मुरलीधर त्याच्या खोडसाळ स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहे पण आणखी दोन नावं त्याच्याशी अभिन्न जोडली गेली आहेत- राधा आणि मीरा ! दोघीही विवाहीत, पण त्याच्यावाचून जगू न शकणाऱ्या. तेथे मात्र तो खोडकर नसतो.
मग १९७० च्या “ट्रक ड्रायव्हर” या अनामिक चित्रपटात ( मी मनाच्या भूतकाळात हे नांव आणि गाणंही विसरून गेलो होतो. परवा “वेदांतश्री” च्या वासंतिक अंकात लताबद्दल लेख वाचताना अचानक तळाशी जाऊन बसलेले हे गाणे- “कान्हा रे कान्हा, तूने लाखो रास रचाए” उसळून वर आले) त्याची आगळीक नव्याने भेटली.
“ट्रक ड्रायव्हर” सर्वार्थाने (कलावंत,दिग्दर्शक,कथानक) दुर्लक्षित/उपेक्षित. पण लता नावाच्या परिसाला अशा गोष्टींशी देणंघेणं नसतं. इंदीवरचे भगवान श्रीकृष्णावरचे घायाळ,जीवघेणे आक्षेप आणि सोनिक ओमीची सांगीतिक कलाकुसर ! लता मग हाती (कां गळ्यात) आलेल्या रचनेला “लतास्पर्श” करते.
अतिशय अप्रतिम अशा या गाण्यात ” तूने नारीकी पीड ना जानी रे ” असा भगवंतावर साक्षात आरोप आहे. या मनमानीच्या पुराव्यादाखल ” राधा कितना रोई, है मीरा खोई खोई” या दोन साक्षीदार आहेत. नटखटाची ही आगळीक ” श्याम रे तूने जलते दिल क्यों बुझाये ” इथे थबकते.
त्याची मनधरणी करीत समजून घेण्यासाठी १९७५ उजाडावे लागते. दोघींमधील मीरा समंजसपणे त्याला विनविते-
“श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
लोग करें मीरा को यूँ ही बदनाम !”
कारण खोडकर,श्यामवर मालकी हक्क गाजविणाऱ्या राधेने तिला हैराण केले असते. तिला आपल्या श्यामची वाटणी मंजूर नसते.
त्याच्या हे खिजगणतीतही नसते आणि पुढे महाभारतात गीता सांगण्यात मग्न झाल्यावर दोघींची आठवणही येत नाही. दोघींना भलेही त्याच्या अंतःकरणातील अदृश्य,खोल कप्प्यात स्थान असेल पण अंतःपुरात रुक्मिणी,सत्यभामा विराजमान असतात. राधा आणि मीरा वेशीबाहेर !
मीरेचे विषप्राशन जगजाहीर आहे, पण राधेचे काय? तीही स्थितप्रज्ञ आहे-
” भावनांचे हेलकावे
नारी जीवाला कां नवे?
योग कृतीत नारीच्या
पुरुषांना ग्रंथ हवे !
अर्जुनाला तुझी गीता
सांग खुशाल मुकुंदा
सुख-दुःख पचवूनी
स्थिर कधीचीच राधा !! ”
अशी ती कालिंदीच्या पार असते.
मग तोच माघार घेतो आणि अंतरीचे गुह्य कबूल करतो-
” राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम ”
त्याला तरी इतके जिवाभावाचे कोण असते या दोघींशिवाय?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply