ह्रीं ह्रीमिति प्रतिदिनं जपतां तवाख्यां
किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ ।
मालाकिरीटमदवारणमाननीया
तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः ॥ ११ ॥
आई जगदंबेच्या कृपा प्रसादाचे वैभव सांगतांना आचार्य श्री पुढे म्हणतात,
ह्रीं ह्रीमिति – ह्रीं, ह्रीं अशा स्वरूपात,
प्रतिदिनं – नित्यनियमाने, अनवरत.
जपतां तवाख्यां- तुझे नाव जपले असताना.
अर्थात ही आई जगदंबे जो रोज तुझ्या नावाचा असा जप करतो त्याला. यातील प्रतिदिन हा शब्द फार महत्त्वाचा आहे.
सामान्यतः लोक भगवंताचे नाव त्याच वेळी घेतात ज्या वेळी त्यांच्यावर काहीतरी संकट येते. अशा तात्कालिक भक्तांना भगवान पावत नाही असे नाही. पण त्याचे आवडते भक्त तेच असतात जे प्रतिदिन भजन करतात. संकटाचा मागमूस नसतानादेखील भगवंताचे नामस्मरण करतात.
अशा भक्तांचे भाग्य सांगताना आचार्य म्हणतात,
किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ- हे त्रिपुराधिवासिनी ! तुझ्या अशा भक्तांना या जगात दुर्लभ असे काय आहे? अर्थात त्यांना सर्व काही सहजतेने प्राप्त होते.
काय काय प्राप्त होते? याची एक झलक दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
माला- मोत्यांच्या माळा, अर्थात सर्व प्रकारची रत्ने,
किरीट- मुकुट अर्थात साम्राज्य.
मदवारण- मदोमत्त हत्ती. संपत्तीचे हे सगळ्यात मोठे प्रतीक वर्णिले आहे. दारात झुलणारा असा हत्ती अफाट श्रीमंतालाच परवडू शकतो.
माननीया- या सगळ्याने सन्मानित झालेली,
तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः- अशी देवी लक्ष्मी त्यांना स्वतःहून प्राप्त होते.
वर वर्णन केलेले सर्व वैभव देवी लक्ष्मीचे असले तरी अशी लक्ष्मी मिळाली की हे सर्व त्याला आपोआपच मिळते.
दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी देवी लक्ष्मी म्हणजे वैभव त्याला स्वतःहून प्राप्त होते. त्यासाठी तो काहीही प्रयत्न करीत नाही.
भक्त केवळ आई जगदंबेची उपासना करतो. त्याला या सर्व गोष्टी आई स्वतःहून देते. हे आचार्य कथन मोठे मर्म पूर्ण आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply