नवीन लेखन...

कारण ते एकमेवाद्वितीय होते म्हणून

ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते.
‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही. मग त्यांनी आम्हाला का हसावं ? आम्ही कमीतकमी काही मागायला तरी जात नाही.आयुष्याचं जे काही व्हायचं ते झालं असेल पण आयुष्याचा सिनेमा झाला असे कटु उद्गार आमच्या तोंडून कधी निघणार नाहीत.कारण आम्ही सिनेमा हे शिवी मानत नाही.कधी डोळ्यांत पाणी आलंच तर का रडतोस असं विचारणारं आणि डोळे पुसणारं बाहेरच्या जगात कोणी नव्हतं. मात्र थिएटरमधे कोणी विचारलच तर समोरच्या पडद्याकडे बोट दाखवून आम्ही वेळ मारून नेऊ शकत होतो.’ असा न्या.चंद्रचूडांच्या न्यायालयातही टिकेल असा त्यांचा बिनतोड युक्तीवाद होता.

आज मी त्यांच्याच शब्दांत त्यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘आपण (लोकलज्जेस्तव) जाहीरपणे गात नाही.पण आपण कधी नकळत स्वतःशीच जे काही गुणगुणतो त्याचे किशोरकुमारच्या आवाजाशी साधर्म्य आहे असे वाटणारा किशोरचा आवाज आहे’ असे कणेकर लिहून गेलेत. त्यांना मी एकदा लिहीले होते…”आम्ही काही लिहित नाही.(आम्ही ढीग लिहू हो,पण वाचणार कोण ?) पण कधीकाळी काही लिहिलेच तर ते सोळाआणे तुमच्यासारखेच लिहू असे वाटणारे तुमचे लिखाण आहे.”

शंकर-जयकिशनवरील लेखात ते म्हणतात….”राज कपूरच्या ‘बरसात’मधे एकापाठोपाठ एक तब्बल बारा मधाळ गाणी ? एकाची धुंदी उतरत नाही तोवर दुसरे हजर.यातील एकेका गाण्याची पुण्याई सांगत काही (तुषार भाटियासारख्या ?) चालचोरांनी इथे आयुष्य काढलं असतं.” कणेकरांच्या जेमतेम पावपानभर लेखात चाळीस ते साठच्या दशकातील प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशा किमान दहा ते बारा सुरेल गाण्यांचा उल्लेख असे.यातील एकेका गाण्याची बेडकासारखी चिरफाड करत संगीतसर्जनांनी सहज एका रविवारचं सदर सजविलं असतं.

कणेकरांच्या गेल्या पाच-दहा वर्षांतील लिखाणाबाबत काही जाणकारांकडून टीकेचा सूर आळवला गेलाय.देव आनंदच्या ‘देस परदेस’ नंतरच्या चित्रपटांबद्दल म्हंटले जायचे की तो पडद्यावर काय करणार आहे हे आपण घरी बसल्याही सांगू शकतो.म्हणणारे अर्थात कणेकरच होते.गेल्या काही वर्षांत,एखाद्या घटनेबाबत कणेकर काय लिहू शकतात याचा नेमका अंदाज त्यांच्या चाणाक्ष वाचकांना (न वाचताही) येत असे.

आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांत आपली सारी अभिनयसंपदा उधळून दिल्यानंतर आता यापुढे प्रेक्षकांना नविन काय द्यायचे या विचाराने महान विनोदी अभिनेता मेहमूददेखील हतबुद्ध झाला होता.

पण “महाभारत” मालिकेवरुन कोणी बी.आर.चोप्रांची योग्यता ठरवू नये.त्यांनी आपल्याला कानून,नया दौर आणि वक्तसारख्या अजरामर कलाकृती दिल्यात.अगदी त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांतील लिखाणावरुन कोणी कणेकरांना खालच्या इयत्तेत ढकलू नये.गाये चला जा,फिल्लमबाजी आणि यादोंकी बारातसारख्या पुस्तकांतून त्यांनी आपल्याला खूप काही भरीव दिलय.

डॉन ब्रॅडमन,दिलिपकुमार आणि लता मंगेशकर ही कणेकरांची तीन दैवतं होती.यांतील दोन दैवतं आपल्याला नावानीशी ओळखतात याचा त्यांना रास्त अभिमान होता.गेल्या काही वर्षांत मंगेशकर घराण्याशी व विशेषतः लतादीदींशी त्यांचे छान सूर जुळले होते.लतादीदींच्या शेवटच्या आजारपणात कणेकर दररोज त्यांना त्यांचेच एक गाणे व्हॉट्सअप करीत असत.
देखी जमानेकी यारी,बिछडे सभी बारी बारी…….

कणेकरांनी पुलंच्या नाथा कामतसारखे खूप घाव झेलले.
आधी मूव्हीमुघल,भोळाभाबडा राज कपूर निळ्या डोळ्यांनी धोका देऊन गेला.मग सदासफल प्रेमाचं प्रतिक असलेला देव आनंद दोन दातांतील फट दाखवत हसतहसत लंडनला गेला तो परतलाच नाही.आणि अखेर अभिनयातील शेवटचा शब्द, ट्रॅजिडीकिंग दिलिपकुमार, मोठा पॉज घेत एकही रिटेक न घेता पडद्याआड गेला.पण लताचा घाव मात्र त्यांच्या जास्तच खोलवर गेला असावा.

माझा एक समानधर्मी मित्र म्हणतो… “ज्या जगात लता नाही त्या जगात ते इतके दिवस राहिले कसे हेच आश्चर्य आहे.”
कमालीचा व्यासंग आणि प्रखर स्मरणशक्तीच्या सोबतीला आगाऊपणा आणि अतिशयोक्ती हे त्यांच्या लिखाणाचे अलंकार होते. मात्र ते त्यांच्या लेखणीलाच शोभून दिसत.रूपसुंदरीला अहंकार,प्रगाढपंडिताला पुरस्कार आणि मोदीभक्ताला तिरस्कार शोभून दिसावा तसे.

ऐसा कहां से लाऊं के तुझ-सा कहूं जिसे…..
कणेकरांच्या लिखाणाची नक्कल करण्याचे त्यांच्या हयातीत खूप जणांनी प्रयत्न केले.यावरुन मला त्यांच्याच एका दिलिपप्रेमी मित्राचा किस्सा आठवतो.
तो म्हणायचा “दिलिपकुमारची नक्कल न करणारे फक्त दोनच अभिनेते झाले.राज कपूर व देव आनंद.कारण त्यांना तेही जमलं नाही.”

एका पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सर्वसाक्षी परमेश्वराला उद्देशून कणेकर लिहीतात……
तुझे भला लगे या बुरा लगे पर तेरी दुनिया अपनेको जमी नहीं,
तेरे सामने बैठ के मै रोता पर
तेरा पता मालूम नहीं !

काळोखदेव त्यांच्यावर प्रसन्न होताच. पिटातल्या उसवलेल्या खुर्चीतून तो ‘लवकर चला’ म्हणाला.मग थिएटरमधले दिवे लागायच्या आधीच, अविनाश खर्शीकरच्या खांद्यावर टाकावा तसा, काळोखदेवाच्या खांद्यावर हात टाकून, शिवाजीपार्कला चक्कर मारायला जावे तसे घाईघाईत कणेकर निघून गेले.

त्यांची रिकामी झालेली गादी बळकविण्यासाठी आता त्यांच्या बऱ्याच अस्पष्ट कार्बन कॉप्या पुढे सरसावतील.एकदा वनराजाने जंगल सोडल्यावर कोल्हाकुत्र्यांचं फावणारच.

मात्र आजच्या मल्टिप्लेक्स,डॉल्बी आणि VFX च्या जमान्यात आपल्याला सिंगल थिएटरमधे हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगाचा ब्लॅक अँड व्हाईट मॅटिनी शो दाखविल्याबद्दल आपण कायम त्यांच्या ऋणांत राहूया.

संदीप सामंत.
९८२०५२४५१०
२०-८-२०२३

Avatar
About संदीप सामंत 21 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..