ह्रींकारत्रयसंपुटॆन महता मन्त्रॆण संदीपितं
स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् ।
तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी
वाणी निर्मलसूक्तिभारभरिता जागर्ति दीर्घं वयः ॥ १६ ॥
कल्याणवृष्टिस्तवाच्या या शेवटच्या श्लोकात फलश्रुती वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
ह्रींकारत्रयसंपुटॆन- तीन ह्रींकार संपुटित.
कोणत्याही मंत्राच्या मागेपुढे एखादी गोष्ट लावले जाते तेव्हा त्याला संपुट असे म्हणतात. ह्रीं या बीजाक्षराच्या आधी ओंकार आणि नंतर श्री लावला जातो. अशा संपुटाने त्याला मंत्रत्व प्राप्त होते.
आई जगदंबाच निर्गुण-निराकार परब्रह्म आहे आणि तीच परमशक्ती आहे.हे सांगण्यासाठी आधी ओंकार आणि पुढे श्री लावला जातो. त्याचवेळी हे तिन्ही जणु काही एकच आहे ते सांगण्यासाठी ह्रींकारत्रय म्हटले.
महता मन्त्रॆण संदीपितं- ॐ ह्रीं श्रीं या महान मंत्राने संपादित असणारे, युक्त असणारे.
स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् – हे स्तोत्र, हे आई जगदंबे ! जो रोज तुझ्यासमोर मंत्राप्रमाणे जपतो.
त्याला मिळणारे दिव्यलाभ सांगताना आचार्यश्री म्हणतात,
तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा- क्षोणी म्हणजे पृथ्वी तर भुज म्हणजे उपभोग घेणारा. अर्थात राजा. स्तोत्र वाचणाऱ्याला राजाही वश होतो. लक्ष्मीश्चिरस्थायिनी- स्थिर संपत्ती प्राप्त होते. संपत्ती इतरवेळा चंचल असते. पण आईचा कृपेने ती देखील स्थिर राहते. अर्थात लोकविलक्षण लाभ होतात.
वाणी निर्मलसूक्तिभारभरिता- सुंदर सुभाषितानि अलंकृत असलेली वाणी प्राप्त होते.
जागर्ति दीर्घं वयः- दीर्घकालिक आयुष्य प्राप्त होते.
जय जगदंब !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply