कापूसखेड नाका, स्टाफ क्वार्टर नं ३/४ (डिसेम्बर ८६-जून ९३)
आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे.
हे गांव/ही नौकरी माझ्या यादीत खरं तर नव्हते. माळेगांव(बारामती) सोडण्याचा विचार मनात असताना आधी मी निवड केली होती- वारणानगर च्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची ! डॉ संतपूर सर तेथे प्राचार्य होते आणि मला जवळून ओळखत होते. माझी तेथे निवड झाल्यावर सरांनी मला वारणेला एकदा बोलाविले- स्व तात्यासाहेब कोरे आणि कारखान्याचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार नाईक यांच्याबरोबर माझी भेट घडविली. दोघांनीही मानेने माझ्या नियुक्तीला होकार दिला. त्यानंतर सरांनी मला माझे क्वार्टर दाखविले,वारणा बाजारची सैर घडविली आणि माझ्या वारणानगर मुक्कामावर शिक्का मारला.
मी माळेगांवला परतलो,आवराआवरी सुरु केली. अशात एक दिवस सरांचे मला पत्र आले- ” नितीन, तू मेकॅनिकलवाला आणि माझ्याकडे ती ब्रँच नाही. तुला रुजू झाल्यावर फक्त ड्रॉईंग आणि वर्कशॉप टेक्नॉलॉजी शिकवत बसावे लागेल जन्मभर ! ”
सरांची कळकळ माझ्या मनाला भिडली. त्यांनीच सुचविले- ” तू बॉश्या(प्राचार्य म वा जोगळेकरांचे वालचंद मधील नामाभिधान) कडे साखराळेला जा. त्यांच्याकडे ऑटोमोबाईल चा डिग्री आणि डिप्लोमा कोर्स आहे. तुझ्या बॅकग्राऊंडला सूट होईल.”
अशारितीने जे गांव मी पाहिले नव्हते तेथे मी मुलाखत दिली,निवड झाली आणि १३ डिसेम्बर ८६ ला माळेगावचा गाशा गुंडाळून इस्लामपूरला निघालो. त्याच दिवशी स्मिता पाटीलचे दुःखद निधन झाले,म्हणून तो सारा प्रवास आजही मनावर रेखला आहे. त्याच रात्री माळेगांवला परतलो.
इस्लामपूरच्या कापूसखेड नाक्यावर आधी महाविद्यालयाचे वसतिगृह होते, पण जसजसे साखराळे येथील महाविद्यालयाच्या संकुलात नवे वसतिगृह तयार झाले तशी मुलं तिकडे शिफ्ट आणि आम्ही शिक्षक मंडळी स्टाफ क्वार्टर्स व्यापू लागलो.
” वरील ” कालावधीत आम्ही सहकुटुंब तेथे वास्तव्यास होतो. त्या गांवात पहिलं पाऊल टाकलं – स्मिताच्या जाण्याच्या साक्षीने, पण कुटुंबासहीत राहायला गेलो तो दिवस मात्र “साहित्यिक “निवडला- “जागर ” या इस्लामपूरच्या साहित्य चळवळीतील अग्रेसर नांव( प्रा. देवदत्त पाटील सरांच्या अध्यक्षतेखालील) असलेल्या संस्थेच्या साहित्य संमेलनाच्या दिवशी ! आणि इस्लामपूरच्या आमच्या साहित्यिक मित्रांनी – अरुण महाळुंगकर, विलास परदेशी (आणि नंतर शैलाताई सायनेकर) यांनी आमचे उभयतांचे बाहू पसरून स्वागत केले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply