नवीन लेखन...

आपला कपालेश्वर !

Kapaleshwar of Our Karjat

कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते.

आपलं कपालेश्वर मंदिर कर्जतच्या अगदी मध्यभागी आहे. चार बाजूंचे चार रस्ते टिळक चौकात एकत्र येतात आणि कपालेश्वराच्या पायाशी समर्पित होतात. कर्जत स्टेशनवरून गावाच्या रस्त्याने बाजारपेठेत पाऊल टाकले की, समोरच्या सरळ रस्त्यातून (अर्थात वाहनांची आणि माणसांची गर्दी नसेल तर) दिसतो तो कपालेश्वर मंदिराचा भला थोरला ॐ!

गाभार्‍यात ॐ काराची किंवा ॐ नमः शिवाय ची धून सुरू असते. भल्या पहाटे पाच, साडे पाच वाजता दत्ता गुरव मंदिराची घंटा ठाण् ठाण् वाजवतो आणि कर्जतचा दिवस सुरू होतो. गावाचा मुख्य रस्ताच तेथून जात असल्याने येणारा जाणारा भाविक किंवा अभाविकसुद्धा सवयीनं चपला काढल्यासारखं करतो आणि क्षणभर डोळे मिटले न मिटल्यासारखं करून नमस्कार करतो व पुढे दिवसभराच्या कामाला लागतो. पहाटेचा सुखद गारवा चराचरात भरला असताना पहाटेची बांग कानी पडते आणि ॐकार व अजानाची एक अद्भूत जादू सर्वत्र पसरू लागते. घरट्यातून, वळचणीतून उडालेली पाखरं कपालेश्वराच्या भगव्या झेंड्याखाली पळभर विसावतात वा समोरच्या विजेच्या तारांवर आपली शाळा भरवतात. कपालेश्वराच्या साक्षीनं त्यांचाही दिवस सुरू होतो.

सातच्या सुमारास जीवन शिक्षण मंदिर, अभिनव ज्ञान मंदिर किंवा दुसर्‍या कुठल्या तरी शाळांमध्ये जाणारा शिक्षक किंवा एखादा शिक्षणार्थी देवाला साकडं घालतो व पुढे सरकतो. परीक्षेचे दिवस असले तर तो हमखअस मंदिरात शिरतो. नंदीच्या दोन शिंगांमधून थेट कपालेश्वराची पिंड दिसते का ते पाहतो, गणरायाला, देवीला उत्सुक भाविकतेने नमस्कार करतो. देवालाच नव्हे तर अख्ख्या कर्जत गावाला जागी करेल अशा जोरात घंटा घणघणवतो – ठाण् ठाण् ठाण्! या गडबडीत समोरच्या फरशीवरील कासवाला त्याचा पाय लागतो. मग कान धरून, जीभ ओढून, नाक घासून त्याची क्षमा मागितली जाते आणि कपालेश्वराच्या पिंडीवरील कलशामधील बारीकशा धारेतलं तीर्थ पिऊन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कपालेश्वराकडून आशीर्वाद घेतात. बाजूलाच विठ्ठल रखुमाईचं बारकं मंदिर आहे, त्यांना प्रदक्षिणा घालून ही पोरं किंवा त्यांचे शिक्षक शाळेकडे प्रस्थान ठेवतात. सारा हवाला कपालेश्वरावर! जणू तोच काही त्यांची परीक्षा लिहिणार आहे. (खरं म्हणजे हा जो नमस्कार आहे ना तो मुलं स्वतःचं नैतिक धैर्य वाढवण्यासाठी करतात.)

दिवस जसजसा चढत जातो, तसतसा कपालेश्वराकडचा राबता वाढत जातो. निवृत्त नागरिक कपालेश्वरजवळ येतात. हातात वर्तमानपत्र खेळवत देवाचं दर्शन घेतात व म्हातारपणाचा, निवृत्तीचा सारा भार कपालेश्वरावर सोपवतात. बाजूच्या बाकड्यावर बसून अप्पा गुरव आपल्या मोत्यासारख्या अक्षरातून कोणती सुविचारमाला लिहित आहेत, हे पहात बसतात. मंदिराच्या विश्वस्तांची ये जा सुरू असते. मंदिराची सफाई सुरू असते. हार बदलले जातात, अधून मधून मूर्तींचं वस्त्र बदलालं जातं.

तेवढ्यात सकाळचं कॉलेज संपवून एखादी तारुण्यात पदार्पण करणारी बाला लाजत लाजत देवदर्शनासाठी शिरते. खरं तर तिचं लक्ष देवाकडे नसतंच. तिचं लक्ष असतं पाठीमागून येणार्‍या धीटस युवकाकडे. दोघेही आपल्याकडे कुणी पहात नाही ना हे पहात पहात बावर्‍या नजरेनं कपालेश्वरापुढची घंटा एकाचवेळी वाजवतात. आधी बुजरेपणानं आणि नंतर खणखणीतपणानं! त्यांच्या पहिल्या पहिल्या प्रीतिच्या आणाभाका होतात ते कपालेश्वराच्या साक्षीनं!

सूर्य माथ्यावर येतो. तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून तहसील कचेरीत, कोर्टात, पंचायत समितीत जाण्यासाठी आलेला एखादा गावकरी मंदिराजवळ येतो. बाहेरच्या थंडगार कूलरचं पाणी देणगीदाराला दुवा देत पितो, तोंडावर गार पाण्याचे हबकारे मारून ताजा तवाना होतो. घटकाभर टेकतो. पडशीतला डबा काढतो. कपालेश्वरासमोर माथा टेकतो, घरधनिणीनं दिलेल्या भाजी-भाकरीतला चतकोर तुकडा श्रद्धेने देवासमोर ठेवतो, मगच स्वतःची पोटाची भूक भागवतो. ग्रामीण भागतून बाजारासाठी आलेल्या आयाबाया लेकरांना भरवतात व काही काळ त्यांना मांडीवर घेऊन निजवतात. मध्येच एखादी आई आपल्या लेकराला कपालेश्वराच्या भरोशावर ठेऊन बाजारहाटही करून येते.

दुपार चढत जाते आणि मंदिर काही कालासाठी बंद केलं जातं. देव काही झोपतात.

तीनच्या सुमारास मंदिरातली लगबग पुन्हा सुरू होते. चारच्या प्रवचनासाठी घराघरातनं आजीबाया हातातल्या ताटलीत मूठभर तांदूळ आणि वाती वळायला कापूस घेऊन येऊ लागतात. चार वाजता भारतीय महिन्यातील सणांप्रमाणे एखाद्या विषयावर प्रवचन सुरू होतं. आजीबायांचं लक्ष प्रवचनापेक्षा आपल्या सूनबायांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याकडेच अधिक असतं आणि याला साक्ष काढली जाते कपालेश्वराची.

तेवढ्यात समोरच्या टिळक चौकात एखाद्या सभेची जोरदार तयारी सुरू असते. कर्जतकराची एक समजूत आहे. पाठीशी कपालेश्वराला घेऊन होणारी टिळक चौकातली कोणतीही सभा किंवा कोणताही कार्यक्रम यशस्वी होणारच. या टिळक चौकात कोणाचे कार्यक्रम किंवा सभा झाल्या नाहीत असे नाही. कपालेश्वराच्या प्रांगणात राम गणेश गडकरी आपलं बालपण सजवून गेलेत, याच चौकात आरती प्रभूंची एखादी कविता रचली गेली असेल. येथेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, ए. आर. अंतुले, ए. टी. पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, दि. बा. पाटील सभा गाजवून गेले आहेत. सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, शंकर अभ्यंकर, भारतरत्न भीमसेन जोशी, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन, जयवंत कुलकर्णी, पुष्पा पागधरे, दिलीप प्रभावळकर, शिरिष कणेकर यांच्यासारख्या कलावंतांनी कपालेश्वराचे दर्शन घेऊन आपली कला साकार केली आहे. याच कपालेश्वराच्या छायेत भजनभूषण गजाननबुवा पाटील, शांताराम जाधव यांची संगीतकला बहरली. त्याच्याच आशीर्वादाने नवोदित पराग बोरसेसारखा चित्रकार जागतिक कीर्ति मिळवतो आहे.

संध्याकाळ होत जाते. सकाळच्या लोकलने किंवा सिंहगड एक्स्प्रेसने मुंबईला जगायला गेलेले कर्जतकर घरट्याकडे परततात. चौकात मुलांचे थवे उभे राहतात. बाजूच्या हॉटेलांमध्ये राजकारणी

मांडळी जमून त्यांच्या गप्पांचे फड सुरू होतात. कपालेश्वराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाकडे जाणार्‍या जिन्यावर तरुण मंडळी टाळ्या देत धमाल करू लागतात. आपला चुकला पोरगा नक्की त्या थव्यांमध्ये असणार याची खात्री कर्जतकर बापाला नक्की असते. तिथंच उबा राहून एकादा कर्जतकर बोलतो, यार कपालेश्वराची शपथ!

आठाच्या सुमारास शंकरराव गुरव घण् घण् घंटानाद करू लागतात. लक्ष्मण परांजपे सर एका हातात त्यांची मुठीची काठी धरून खणखणीत आवाजात आरती म्हणू लागतात. (आज सर नाहीत, पण बाई त्यांची गादी चालवतात.) पटकन् कुणीतरी विठ्ठलाच्या समोरची घंटा वाजवू लागतो तर दुसरा कुणीतरी शंकरासमोरची दुसरी घंटा वाजवू लागतो. आरती होते, प्रसाद वाटला जातो. मंदिराचा एखादा विश्वस्त हमखास असतातच. त्यापैकी संतोष वैद्य, ज्ञानेश्वर तिवाटणे हे जवळपास रोजचे मेंबर. विश्वासराव शिंदे, अप्पा बोडके आज हयात नाहीत, पण त्यांची आरतीच्या वेळी उपस्थिती नक्की असयाचीच. आमच्या लहानपणी गुरव आजी जमलेल्या सगळ्या नातवंडांना गुळ-खोबर्‍याचा प्रसाद द्यायचीच. आरतीपेक्षा त्या प्रसादासाठी आणि गुरव आजीच्या आशीर्वादासाठी पोरं जमायची.

आरती झाली रे झाली की, गावातलं सर्व पूजा सांगणार्‍या ब्राह्मण वर्गाचं मंडळ सभागारात खुर्च्या टाकून बसणार, दिवसभराचं भलंबुरं एकमेकांना सांगणार, नवाच्या सुमारास घरी जाणार. दत्ता गुरव पुन्हा एकदा झाडलोट करणार. (दत्ताचं वय पन्नासच्या पुढे निश्चितपणे असनार, पण तो सर्वांनाव आपल्या वयाचा वाटतो). आणि रात्रीच्या एकाद्या कार्यक्रमाची तयारी करणार. कोणी येवो वा ना येवो, लाऊड स्पीकर लावून तो सतरंज्या एकटाच अंथरणार. शनिवारी रात्री एकादी संगीताची मैफिल, एखादं व्याख्यान हमखास असनार. समोर श्रोते असोत वा नसोत, गाभार्‍यात कपालेश्वर, समोर नंदी त्या कार्यक्रमाला हजर! (काय करणार? त्यांना त्यांच्या भक्तांनी तशी मुभा दिलेली नसते ना!) आणि मग रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास मंदिर बंद होणार. खरं तर झोपणार पुजारी, विश्वस्त. पण कपालेश्वर जागा, अगदी टक्क जागा. सार्‍या विश्वाचा पसारा त्यानेच मांडलेला आणि त्याच्याच खांद्यावर विसावलेला. आपल्या विशाल बाहूंवर अवघं विश्व तोलणारा कपालेश्वर!

परवा रात्री झोपच येत नव्हती. घराचं दार उघडून बाहेर आलो. जिना उतरून रस्त्यावर आलो. चालत चालत अभावितपणे कपालेश्वराच्या पायरीवर जाऊन बसलो. मध्यरात्रीनंतरचा सुखद गारवा साथीला होता. डासांची गुणगुण चालू होती. पाय पसरून पायर्‍यांवर विसावलो. तेवढ्यात खांद्यावर हात पडला. दचकलोच. आवाज आला घाबरू नकोस, ”मी आहे, तुझा कपालेश्वर! एकदम शांत शांत वाटतंय ना? पण ही शांतता मला याच वेळी लाभते रे. नाही तर सकाळ झाली रे झाली, की अलिकडे पाखरांच्या किलबिलाटापेक्षा मोटारसायकलींचे, रिक्षांचे, कार्सचे आवाजच कानी येतात. जो तो आपल्या धावपळीत. कोणी क्षणभरही थांबायला तयार नाही. त्यात अवती भवती हातगाड्यांचं साम्राज्य. त्यांच्या गाड्यांमधून वाट काढत जाणारे लोक. त्यांनी मनापासून घातलेल्या शिव्या. हातगाडीच्या अलिकडे रस्त्याच्या मध्यभागी बेशिस्तपणे उभ्या राहणार्‍या रिक्षा, त्यांचा धूर, त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणारं प्रशासन. तरुण पोरांनी काढलेल्या तरूणींच्या कुरापती!! एक ना हजार गोष्टी! जीव अगदी कावून गेलाय रे! वाटतं, इथून उठावं आणि चालतं व्हावं सारं सोडून देऊन! पण करू काय? मीच मांडलेल्या माझ्याच चक्रात मीच अडकून पडलोय. विश्वाचं चक्र गरागरा फिरतंय आणि त्या चक्राचा मी आस. मी बाजूला झालो, तर हे सारं विश्वच कोलमडून पडेल. म्हणून थांबलो.

म्हटलं बघू, तुम्ही सुधारता का ते. नाही तर एक दिवस मी निघून जाईन. मग सांभाळा तुमचा पसारा तुम्हीच!”

सुखद गारव्यातही मला दरदरून घाम सुटला. म्हटलं, “बा कपालेश्वरा! तुझं हे पहाटेपासून रात्रीपर्यंत चालणारं रहाट गाडं सुरूच ठेव. आसाचा दांडा भक्कम राहू दे. कालचक्र फिरतं ठेव. बघ, आज वर्तुळाचा खाली आलेला बिंदू उद्या वरती जाईलच!”

-नीतिन आरेकर,
आरेकर अपार्टमेंट्स,
बाजारपेठ, कर्जत-रायगड,
भ्रमणध्वनी ९४२ ३८९ १५४०

 

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

7 Comments on आपला कपालेश्वर !

  1. Nitin Mitra khupach chan. Mahitti upyukt.Navin genration la kapaleshwar mandirat konkon yeun gele mahit padel.

    Prashant Ugale -Karjatkar

  2. Nitin, khup sundar lekh. Badalatya kaalalaahi tyat tu chaan gumphun ghetla aahes… Kharach… AADHAARESHWAR… KAPALESHWAR…. –/\–

  3. ‘आपला कपालेश्वर ‘
    अप्रतिम लेखन, असे लेखन निरंतर वाचायला मिळावे ही सदिच्छा.

  4. नितीन तू लिहीलेला आपला कपालेश्वर लेख फारच सुंदर आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..