लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् ।
भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं
मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥
विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत.
आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे शव आहेत. अमंगल शवाला परममंगल शिव करणारी ही शक्ती. तिचे स्वरूप वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं- आई अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील तुझे हे अर्धे शरीर, भगवान शंकरांशी सदैव लग्न म्हणजे जुळलेले असो. या एकत्रीकरणाचा कधीही वियोग न होवो.
कसे आहे आईचे हे स्वरूप? तर ते म्हणतात,
तॆजः परं- परम तेजस्वी. बहुलकुङ्कुमपङ्कश- प्रचुर प्रमाणात अर्पण केलेल्या कुंकवाने,
शॊणम्-
लालबुंद दिसणारे. शोण म्हणजे रक्त. पण त्याचा प्राधान्याने विचार आहे गर्भाशयातील रक्ताशी. गर्भाशयाचा संबंध आहे नवनिर्मितीशी. भगवान महाकाल विनाशाची दैवता आहेत. त्यांच्या सोबत असणारी जगदंबा नवनिर्मितीची शक्ती. यातून ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप परिपूर्ण आहे. केवळ भकास विनाश नव्हे तर नवनिर्मितीसाठी केलेला साफ-सफाई स्वरूप विनाश.
भास्वत्किरीट- तेजस्वी मुकुट धारण केलेले.
अमृतांशुकलावतंसं- अमृत अर्थात शांतता दायक. अंशू म्हणजे किरण. कला म्हणजे भिन्नभिन्न अवस्था. अर्थात चंद्र. त्याला अवतंस म्हणजे मस्तकावर धारण केलेले.
मध्यॆ त्रिकॊणनिलयं- श्री यंत्राच्या त्रिकोणात निवास करणारी. परमामृतार्द्रम्- श्रेष्ठ अशा अमृतमय करूणेने आर्द्र असणारे, हे तुझे अर्धे अंग कायम भगवंताशी जुळलेले असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply