हल्ली एक सगळीकडे –
नवीनच फॅड झालंय,
भावनांना समाजाच्या –
खूप महत्त्व आलंय.
कशामुळे दुखावतील त्या –
नाही सांगता यायचं ,
शक्यतो आपण आपलं –
सांभाळून बोलायचं.
जाती पक्ष नेते –
So called आदराची स्थानं,
कुणाहिसाठी कडवी होतात –
यांची बेताल मनं.
दुखावली की चालून येते –
झुंड अविचारी अंगावर,
सपशेल शरणागतीशिवाय पर्याय –
काहीच नसतो यावर.
पूर्वी चर्चा करून बोलणी –
मार्ग तरी निघायचा,
फारच धरलं ताणून तरी –
वादविवादाने सुटायचा.
हल्ली मात्र बोलण्याचं काम –
करतात दोन्ही हात ,
हमरीतुमरीवर येऊन कधीही –
दणादण सुरू करतात.
प्राण ओवाळून टाकावा असं –
कुठेच नाही दिसत कुणी,
जावं भरून विचारांनी असं –
काहीच पडत नाही कानी.
डोळे कान तोंड आवळून –
समोर घडणारं पहात रहा,
विषण्ण होऊन फक्त म्हणायचं –
कालाय तस्मै नमः .
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply