्यावर मागील काळात जाल, तेव्हा मी जिवंत असेन. एका अर्थी, हे सर्व ठीकच झालं म्हणायचं, कारण मी हे संशोधन आता कधीच जगापुढं मांडणार नाही. तुमच्यासारख्या शास्त्रज्ञालासुद्धा स्वार्थ इतक्या हीन पातळीवर नेत असेल तर… हे टाइम मशीन असंच माझ्या व्हॉल्टमध्ये पडून राहू दे. काळाच्या ओघात कोणा हाती लागेल, तेव्हा काळच ठरवू दे त्याचा भविष्यकाळ. मी मात्र यापुढं असंच संशोधन करायचा प्रयत्न करीन, ज्याचा शक्यतो गैरवापर होणार नाही.” डॉ. विल्सन बोलायचे थांबले.

डॉ. रॉय हताशपणे त्यांच्याकडे पाहत होते. या टाइम मशीनचा हा शेवटचा प्रयोग असे म्हणत डॉ. विल्सननी रात्री एकची वेळ लावली. तत्क्षणी डॉ. रॉयना आपण बंगल्यातील दारासमोर उभे असल्याचे आढळले. क्षणभर रेंगाळून दारावरची बेल न वाजविताच डॉ. रॉय माघारी फिरले.

दुसऱ्या दिवशी सकाळी, ‘डू नॉट डिस्टर्ब’चा दारापाशी पडलेला बोर्ड पाहून रूमबॉयने, “रूम सर्व्हिस, सर,” म्हणत दारावर हळुवार टकटक केली. आतून काहीच प्रतिसाद नाहीसा पाहून त्याने मॅनेजरला बोलाविले. डुप्लिकेट किल्लीने दार उघडल्यावर ओव्हरकोट घातलेल्या अवस्थेत, बुटांसकट डॉ. रॉय पलंगावर पडलेले दिसले. मॅनेजरने तत्काळ हॉटेलच्या नियुक्त डॉक्टरना बोलाविले. डॉक्टरनी ‘मॅसिव्ह हार्ट ॲटॅक’चे निदान करून डॉ. रॉयना मृत घोषित केले.

दिवसभर डॉ. रॉयच्या अकस्मात मृत्यूच्या बातमीचे, त्यांच्यावर घाईघाईने केलेल्या फीचरचे, जगाच्या कानाकोपऱ्यांतून शास्त्रज्ञांनी पाठविलेल्या शोकसंदेशांचे, जगभरातील सर्व चॅनल्सवर डॉक्टरांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणारे प्रसारण होत राहिले.

हॉटेलच्या मॅनेजरनी रूमबॉयला बोलावून सुरीची किंमत पगारातून वजा करणार असल्याचे सांगितले व असा हलगर्जीपणा पुन्हा न करण्याची तंबी दिली.

डॉ. विल्सनना फक्त माहित होते की त्या एका रात्रीत कालातीत प्रवास करण्याचा ताण डॉ. रॉयना सहन झाला नव्हता.

अंजलि पुरात
विज्ञान कथालेखक
ssdeshmukh2709@gmail.com
वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा
– २०२१ द्वितीय (विभागून) पारितोषिक विजेती कथा

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अंजलि पुरात यांची ही पूर्वप्रकाशित कथा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..