एकोणीसाव्या शतकात स्विस बॅंकेची स्थापना, स्वित्झर्लंडमध्ये झाली. १९३४ मध्ये बॅंकेच्या नियमावलीमध्ये, जगावेगळा बदल करण्यात आला. तो म्हणजे इथे पैसे ठेवणाऱ्यांना, ते पैसे कुठून आणले हे बॅंकेकडून विचारले जाणार नाही व त्यांच्या खात्याबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाईल. खातेदाराला एक पिन नंबर दिला जाईल त्या नंबरवरुनच बॅंकेचे सर्व व्यवहार केले जातील..
बॅंकेच्या या ‘अद्भुत’ सोयीमुळे जगातील राजकारणी, काळे धंदेवाले, चोर, दरोडेखोर, आर्थिक घोटाळे करणारे, भ्रष्टाचारी लोक व संस्था, स्मगलर, ड्रग स्मगलर यांनी आपला काळा पैसा या बॅंकेत जमा करण्यास सुरुवात केली..
काही वर्षांतच बॅंकेकडे कोट्यावधी रुपये जमा झाले. इथे पैसे काढणाऱ्यांपेक्षा भरणाऱ्यांची संख्या अधिक होती. सहाजिकच बॅंकेकडे अब्जावधी रुपये जमा झाले. काही वर्षांनंतर बॅंकेच्या असं लक्षात आलं की, काही खातेदारांच्या खात्यात मोठ्या रकमा पडून आहेत. त्याला कारणही तसंच होतं.. अशा खातेदारांचा खून किंवा अपघातात निधन झालं तरी या खात्याच्या गुप्ततेमुळे, ते पैसे परत घ्यायला कोणीही येणार नव्हतं..
अशा अब्जावधी रुपयांचा विनियोग काय करायचा, हा प्रश्न बॅंकेला पडला. बॅंकेला असं वाटलं की सर्व नागरिकांना हे पैसे वाटून टाकूया. त्याकाळी प्रत्येकाला एक कोटी रुपये मिळणार होते.. त्यांनी नागरिकांची मतं मागितली. ९०% नागरिकांनी या पैशाचा उपयोग स्वित्झर्लंड अधिक सुंदर करण्यासाठी करावा, असे सांगितले. १०% नागरिकांना, हे पैसे प्रत्येकाला वाटले जावेत, असं वाटत होतं. शेवटी बहुमतालाच प्राधान्य देऊन, स्वित्झर्लंड अधिक सुंदर करण्यासाठी ते पैसे खर्च केले गेले.. आणि त्याचीच परिणीती म्हणून आज संपूर्ण जगामध्ये, स्वित्झर्लंड हे स्वर्गाहूनही सुंदर असं शहर आहे.. जगभरातून नवविवाहित इथे हनीमूनसाठी येतात.. जगभरातील असंख्य चित्रपट निर्माते, शुटींगसाठी इथेच येतात…
अठ्ठावन्न वर्षांपूर्वी राज कपूरने ‘संगम’ चित्रपटाची निर्मिती केली.. प्रेमाच्या त्रिकोनाची कहाणी, आपल्या खास शैलीत सादर केली. चित्रपटात स्वित्झर्लंड येथे राज कपूर व वैजयंती माला यांच्यावर एका इंग्लिश गाण्याचे चित्रीकरण केलेलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला तीन तासांचा होता. त्याला दोन मध्यंतरं होती. यातील सर्वच गाणी अप्रतिम, त्यामुळे हा चित्रपट एकदा पाहून कुणाचंही समाधान होत नाही.. प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाची पारायणं केली.. चित्रपट यशस्वी झाला व राज कपूरने, त्या पैशातून पुण्यामध्ये लोणीजवळ, राजबाग खरेदी केली.
या राजबागेत व परिसरात अनेक चित्रपटांची शुटींग झालेली आहेत. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या चित्रपटाच्यावेळी मी प्रत्यक्ष शुटींग पाहिलेले आहे.. आज राजबागही राहिलेली नाही..
‘संगम’ चित्रपटाला अठ्ठावन्न वर्षे झाल्यामुळे, तो वयाने ‘निवृत्त’ झालेला आहे.. अशा भावनिक प्रेमकथा, आताच्या पिढीला पटणारही नाहीत.. त्यामुळे पडद्यावर ‘संगम’ पाहूनच स्वित्झर्लंडला जाऊन आल्याचं समाधान मानणारी.. आपली पिढी खरंच, नशीबवान!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
२४-६-२२.
Leave a Reply