आमच्या अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटस्थान दर्शनाची ‘कर्दळीवन परिक्रमे’ची आज सांगता झाली..
दि. २८ नोव्हेंबरला आमच्या यात्रेची मुंबईतून सुरूवात झाली व दि. २ डिसेंबरला सांगता झाली..प्रत्यक्ष यात्रा ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर अश्या दोन दिवसांचीच होती..
हे दोन दिवस आम्हा सर्वाॅच्या शारिरीक व त्याहीपेक्षा कणखर मानसीक क्षमतेची आणि आमच्या एकमेकांमधल्या ‘बाॅंडींग’ची कसोटी पाहाणारे होते..
श्रीशैलम येथून बोटीने एक तासाच्या प्रवासाने यात्रेची सुरूवात झाली..३० तारखेला सकाळी ६ वाजता श्रीशैलम येथून कृष्णा नदीतून बोटीने प्रवास करून एक तासाने आम्ही वेंकटेश किनारा येथे श्री आप्पाराव स्वामींच्या आश्रमात पोहोचलो..तेथे चहा-नाश्ता करून सोबतचे जास्तीचे सामान तीथेच ठेवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो..या प्रवासात कमीत कमी सामान ठेवावे मग त्रास तुलनेने कमी होतो..!!
पुढचा पहिला टप्पा खडतर अश्या संपूर्ण पायी प्रवासाचा अदमासे ६ कि.मि.चा होता..वाटेत तीन खड्या चढाचे डोंगर पार करावे लागले..इथे डोंगर म्हणजे वेगवेगळ्या आकारांच्या लहान मोठ्या दगडांची मोठ्ठी रास..इथे केवळ चालणे आणि चालणेच..! इथे मात्र आम्ही शारिरीक व मानसिक दृष्ट्या किती फिट आहोत याची परिक्षा होती..चढत, थांबत व काहीसे घसरत पण एकमेकांना सांभाळत आम्ही पुढे निघालो..सकाळी ९ वाजता चढाईला सुरूवात केलेली आम्ही चार तासांनी दुपारी १ वाजता श्री अक्क महादेवी गुंफेत पहिल्या मुक्कामाला पोहोचलो..गुंफा पठारापासून खाली दरीत ४०-५० फुट खाली डोंगराच्या एका कपारीत होती व खाली खोल दरी..घनदाट अरण्याचा भाग आहे हा सारा..!
नैसर्गीक झऱ्यांच पाणी, जंलातला प्रतर्विधी, आंघोळीची अगदी प्रथमिकही सोय नाही, थंडीसाठी व श्वापदांपासून संरक्षण या दुहेरी हेतूने केलेली शेकाटी अश्या आदीम अवस्थेत मनुष्य कसा राहात असेल, तश्या जीवनाचा अनुभव म्हणजे हा मुक्काम. आमच्यासारख्याच आणखी ६०-७० स्त्री-पुरूषांता मुक्काम इथे होता..गुंफेच्या दगडी थंडगार खडबडीत जमिनीवर आम्ही आमची पथारी पसरली..चुलीत लाकडं पेटवून रांधलेलं साधंसं भात-रस्समचे जेवण करून तास-दोन तास विश्रांती घेऊन संध्याकाळी ५ च्या दरम्यान आम्ही वर पठारावर जंगलात थोडंसं फिरावं म्हणून बाहेर पडलो..थोडंसं फिरण हा दुय्यम व दुसऱ्या दिवशीच्या प्रतर्विधीसाठी जागा शोधून ठेवणं हा मुख्यउद्देश..या ठिकाणी या दिवसांत सायंकाळी ४.३०-५ च्या दरम्यान अंधारायला सुरूवात होते..
गुंफेत परत आल्यावर गुंफेत दिवाळीच दिसत होती..मेणबत्त्या, पणत्या, देवासमोरील दिवे व उदबत्त्या..काही जण धीरगंभीर आवाजात स्तोत्र म्हणत होते तर एका कोपऱ्यात स्वामी नामाता जप सुरू होता..वाह ! गुंफेच्या थंडगार अंधारात पेटवलेल्या पणत्या-दिव्यांच्या पवित्र उजेडात अवघं वातावरण भारावल्यासारखं झालं होतं..मग आम्हालाही भक्तीगीत म्हणण्याचा मोह आवरला नाही..याच वातावरणात जेवण उरकून घेतलं आणि मग सुरू झालं संगीतमय वातावरणातील मंतरलेली रात्र..यात मंतरलेल्या अवस्थेत आम्ही सर्वचजण झोपी गेलो..
दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३०-५ वाजता उठून आम्ही १५ जण जंगलात सामुहीक प्रातर्विधीसाठी गेलो..एकमेकांना व एकमेकांच्या xx सांभाळत परंतू एकमेकांपासून योग्य अंतर घेतलेल्या या अनुभावाचं वर्णन करण्याचा मोह मी मोठ्या मुश्कीलीने आवरतोय..इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी, स्वच्छतेची व लाजेची जाणीव उत्पन्न करणारा मनातली कप्पा घट्ट बंद करून टाकावा मग सगळं छान होते..
सर्व आवरून आम्ही सकाळी ६ वाजता श्री अक्कलकोट स्वामी प्रकटस्थान असलेल्या कर्दळीवनातील त्यांच्या गुंफेचं दर्शन घेण्यासाठी निघालो..हा टप्पा ६ कि.मि.चा आहे..वाट पहिल्या टप्प्यापेक्षा तुलनेने सोप्पी आहे मात्र घनदाट जंगलातून जाते..वाटेत पाण्याचा एक ओहोळ सतत सोबत करत असतो..मोठमोठ्या परंतू सपाट शिलाखंडांवरून, बांबूच्या बनातून चढत-उतरत, निरनिपाळे पक्षी बघत होणारा हा दोन तासांचा प्रवास पायपीट न वाटता अत्यंत रम्य वाटतो..दोन तासांनंतर सकाळी ८ वाजता आम्ही प्रकटस्थावर पोहोचलो..अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ही गुंफा आहे..समोरच पाण्याचे दोन लहान धबधब्यासारखे प्रवाह कपारीतून पडत असतात..त्या प्रवाहाखाली अत्यंत थॅडगार पाण्याखाली आंघोळ करून शुच्रिर्भूत होऊन स्वामी प्रतिमेची यथासांग पूजा केली..एक तासभर तीथे थांबून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..
आता घरची ओढ लागली होती..परतीचा प्रवास एकूण १२ कि.मि.चा अत्यंत खडतर अश्या पायी प्रवासाचा होता..पूजा-अर्चा आटोपून आम्ही सकाळी ९ वाजता परतीच्या प्रवासाची सुरूवात केली..परतीचा सुरूवातीचा ६ कि.मि.चा टप्पा आम्ही दिड तासात पूर्ण केला..घरच्या ओढीने पाय आपोआप वेगात पडत असल्याने गोन तासांची वाट आम्ही दिड तासांतच पूर्ण केली..येताना वाट माहित झाली होती व मानसीक तयारी हाे या मागचे दुसरे कारण..सकाळी १०.३० वाजता आम्ही पुन्हा अक्कमहादेवींच्या गुंफेत पोहोचलो..इथे जेवण वैगेरे आटोपून दुपारी १२.३० च्या दरम्सान आम्ही शेवटच्या ८ कि.मि.च्या परतीच्या प्रवासाला निघालो..आता थोडीशी सपाट वाट सोडली तर संपूर्ण प्रवास डोंगर उताराचा होता..चढणं एकवेळ परवडलं परंतू उतरणं अत्यंत कठीण अशी ही वाट..इथे आपल्या पायांची व पायातील बुटांची कसोटी लागते..अनेक जण इथे घसरताना पाहीले तर अनेकांच्या बुटांनी वाटेतच दम तोडलेला पाहीला..वाटेत दम खात, हातातील काठीचा आधार घेत दुपारी ४ च्या दरम्यान आम्ही श्री आप्पाराव स्वामींच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात पोहोचलो..सर्व १५ साथीदार येईपर्यंत ५ वाजले..तूथून बोटीने कृष्णामाईच्या पात्रातून प्रवास करून आम्ही श्री शैलम येथे रात्रीच्य् मुक्कामाला पोहोचलो..इथे आमच्या परिक्मेची खऱ्या अर्थाने सांगता झाली..या एका दिवसात आम्ही १८ कि.मि.चे खडतर अंतर कापले..
थोडक्यात महत्वाचे
प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे..आमच्या १५ जणांच्या ग्रुप मध्ये कमीत कमी ३० वर्षा व जास्तीत जास्त ७५ वर्ष वयाचे आमचे साथीदार होते..बहूतेक जण ५० व त्या पेक्षा जास्त वयाचे होते..आमच्या एका सहकाऱ्याच्या हृदयाची बायपास सर्जरी झाली होती तर त्याचाच पूर्वी अपघातात पायाचे हाड मोडल्याने पायात सळी घातलेली होती..३०-३१ वयाचे दोघे सोडले तर बाकीच्यांना काही ना काही शारिरीक त्रास होताच..असे असूनही आम्ही हा प्रवास करू शकलो कारण आमच्यात एकमेकांविषयी आपुलकी व बाॅंडीग होते..आमच्यासारखेच आलेले इतरजणही पन्नाशीच्या पुढचे होते..
या प्रवासात शारिरीक व मानसीक क्षमता ही महत्वाचीच असते त्याही पेक्षा एकमेकांची काळजी घेऊन सांभाळून घेण्याची मनोवृत्ती आणि सहवासाची ओढ जास्त महत्वाची असते..
पु. ल. नी एका ठिकाणी लिहीलंय, ‘पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह अधिक असतो..म्हणून तर खरे वारकरी उराउरी भेटत शेकडो मैलांची वाट तुडवत जातात. नुसत्या विठ्ठलाचे दर्शन काय, मोटारीतूनही जाऊन मिळते, पण मग ती वारी नव्हे..!’..आमची भावना नेमकी हीच होती आणि या भावनेनेच ही परिक्रमा केल्यास अजिबात त्रास जाणवत नाही..!!
जाता जाता
परिक्रमेस जाताना आपल्याला हैदराबाद येथे उतरून पुढे श्री शैलम येथे जावे लागते..श्री शैलम येथे १२ ज्योतिर्लींगांपैकी एक श्री मल्लिकार्जूनाचे स्थान आहे. त्याचे दर्शन न विसरता घ्यावे..मल्लिकार्जूनाचे दर्शन घेण्यापूर्वी साक्षी गणेशाचे दर्शन जरूर घ्यावे..साक्षी गणेश इथे येणाऱ्या सर्वांची नोंद ठेवतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे..इथेच दुसरे महत्वाचे व अलम हिन्दूस्थानचा, त्यातही मराठी लोकांच्या अभिमानाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अतीशय भव्य मंदीर आहे..एक वेळ मल्लिकार्जूनाची भेट नाही घेतली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन जरूर घ्यावे..
— नितीन साळुंखे
Leave a Reply