काळ प्रवाही असतो आणि नकळत त्याच्याबरोबर आपल्याला सोबत न्यायचा प्रयत्न करीत असतो. काही थेंब सरकतात पुढे पण काही अडून बसतात- भूतकाळात रुतून बसतात. एखादी आशा भोसले काळानुरूप गायकीत नवनवे प्रयोग करीत असते. एखादा गायक शास्त्रीय रागदारीत प्रयोग करीत प्रवाहाला नव्या भूमीत नेत असतो- नवे किनारे,नवी माती आणि क्षणोक्षणी बदलणारे पाणी ! एखादा खेळाडू सर्वप्रकारच्या क्रिकेटच्या फॉरमॅटसशी जुळवून घेतो. अमिताभ सारखा कलावंत या वयातही तंत्रज्ञान आणि नवनवी व्यासपीठे समोर जाऊन पादाक्रांत करतो. गुलज़ार “बिडी जलाई ले “सारख्या ओळी ट्राय करतो आणि स्वतःच्या उंचीशी नवी हातमिळवणी करतो, एखादा जावेद अख्तर ” जिंदगी ना मिले दोबारा” मध्ये स्पॅनिश रॅप रचून बघतो.
दिवसागणिक अशा प्रयॊग करणाऱ्यांची आणि काळाशी सुसंगत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांची माझी यादी वाढत आहे. हा relevance खाद्य संस्कृती,करमणूक क्षेत्र, वाहन व्यवसाय आणि अशा सगळ्या दिशांनी पसरत चाललाय.
पण एकीकडे काही ठाम ध्रुव तारेही दिसतात जे स्वतःच्या अटी शर्तींसह काळाला वाकविण्याची धमक बाळगतात- उदा. साहीर ! या माणसाने फक्त आणि फक्त कविता आणल्या चित्रपटसृष्टीत आणि प्रत्येक शब्दाशी इमान राखले, कोणालाही त्यांच्या शब्दांशी ” खिलवाड ” करू दिली नाही. तरीही त्यांनी काळावर स्वतःचे नांव कोरले. ” त्यांची (?)” आवडती अमृता अशाच जातकुळीतील ! समझोता नाही, भलेही काळाचा प्रवाह अविरत पुढे खेचत असेल पण अशी माणसे सुसंगतीचा विचारच करीत नाही. पुढची व्यक्ती – लता ! तसेच सुरेश भट आणि मला अशी अनेक नांवे पाठ आहेत.
पण वयानुसार बरेचजण हळूहळू irrelevant होत जातात. काळाच्या चौकटीत दिसत नाहीत. नात्यांमधून,मित्रांच्या बैठकीतून बाहेर जातात,टाकले जातात. त्यांच्या आवडी-निवडी नजरेआड व्हायला लागतात. त्यांची मते विचारात घेतली जात नाहीत. संभाषणांमधून त्यांना वगळले जाते, शक्यतो दुर्लक्ष केले जाते. काळाकडून मिळणारी शिक्षा त्यांना आवडो वा नावडो, ती अपरिहार्य असते. दुर्दैवाने हा विसंगत होण्याचा प्रहार काहींच्या ध्यानीही येत नाही. आणि आलाच तरीही त्यांच्या हाती फारसे लागत नाही,धरून ठेवता येत नाही.
काळाच्या दोन बाजू (नाण्याच्या असतात तशा) सदैव सतावतात – आपण बरेचदा विसंगत बाजूला असतो आणि क्वचित सुसंगत बाजूला !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply