माझं रोजचं पायी चालणं हे, सातारा रोडवरील सिटीप्राईड ते सदाशिव पेठ असं असतं. सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी सहा वाजता त्या वाटेवरुन जाता-येताना मला रोजची माणसं, टपऱ्या, हातगाड्या, दुकानं दिसत असतात. स्वारगेटच्या लगतच, बसस्टाॅपजवळ चाळीशीची एक स्त्री अॅल्युमिनियमच्या चेपलेल्या थाळीत एक दगड ठेवून बसलेली मला रोज दिसते. त्या थाळीत एक रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं. मी तिथून जाताना खिशातून एक नाणं काढतो आणि तिने वरती उचललेल्या थाळीत ठेवून पुढे जातो.
शिवाजी रोडने मंडईकडून शनिपार मार्गे ऑफिसवर पोहोचेपर्यंत वाटेत कधी कुणी गरजू वृद्ध स्त्री-पुरुष दिसले तर, त्यांना दोन-पाच रुपये देऊन पुढे जातो. हे पैसे देऊन मी फार मोठे कार्य करतोय असं नाही, तर मला तसं केल्याने एक आत्मिक समाधान लाभतं..
शनिपार चौकात स्वतःच्या पाठीवर आसूड ओढून आवाज काढणारे पोतराज पुढे येऊन हात पसरतात, त्यांना मी टाळतो. पुढे कोपऱ्यावर अॅम्प्लिफायरवर हिंदी गाणी लावून डोंबाऱ्याचं कुटुंब खेळ करुन दाखवत असतं. एक लहान मुलगी उंच दोरीवरुन हातात काठी घेऊन चालत असते. त्यांनी न मागताही, मी पैसे देऊन पुढे जातो.
दिवसभरात कामाच्या व्यापात संध्याकाळ होऊ लागते. त्याच वाटेने परतीच्या प्रवासात मला आदिनाथ सोसायटी समोर कधीतरी, काळा गाॅगल घातलेला वृद्ध हातात मदतीचं आवाहन करणारा लॅमिनेशन केलेला कागद घेऊन उभा असलेला दिसतो. त्याच्या हातावर एक नाणं ठेवून मी चालू लागतो..
आपल्या दृष्टीने दोन-पाच रुपये महत्त्वाचे नसले तरी त्यांना ते वेळेला उपयोगी पडतात. या महागाईच्या दिवसात त्यांची भूक भागली तरी खूप झाले. कधी रस्त्याने जाताना धडधाकट खेडूत पती-पत्नी प्रवासासाठी पैसे मागताना दिसतात. काहीजण त्यांना मदत करतातही, तरीदेखील ते पुन्हा त्याच रस्त्यावर, तेच कारण सांगून पैसे मागताना दिसतात..
कालच मला व्हॉटसअपवर, याच विषयावरची एक हिंदी भाषेतील उत्तम पोस्ट आली. मला ती फार आवडली.. तिचे हे मराठी भाषांतर…
‘माझे ५० रुपये इथेच रस्त्यावर कुठेतरी पडलेले आहेत…’
एके दिवशी मी घरी जाताना, रस्त्यावरील खांबावर एक मजकूर लिहिलेला कागद चिकटवलेला पाहिला. मी जवळ जाऊन तो मजकूर वाचू लागलो..
त्यावर लिहिलं होतं..’माझे ५० रुपये याच ठिकाणी पडलेले आहेत, कुणाला जर ते सापडले तर मला खालील पत्त्यावर आणून दिल्यास मेहेरबानी होईल. मला डोळ्यांनी नीट दिसत नाही..’ खाली पत्ता लिहिलेला होता..
तो मजकूर वाचल्यानंतर मी विचार करु लागलो..जगात अशी सुद्धा माणसं आहेत की, ज्यांना ५० रुपये देखील महत्वाचे वाटतात.. त्याच विचारात मी त्या पत्त्यावर पोहोचलो.. पाहतो तो काय, एका मोडक्या झोपडीसमोर असंख्य सुरकुत्या पडलेली कृश आजी बसलेली होती.
माझ्या पावलांचा आवाज ऐकून तिने विचारले, ‘कोण आहे?’
मी उत्तर दिले, ‘आजी, मी तुमचे त्या रस्त्यावर पडलेले ५० रुपये देण्यासाठी आलोय.’
माझं उत्तर ऐकून ती आजी रडू लागली आणि म्हणाली, ‘अरे बाळा, तुझ्या आधी दहा वीस जणांनी माझ्याकडे येऊन, हेच मला सांगितलं व ५० रुपये देऊन गेले…मी स्वतःहून तो मजकूर लिहिलेला नाही की तिथे लावलेला नाही…मला डोळ्यांनी नीटस दिसतही नाही आणि लिहिता वाचताही येत नाही..’
मी आजीला म्हणालो, ‘काही हरकत नाही आजी, हे ५० रुपये तुम्ही ठेवून घ्या.’ पैसे घेतल्यावर आजीने मला विनंती केली की, त्या खांबावर चिकटवलेला तो कागद तेवढा फाडून फेकून द्या.
आजीचा निरोप घेतल्यानंतर मी विचार करु लागलो, तो मजकूर लिहून त्या खांबावर कुणी लावला असावा? आतापर्यंत तिच्याकडे आलेल्या प्रत्येकाला तिने तो खांबावरील कागद फाडायला सांगितला असणार. मात्र कुणीही तो अद्याप फाडलेला नाही.. मनातल्या मनात मी त्या अज्ञात व्यक्तीचे आभार मानले की, ज्याने आजीसाठी तो मदतीचा मजकूर लिहून खांबावर चिकटवला. मला जाणीव झाली की, आपल्या मनात कुणालाही मदत करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.. ती इच्छा आपण कोणत्याही मार्गाने पूर्ण करु शकतो.. त्या माणसाला देखील आजीला मदत करावीशी वाटली असेल, म्हणून त्याने हा मजकूर लिहून त्या खांबावर लावला असावा…
मी माझ्याच तंद्रीत जात असताना एका माणसाने मला थांबवले व म्हणाला, ‘मला हा पत्ता जरा सांगता का? मला त्या व्यक्तीचे रस्त्यावर पडलेले ५० रुपये द्यायचे आहेत..’
दुसऱ्याला मदत करुन जे समाधान मिळतं तेवढं आपली एखादी इच्छा पूर्ण झाल्यावरही आपल्याला कधीही मिळत नसतं.. कारण स्वतःची एखादी इच्छा पूर्ण झाली की, दुसरी नवीन इच्छा आपल्या मनात निर्माण होते व आपण कायम अतृप्तच राहतो..
मात्र कुणाला तरी मदत करुन मिळालेला आनंद, हा दीर्घकाळ आपल्याला सुखावत राहतो…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-७-२१.
Leave a Reply