नवीन लेखन...

कपडे वाळत घालणे एक प्रवास

“वॉशिंग मशिन एक लावणे” हा वॉशिंग मशिन लावण्याचा, आमच्या घरात होणारा सोहळा सांगणारा एक हास्य लेख मी लिहिला होता, आणि हा लेख वाचकांना प्रचंड आवडून गेला. जणू आपापल्या घरात घडणारा सोहळा मी शब्दबध्द केलाय अशी अनेकांची(अनेक नवऱ्यांची) प्रतिक्रिया होती.

पण त्यानंतर, म्हणजे कपडे धुऊन झाल्यानंतर ते वाळत घालणे हा सुद्धा एक कार्यक्रम असतो. पूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी दहीहंडी बांधल्यासारख्या उंचावर दांड्या असायच्या. या दांड्या तार किंवा लाकडी गोल बांबूच्या असायच्या. यावर कपडे वाळत घालण्यासाठी प्रत्येक घरात एक शेलाट्या अंगाची बांबूची उंच काठी असायची. ही काठी आतून पोकळ असे, त्यामुळे वापरायला हलकी आणि हातातून पडली की टरर् असा आवाज यायचा. बहुतेक घरतल्या या काठीच्या वरच्या बाजूच्या चिरफाळ्या झालेल्या असायच्या. या काठीला, धुणी वाळत घालायची काठी असं संबोधलं जात असे. 501 बार चोळून आणि कपड्यांना धोक्याने यथेच्च बडवून नळाखाली मनसोक्त बुचकळून झाले, की या कपड्यांचे पिळे पितळेच्या अथवा स्टीलच्या बादलीत…..(हो बादलीतच, कारण घंगाळ वगैरेचा काळ माझ्याही खूप आधीचा) धपाधप एकमेकांवर पडायचे. त्यानंतर कपडे धुणाऱ्या बाई दाराच्या मागे अंग चोरून उभी असलेली ती शेलाटी काठी घेऊन आणि तिच्या माथ्यावर कपड्याची एक बाजू नेमकी बसवत झेंडावंदन केल्यासारखी, मान मोडेपर्यंत मागे करत एकेक कपडा झटकून दांड्यांवर टाकायची आणि मग तो कपडा सरळ करायचा. ती पण एक art होती. मी अनेकदा उत्साहाने हा प्रयत्न करायचो, अख्खा कपडा धपकन खाली पडायचा आणि ,
“कशाला नको ते करायला कडमडतोस?”
असा ओरडा खात एक धपका पाठीत बसायचा. असो,
बरं तेव्हा वॉशिंग मशीनचा शोध लागलेलाच नव्हता, त्यामुळे कपडे पूर्ण पाणीहीन होत नसत, आणि ते किती पाणीहीन व्हावे, याचं गणित काम करणाऱ्या बाईंनी ते किती पिळलेयत यावर अवलंबून असायचं.

“कपडे चांगले पीळ ग ! काल नुसते थपाथपा गळत होते.”
हे वाक्य रोज उच्चारलं जायचं. बाईनाही या वाक्याची सवय झालेली होती. ती सुध्दा आपल्या ताकदीनुसारच पिळणार ना. वाळत घातल्यावर येता जाता मधून मधून टपक् टपक् सुरू असायचं, ते ही नको तिकडे. नाकावर, डोळ्यांवर. रागाने वर बघितलं की टपकन एक थेंब डोळ्या नाकाच्या मध्ये पडायचा.

आज वॉशिंग मशीनमुळे पावसाळ्यातही कपडे वाळतात, तेव्हा मात्र दोन दोन दिवस वाळायचे नाहीत. दमट राहायचे. कधी बाईंनी दांडी मारली की कपडे धुण्याचं हे काम आई ताई कडे यायचं. आता आपण मदत करायची म्हणजे धप्प…. उगाच कशाला त्यात पडा. काही वेळा आई कपडे वाळत घालतानाच कुणी यायचं. मग त्यांच्याशी बोलत हे वाळत घालणं चालायचं. दोन खांद्यावर दोन पीळे, डाव्या हातात एक आणि उजव्या हातात राष्ट्रध्वज धरल्याप्रमाणे ती शेलाटी अशी भारतमातेच्या पोजमध्ये आई बोलत आणि कपडे वाळत घालत असायची. अनेक वर्ष ही कपडे वाळत घालण्याची पद्धत रूढ होती. पुढे ती बांबूची शेलाट्या अंगाची जाऊन, अनेक घरात तिच्या जागी स्टीलची लांबलचक पोकळ सळी आली, इतकाच काय तो बदल. पण कपड्यांची दहीहंडी मात्र अबाधित होती. बरं, सुकलेले कपडे उतरवणं ही सुद्धा एक कला होती. उजव्या हातातल्या शे. ने एकेक कपडा दांडीच्या एका बाजूने वर करून पाडायचा, आणि तो दुसऱ्या हाताने झेलायचा.

पुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले. उंचावरच्या दांड्या घरात असतील तर, कपडे धुणाऱ्या बायका अटी घालू लागल्या, “कापडं धुईन, पन वालत नाय घालनार. मला नाय जमत वर बगून कापडं वालत घालायला. चक्कर येती.”
पण आताच्या पिढीला आणि कपड्यांना हे सगळं परवडणारं नव्हतं. Semi, fully automatic वॉशिंग मशीन आली आणि त्यामध्ये आयते कपडे धुवून मिळू लागले. हाताने धुतलेले स्वच्छ की मशीनमध्ये धुतलेले हा वादाचा मुद्दा बाजूला पडला. उचं शेलाटी जाऊन flag hoisting केल्यासारख्या दांड्याच अस्तित्वात आल्या. जोडलेली नायलॉन दोरी हळुवार सोडून त्या खाली येऊ लागल्या आणि कपडे वाळत घातले की ध्वज फडकवल्यासारख्या दोरी ओढून वर जाऊ लागल्या.

आता आमच्या घरात मी वॉशिंग मशीन लावतो(सेमी ऑटो)हे सगळ्या वाचकांना कळलेलं आहे, पण हल्ली त्याहीपुढे जाऊन, कपडे वाळत घालायलाही मदत करतो हिला. माझं वॉशिंग मशीन लावण्याचं जसं सगळं शिस्तवार असतं, तसच हिचं वाळत घालण्याचं. मला ती मोठे कपडे… म्हणजे टॉवेल, गाऊन, पँट वाळत घालायला देतच नाही. चादरी वगैरेकडे मी ही फिरकत नाही. नॅपकीन, गंजी, रुमाल असे लिंबू टिंबु माझ्याकडे देते. आता का ? म्हणाल तर उत्तर काही नाही. ती वाळत घालताना तिचा एक डोळा माझ्याकडे असतो, आणि सुरू असतं,
“झटकलेस का चांगले ?”
“दोन्ही बाजूची टोकं जुळवून घाल रे, कसेही नको वाळत घालूस.”
काय स्पर्धा आहे का? की कपडे रागावणार आहेत – आपल्या दोन्ही बाजू जुळल्या नाहीत म्हणून?
बरं, नॅपकिन शेजारी गंजी घातलं की सुरू,
“अरे, नॅपकिन सगळे एका रांगेत घाल, मागच्या दांडीवर गंजी.”
काय inspection आहे का ? पण पर्याय नाही. मी तसच ठेवलं तर स्वतः करणार. आणि अशा तऱ्हेने आमचे कपडे दांड्यावर विसावतात. बाल्कनी बाहेरच्या दांड्यावरचे कपडे, म्हणजे पँटी(पँट) टॉवेल असे सगळे ज्येष्ठ, त्यांना ती मला हातच लावू देत नाही. बाल्कनीबाहेर वाकून वाकून टोकं जुळवते. ते पाहून मी हसत म्हणतोही,
“अगं ग्रिल नसतं तर उलटी खाली पडली असतीस. माझ्या या विनोदाला जराही किंमत न देता ती आपलं काम सुरू ठेवते. असो,
तर असे हे कपडे वाळत घालण्याचे चालत आलेले प्रकार. फार विचार न करता वाचा आणि खुदकन, मनसोक्त जसं हसू येईल तसं हसून सोडून द्या झालं. अतिशयोक्ती शिवाय हसू येत नाही ना…….

 

 

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..