नवीन लेखन...

काळ्या मातीशी करी हितगुज

काळ्या मातीशी करी हितगुज हिरवा श्रावण
कळ्या-फुलांशी करी हितगुज हिरवा श्रावण…

श्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न. वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण…. नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण…या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…

परंतु श्रावणाच्या आगमनाची वाट पाहता पाहता चार महिने उन्हाच्या आगीने अंगाची लाही लाही झालेल्या काळ्या मातीला आठवताना जीवच लाही लाही होतो…चैत्र-वैशाखात जेव्हा सूर्य आग ओकू लागतो तेव्हा….माणसं, पशु,पक्षी झाडाच्या सावलीचा आधार घेऊ लागतात आणि त्याचवेळी जिवाची लाही लाही होत असूनही पाण्यासाठी तरसत असलेली धरित्री आपल्याच पोटातील पाण्याची ओल अनंतकोटी झाडांना पुरवत असते..

किती तरसली माती
तेव्हा बरसलं नभ
कैक युगांचा जुनाच
आज कामी आला लोभ

इथल्या माणसांना, पशु- पक्षांना, झाडांना, वेलींना, पाना -फुलांना जगवण्याचं काम ही काळी माती अखंड करत असते. काळ्यामातीचं सगळ्या सजीवांवर असलेलं ऋण शब्दातीत आहे…….

यावर्षी मृग तर बरसलाच नाही.. रोहिणी भरणीच्या ओलाव्यानंतर अनंत दिसांची तृष्णा अधरात घेऊन तरसल्या धरित्रीने प्राशून घेतले धो-धो बरसल्या पावसाचे टपोरे थेंब. श्रावणसरीने पानाफुलांचा गंध चौफेर उधळला… तिने मधाळ अधरांवर खट्याळ श्रावणसरींची सळसळ गोंदून घेतली….चंदनगंधी शिरशिरी आली तिच्या सावळ्याकुशीला….श्रावणचिंब वेलींना बिल्गले ऋतुरंगाचे नक्षत्र.. सावळी काया न्हाली ऋतुरंगात…. तसं..तिनं भूलवलेलं.. झुलवतांना पेलवलं आभाळ….मग धरित्रीचे रंगअनंग उधळून गेला पक्षी..ओठांदेठांवर विसरून गेला…गोंदलेली नक्षी. श्रावणाने थेंब थेंब उधळून सुगंध पेरला मातीच्या कणाकणात…

गंध ओल्या मातीचा
दरवळे रानोवनी
पाखरांच्या ओठी आली
नव्या पावसाची गाणी

पशुपक्ष्यांची किलबिल त्यांच्या सांकेतिक बोलींच्या शब्दांत श्रावणसरींचे ऋण व्यक्त करत असते… पाना-फुलांचे, फळांचे आभार मानत असते…. माणूस मात्र बेईमान आहे.. इथल्या प्रत्येक घटकांशी तो बेईमानी करीत आला आहे… त्याचा कमालीचा स्वार्थ त्याला ही बेईमानी करावयास भाग पाडतो…माणूस स्वतःच.. स्वतःशी बेईमानी करत असतो. स्वार्थासाठी माणसं आपला स्वभाव बदलतात…झाडं, वेली,पशू,पक्षी मात्र आपला स्वभाव बदलत नाहीत. निसर्ग आपला स्वभाव बदलत नाही… निसर्गाचा स्वभाव बदलायला भाग पाडले माणसाने…. माणसं झाडे लावत तर नाहीतच; परंतु ते तोडतात…झाडे लावण्यात पशुपक्ष्यांचा मोलाचा वाटा आहे…तुम्ही म्हणाल कसा…? तर तो असा की,..पक्षी फळे खाऊन दूर रानात इतरत्र उडून जातात, भटकतात त्यांनी खाल्लेल्या फळांतील बिया त्यांच्या विष्ठेवाटे रानात अनेक ठिकाणी पडतात, गायी गुरं व इतर प्राणीसुद्धा अशाच प्रकारे झाडांची फळे , शेंगा खाऊन रानोमाळ दूरदूर हिंडतात रानात वेगवेगळ्या ठिकाणी विष्ठा करतात…त्या विष्ठेतून फळांच्या, शेंगातील बिया पडतात.. उदा.शेळ्या बाभळीच्या वाळलेल्या शेंगा खाऊन चरण्यासाठी दोन चार किलोमीटर रानात फिरत राहतात. त्या बाभळीच्या शेंगा खाऊन धामुके म्हणजे बाभळीच्या शेंगातील बिया इतरत्र टाकत फिरतात. कधी तोंडावाटे तर कधी विष्ठेवाटे बिया टाकत असतात. त्या बिया पावसाळ्यात रुजतात आणि रानात अनेक ठिकाणी झाडे उगवतात. पशुपक्ष्यांची ही झाडे लावण्याची प्रक्रिया सहज घडते…मात्र माणसाला झाडाचे महत्त्व कळलेले असूनही तो कुणाच्यातरी प्रबोधनानंतर एखादं झाड लावतो…तो पीके घेतो ती पैसा करण्यासाठी..जगण्यासाठी. तो रोपटे लावतो घराच्या शोभेसाठी; मात्र स्वतःला किंवा इतरांना सावली मिळावी, शुद्ध हवा मिळावी असा निर्मोही उद्देश ठेवून माणसं झाडं लावतात का ? याचे उत्तर नाही, असेच आहे.

अनेक कवींनी पाना-फुलांवर झाडांवर, पशुपक्ष्यांच्या विहार करण्यावर कविता, गीते लिहून अनेकांची मने रिझवली आहेत. क्षणभर अनेकांच्या दुःखाची तीव्रता कमी केली आहे. काहींच्या मरण यातनांवर शब्दातून सुखाची फुंकर घातली आहे. मानसन्मानाने सुख मिळते म्हणून पुष्पगुच्छ किंवा फुले देऊन त्यांचा सत्कार केला जातो व सुख दिले जाते. हे माणसाचं चांगुलपण त्यांनं दाखवून दिलं आहे.

पानाफुलांची तोरणं बांधली जातात… अनेक वनस्पतींची औषधं करून अनेक रोग दुरूस्त करता येतात. झाडांपासून फुले, फळे मिळतात….या निसर्गाने सजीवांना बरंच काही उधळून दिलेलं आहे… मात्र मनुष्यप्राण्याने त्याच्यावर मालकी गाजवून वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाचा ऱ्हास केला आहे…. अनेकप्रकारचे प्रदुषण केले आहे… हिरोशिमा नागासाकी या ठिकाणी बॉम्ब टाकून तेथील जमीनच जाळून टाकली. तेथील जमीनीत कधीच एक गवताचे पाते सुद्धा उगवणार नाही…अशी नैसर्गिक हानी करणारा स्वार्थी प्राणी कोणता असेल तर तो आहे माणूस..!
आम्हाला निसर्गाने भरभरून दिलंय…पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केलाय; परंतु त्या स्वर्गाचा उपभोग आम्हाला घेता आला नाही… घेता येत नाही…. श्रावणात सगळीकडे सृष्टीवर स्वर्ग अवतरलेला असतो. तो आज अवतरलेला आहे. कवींनी श्रावण महिन्यावर अनेक गीते, कविता लिहिल्या आहेत…श्रावणात अनेक श्रद्धाळू लोक भक्तीकडे वळलेले असतात. सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात. या शाकाहारी व सात्विक राहण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. त्या कारणाला आपण शास्त्रीय कारण समजतो.

पूर्वी खूप पाऊस होत असायचा. पावसाच्या सततच्या पाण्यामुळे सगळीकडे घाण साचली जायची त्या घाणीवरच्या मास्या, जीव, जंतू येऊन अन्नावर बसायचे म्हणून रोगराई सुरू रहायची… म्हणून श्रावण महिन्यात मांस,मच्छी अशा प्रकारचे अन्न वर्ज्य करण्याला शास्त्रोक्त आधार दिला गेला. भाव आणि भक्ती हे शास्त्राचे मूळ आधार आहेत म्हणून श्रावण महिन्यात भक्तीभाव, श्रद्धा अशा गोष्टी रूजवल्या त्या काही प्रमाणात आजही सुरु आहेत.

रम्य आणि प्रणयरम्य गीतांची निर्मितीसुद्धा याच श्रावण महिन्यात होते. बहरलेल्या निसर्गाची, बहरलेल्या पानाफुलांची, दरवळलेल्या गंधाची, श्रावणसरींची प्रतिमा,प्रतीके वापरूनच गीतांची, कवितेची निर्मिती झालेली आहे.

असा हा तनामनात घर करून राहणारा श्रावण, काळ्या मातीशी हितगुज करणारा, पानाफुलांशी हितगुज करणारा श्रावण…सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो.

डॉ.धोंडोपंत मानवतकर
१० ऑगस्ट २०२४

Avatar
About डॉ.धोंडोपंत मानवतकर 6 Articles
डॉ.धोंडोपंत मानवतकर एम.ए.मराठी, पीएच्.डी.जी.डी.आर्ट, व बॅचलर ऑफ जर्नालिझम. कवी, लेखक, गीतकार, पत्रकार, संपादक, चित्रकार, समीक्षक, प्रकाशक आहेत. त्यांच्या नावे चार कवितासंग्रह व दोन संपादित अशी एकूण सहा पुस्तके प्रकाशित असून ते वृतपत्रासाठी सामाजिक विषयावर प्रासंगिक लेखन तसेच पुस्तक परीक्षण व काव्यलेखन सातत्याने करत असतात. दोन वेळा आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून काव्यवाचन व परिसंवादात सहभाग. अनेक कविसंमेलनात सहभाग. अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. साहित्य शिरोमणी या त्रैमासिकाचे ते संपादक राहिले आहेत. सध्या आविष्कार साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष असून औरंगाबाद येथे शब्दभूमी पब्लिकेशन चे प्रकाशक आहेत. ते औरंगाबाद व मंठा येथील समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..