१ ऑक्टोबर २००२ रोजी ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मला मिळाला. अध्यक्षस्थानी ठाण्याचे महापौर रमेश वैती, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येतो. विख्यात व्हायोलिन वादक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एन्. राजम या संगीताच्या क्षेत्रातील माझ्याबरोबरच्या मानकरी होत्या.
हा पुरस्कार आणि पेढे घेऊन मी लगेचच माझे गुरु पं. विनायकराव काळे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. रागदारी संगीतातील महान व्हायोलिनवादक श्रीमती एन्. राजम यांच्याबरोबर मला हा पुरस्कार मिळाल्याचे ऐकून सर विशेष आनंदित झाले. ‘कितीही पुरस्कार मिळाले आणि कार्यक्रमांची संख्या कितीही वाढली तरी येणारा प्रत्येक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग हे एक नवीन आव्हान असणार आहे हे कधीही विसरू नकोस.’ सरांचा हा मोलाचा सल्ला कानात रेंगाळत असतानाच आणि उद्या गाण्याच्या क्लासला यायचे आहे हेही विसरू नकोस. हे त्यांचे पुढील शब्द कानावर पडले. संगीताच्या क्षेत्रात ऋषितुल्य काम करणारे काळे सरांसारखे गुरू मला लाभले हे माझे केवढे मोठे भाग्य! दुसऱ्या दिवशी माझ्या ठरलेल्या वेळी संध्याकाळी साडे सात वाजता सरांकडे गेलो. सर सकाळी सहापासून शिकवायला सुरवात करत. माझा क्लास हा त्या दिवशीचा शेवटचा क्लास असायचा. “कालच तुला पुरस्कार मिळाला आहे ना, मग आज तुझा आवडता राग घेऊ या.” असे म्हणत सरांनी मालकंस राग गाऊन घेतला. आपल्या गुरुंसोबत गाणे ही आनंदाची पर्वणी असते. आपण अगदी निर्धास्तपणे काहीही वेगळे गाऊ शकतो. कारण त्यात काहीही चुकले तर गुरू आपले बोट धरून पुन्हा आपल्याला योग्य त्या ठिकाणी आणतात. त्यादिवशी सरांनीच स्वरबद्ध केलेल्या ‘शतरंजकी चाल’ आणि ‘कारी कारी कारी कजरीया’ या मालकंसमधील रचना गाताना फारच आनंद झाला. गाणे संपवून तानपुरा खाली ठेवताना मला कल्पनाही नव्हती की सरांबरोबरचे हे माझे शेवटचे गाणे असणार आहे. आणि माझा क्लास त्या दिवशीचाच नव्हे तर सरांचाही शेवटचा क्लास असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मंगलाताईंचा फोन आला की बापूंना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. सरांना अस्वस्थ वाटत होते. तेव्हाही मला म्हणाले,
“काल चांगला गायलास. फक्त आलापी करताना घाई करू नकोस. स्वरांचा आनंद घेत आलाप गावेत.”
“मला नाही जमत ते अजून. तुम्ही लवकर बरे व्हा आणि मला शिकवा, मी म्हणालो. पण ती वेळ कधीच येणार नव्हती. दुसऱ्याच दिवशी सकाळी ४ ऑक्टोबर २००२ रोजी काळे सर आम्हा सर्वांपासून खूप दूर निघून गेले. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. सरांचा सहवास मला चोवीस वर्षे लाभला. सरांकडून फक्त गाणेच नाही तर बरेच काही शिकलो. ईश्वराला आपण दयाळू म्हणतो, पण तो तितकाच निष्ठुरदेखील आहे. आपली आयुष्ये समृद्ध करण्यासाठी सरांसारखी ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व तो आपल्या संपर्कात आणतो म्हणून दयाळू. तर आपल्याला कोणतीही कल्पना न देता अचानक तो अशा व्यक्ती आपल्यापासून दूर घेऊन जातो म्हणून निष्ठुर. सरांच्या मृत्यूमुळे माझ्या आयुष्यात एक भयंकर पोकळी निर्माण झाली. आजही मंगळवार आणि शुक्रवारी साडेसात वाजले की तंबोऱ्याचा नाद, त्यावर सरांचा विलक्षण आवाज आणि एका रागाची सरांनीच स्वरबद्ध केलेली रचना कानामध्ये ऐकू येऊ लागते आणि डोळ्यात अश्रू तरळतात.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply