ह्रींकारमॆव तव नाम तदॆव रूपं
त्वन्नाम दुर्लभमिह त्रिपुरॆ गृणन्ति ।
त्वत्तॆजसा परिणतं वियदादिभूतं
सौख्यं तनॊति सरसीरुहसंभवादॆः ॥ १५ ॥
जगातील कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्याचे दोन महत्त्वाचे मार्ग म्हणजे नाम आणि रूप. या दोन्ही गोष्टी परस्परांशी अभिन्नरीत्या संलग्न असतात. एखादी नवीन गोष्ट पाहिली तिचे नाव काय? हा पहिला प्रश्न समोर येतो. तर एखाद्या नवीन गोष्टीबद्दल ऐकले तर ती कशी दिसते? याची उत्सुकता असते.अशा स्वरूपात प्रत्येक गोष्ट नाम आणि रूपाच्या आधारे जाणून घेता येते.
सामान्य गोष्टींच्या बाबतीत यांचे नाम आणि रूप वेगवेगळे असते. मात्र आई जगदंबेचे वैभव सांगताना आचार्यश्री म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम तदॆव रूपं- ह्रीं कार हेच तुझे नाव आहे आणि तेच तुझे रूपही आहे. अर्थात या बीज मंत्राने तुला हाक मारता येते म्हणून ते तुझे नाव आहे तर श्री यंत्राच्या सगळ्यात वरच्या त्रिकोणावर हे बीज स्थिर असल्याने ती सर्वोच्चताच भगवतीचे रूप आहे. अर्थात तिचे हे सर्वोच्चत्वच तिचे स्वरूप आहे.
त्वन्नाम दुर्लभमिह त्रिपुरॆ गृणन्ति- याच अर्थाने, हे त्रिपुरसुंदरी ! तुझे नाव दुर्लभ असल्याचे म्हटले जाते. जगातील कोणती भौतिक दृष्ट्या सर्वोच्च गोष्ट देखील सहज प्राप्त नसते मग जगदंबे चे नाव कसे असेल? अनेकांना ते घ्यावेच वाटत नाही हेच त्याचे दुर्लभ स्वरूप आहे.
त्वत्तॆजसा परिणतं वियदादिभूतं- आई तुझ्याच तेजाने आकाश इ. महाभूते प्रकाशित होत असतात. त्यांना शक्ती प्राप्त होत असते.
सरसीरुहसंभवादॆः- सरसीरुह म्हणजे कमळामध्ये संभव म्हणजे जन्माला आलेले, श्री ब्रह्मदेव. इत्यादी म्हणजे बाकी सर्व देव.
सौख्यं तनॊति – सुख प्राप्त करतात.
अर्थात या सगळ्यांना तुझ्याच कृपेने सुख प्राप्त होते.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply