आपल्याला संगीतातील नेमकं काय आवडतं? गीताचे बोल, गायक-गायीकेचा आवाज, गाण्याची चाल की या सर्वांचा एकूण मेळ? अर्थात नेमकं उत्तर सांगणं तसं अवघडच….कारण सिने संगीतात सर्व घटक मिसळलेले असतात. पण हिंदी चित्रपट संगीतात काही गाणी अशी आहेत की ती वरील घटका शिवाय कायम स्मरणात राहिली आहेत. गाण्याची चाल अर्थातच संगीत दिग्दर्शक तयार करतात मात्र गाणे पूर्णत्वास जाते ते वाद्य संयोजक (अरेंजर) नावाच्या त्यांच्या सहाय्यकांमुळे. गीतातील सुरूवात, स्थायी आणि अतंरा यांच्या मधील जागा वेगवेगळे वाद्यवादक भरून काढत असतात. अनेकदा सुरूवातीच्या सुरावटी इतक्या अप्रतिम असतात की आता कोणते गाणे लागणार हे आम्ही लगेच ओळखतो. एक उदाहरण देतो: बोल राधा बोल संगम होगा की नही…..च्या सुरूवातीची धून. तुम्हाला अशी अनेक गाणी आठवू शकतात. आज प्रकर्षाने मला एक सुरावट आठवत आहे.
१९५४ मध्ये प्रदीपकुमार व वैजयंतीमालाचा चित्रपट “नागीन” प्रादर्शीत झाला. हेमंतदा यांनी एकूण १३ गाणी संगीतबद्ध केली होती. मात्र यात एक गाणे असे होते ज्याला बोलच नव्हते आणि तरीही तेच या चित्रपटाचा हायलाईट ठरले. त्यावेळी हेंमतदाकडे दोन तरूण सहाय्यक काम करत होते. पैकी एक होते कल्याणजी वीरजी शहा व दुसरे रवी शंकर शर्मा. चित्रपटाचे नावच “नागीन” असल्यामुळे बीन हे वाद्य ओघाने आलेच. या बीनचा साउंड ट्रॅक तयार करताना कल्याणजीने नुकतेच भारतात आणले गेलेले क्लाव्हायोलिन हे वाद्य वाजवले. तर रवी यांनी हार्मोनियमवर त्यांना साथ केली आणि या दोघांच्या काम्बीनेशन मधून तयार झाली नागीनची सुप्रसिद्ध धून…”मन डोले मेरा तन डोले”….या बीनची नशा आज ६३ वर्षानंतरही उतरत नाही……
ही बीन वाजवणाऱ्या कल्याणजीने पूढे आपला धाकटा भाऊ आनंदजीला सोबत घेऊन स्वतंत्र संगीत कारकिर्द सुरू केली आणि एक प्रतिष्ठीत संगीतकार बनले. (त्यानां साथ देणारा रवी शंकर शर्मी ही देखील पूढे रवी या नावाने प्रख्यात संगीतकार झाला) ३० जून १९२८ ला गुजरात मधील कच्छ प्रांतात कल्याणजीचा जन्म झाला. आनंदजी त्यांच्याहून ५ वर्षे लहान. वडील कामधंद्यासाठी मुंबईत आले च ग्रोसरीचा व्यवसाय करू लागले. कल्याणजीचे आजोबा त्याकाळाचे लोकसंगीतकार होते. त्यामुळे वारसा घरातुनच मिळाला. क्लाव्हायोलीन या परदेशी वाद्यावर त्यांची हुकूमत होती त्यामुळेच नागीन धून तयार होऊ शकली. करीअरच्या सुरूवातीला त्यांचा स्वत:चा ‘कल्याणजी वीरजी अण्ड पार्टी’ नावाचा आर्केस्ट्रा होता. मुंबई व देशात ते शो करत असत. कल्याणजीने या क्षेत्रात यायचे ठरविले त्यावेळी एकापेक्षा एक दिग्गज संगीतकारांनी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती. त्यामूळे त्यांच्यापूढे जबरदस्त स्पर्धा होती. १९५९ मधील ‘सम्राट चंद्रगुप्त’ या चित्रपटातुन त्यानां पहिली संधी मिळाली. त्यातील ‘चाहे दूर हो चाहे पास हो’ हे लता रफीचे द्वंद गीत खूप गाजले. नंतर त्याच वर्षी आला ‘सट्टा बाजार’ आणि ‘मदारी’. पैकी मदारी मध्ये पुन्हा एकदा त्यांची ‘बीन दिल लुटने वाले जादूगर अब….’ या गाण्यात वाजली.लता-मुकेशचे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. यावेळी मग लहान भाऊ कल्याणजी त्यांना जॉईन झाले.
सुरूवातीला कल्याणजी वीरजी शहा नावाने ते संगीत देत पण पूढे भाऊ देखील सक्रिय झाला व मग ते सुप्रिसद्ध कल्याणजी-आनंदी झाले. त्यांचा खरा डंका वाजला तो १९६५ मधील ‘हिमालय की गोदमे’ आणि ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील गाण्यामुळे. नंतर मात्र त्यानां कधीच मागे वळून बघावे लागले नाही. १९६८ मधील ‘सरस्वती चंद्र’ यातील ‘चंदनसा बदन’ या गाण्याने पहिले तर १९७४ मध्ये ‘कोरा कागज’ यातील ‘मेरा जीवन कोरा कागज’… या गाण्याने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. लता व आशासांठी त्यांनी जवळपास ६०० गाणी संगीतबद्ध केली. मला स्वत:ला त्यांची—-डम उम डिगा डिगा (छलिया)……ये समा, समा है (जब जब फूल खिले)…..आंखो आंखो मे हम तुम हो गये(महल)…….आओ तुम्हे मै प्यार सिखादू (उपासना)…..अकेले है चले आओ (राज)…..चांदी की दिवार ना तोडी (विश्वास)….बेखुदी मे सनम (हसीना मान जाएगी…..) चाँद आहे भरेगा(फूल बने अंगारे……)चंदन सा बदन (सरस्वतीचंद्र)…..चाँद सी मेहबूबा होगी मेरी (हिमालय की गोद मे)…..हम बोलेगा तो बोलता है (मर्यादा)…..जींदगी का सफर है कैसा (सफर)……पल पल दिलके पास (ब्लॅकमेल)…..पल भर के लिए कोई (जॉनी मेरा नाम)…..रहने दो गिले शिकवे (रखवाला….) समा है सुहाना सुहाना (घर घर की कहानी)…..यारी है इमान मेरा (जंजीर)… वक्त करता जो वफा (दिल ने पुकारा)….कसमे वादे प्यार वफा सब (उपकार)…..ओ साथी रे (मुकदर का सिंकदर) ही गाणी आवडतात. खरं तर ही यादी खूप मोठी आहे पण जागा अपूर पडेल. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास २०० चित्रपटापेक्षा अधिक चित्रपटानां संगीत दिले. या शिवाय नवनवीन तरूण गायक गायीकांना त्यांनी संधी दिली. लहान मुलांतील टॅलेंटला संधी मिळावी म्हणून किती तरी कार्यशाळा घेत असत. सन २००० मध्ये कल्याणजीचे निधन झाले. बंधू आनंदजी आज कल्याणजी विना अधुरे वाटतात. त्यांची नागीन धून ऐकून कदाचित आजही साप बीळा बाहेर येत असावेत कारण आजही मदारी सापा समोर हीच धून वाजवतात.
-दासू भगत (३० जून ०१७)
धन्यवाद सुरेशजी.
मस्त लेख .