कोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती.
चहा सांगितला आणि सहज इकडे-तिकडे बघत बसलो. माझ्या नजरेला त्या टपरीतली एक वेगळी गोष्ट दिसली. टपरीत पत्र्याच्या छताला प्लास्टीकच्या पिशवीत काही द्रव भरून त्या दोन-तीन पिशव्या एकमेकापासून काही अंतराने टांगून ठेवल्या होत्या. पिशव्यांच्या तळाला एक गोलसर काळा डाग दिसत होता.
माझं कुतूहल जागृत झालं. जागेवरून उठलो आणि जवळ जाऊन निरिक्षण करू लागलो. तरी लक्षात येईना.
शेवटी माझ्या सवयीनुसार त्या बाईंना विचारलं की, “ह्या काय आसा? आणि असा टांगून कित्यात ठेवलास?”
ह्यावर त्या बाईने जे मला सांगiतलं ते मला आश्चर्यात टाकणारं होतं. ती म्हणाली, “भाऊनो, ह्या पिशयेत पानी आसा आनी भुतूर दिसता ता एक रूपयाचा नाना. ह्यो पिशव्यो अश्यो टांगून ठेवलाव की मग मासक्यो येत नाय.”..
आणि खरोखर त्या पत्र्याच्या साध्याश्या टपरीत एकही माशी दिसत नव्हती. पावसाच्या दिवसात माश्यांचा खुप त्रास होतो त्यावर काढलेला तो कोकणी जालीम उपाय होता. घरी येऊन प्रयोग केला तर रिझल्ट खरंच पॉझिटीव्ह आला. असं होण्यामागे काय शास्त्रीय कारण असावे ह्या प्रश्नात मी अडकलो नाही आणि प्रयोग एन्जॉय केला.
उगाच नाही ‘भारतरत्न’ अवॉर्ड मिळालेल्या मराठीजनांत ‘कोकणी’ आघाडीवर आहेत..!!
— गणेश साळुंखे
Leave a Reply