मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत…..
जपानने रोबोट बी तयार केल्याचे मधमाळीची उपयुक्तता तपासत आहेत. परंतु ती निसर्गातील मधमाशीची जागा घेऊ शकत नाही. शास्त्रज्ञांनी त्यांच्या बुद्धीची कसोटी, क्षमता व ज्ञानाची पातळी तपासण्यासाठी प्रयोग करावेत. परंतु अशा तंत्रज्ञानातून पर्यावरणाचा शाश्वत विकास होऊ शकत नाही.
मधमाशी कर्मयोगी आहे. सहा आठवडे आयुष्यमान लाभलेल्या या मित्रकीटकाच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आढावा घेऊया. मधमाशी जन्मापासून कुटुंबाच्या व पर्यावरणाच्या विकासासाठी झटतात. मधमाशी एखाद्या कर्मयोगाप्रमाणे विनामूल्य सेवा देते. कामकरी मधमाशीचा जन्म झाल्याबरोबर मोहळ्यातील साफसफाई करते. मधमाशीच्या वाढत्या वयानुसार बाह्य बदल होत असतात. आणि असे बदल कुटुंबाच्या जैविक विकासासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ मधमाशीच्या डोक्यातील ग्रंथी कार्यरत होताच रॉयल जेली हा द्रव स्रवतो. पोळ्यातील अळ्यांना भरविण्यासाठी साठवतात. अशा कामकरी मधमाश्यांना दाई म्हणतात. रॉयल जेली पोषणमूल्यांनी परिपूर्ण असते. राणी मधमाशीची प्रजनन क्षमता ती टिकवते. दाई मधमाश्या पिलावळीची सुरक्षितता, पौष्टिक अन्नाचा पुरवठा व ऊब देऊन निरोगी वाढीसाठी कार्यशील असतात. वाढत्या वयानुसार दाईच्या शरीरात बदल होतात. आणि मेणग्रंथी कार्यरत होतात. मग त्या पोळ्याचे बांधकाम करतात. त्यांच्या पोटाच्या बाजूला असलेल्या मेणग्रंथीतून मेण पाझरते आणि त्याचा वापर मधमाश्या कौशल्याने करतात. त्या पोळे बांधताना वरून खाली बांधकाम करतात. यावरून त्यांचे गणित व भूमितीचे ज्ञान कळते. त्या १५० ग्रॅम मेणातून ९१०० षटकोनी खोल्या तयार करतात. आणि त्यात ४ किलो मध साठवतात.
जन्मल्यानंतर १८ दिवसांनी कामकरी मधमाशी मोहोळाबाहेर काम सुरू करते. मधमाशीच्या विषग्रंथी कार्यरत होतात व पिशवीत विष जमते. पोटाच्या निमुळत्या भागात नांगी (काटा) असते. मधमाश्या आक्रमक होतात तेव्हा शत्रूवर हल्ला करताना नांगी खुपसतात आणि ती बाहेर काढण्यासाठी जोराने हालचाली करतात.
नांगीलगतच्या स्नायूच्या आकुंचन प्रसरण क्रियेमुळे विषपिशवीवर दाब पडून विष नांगीतून शरीरात टाकले जाते. आग्या मधमाश्या शत्रूवर हल्ला करून त्रेधा उडवतात. अर्थात नांगी तुटल्यामुळे संरक्षक मधमाश्या मरतात. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्या बलिदान देतात. इतरही कामे त्या करतात. अन्न गोळा करणाऱ्या मधमाश्या २ ते ३ किलोमीटर जाऊन मकरंद-पराग गोळा करतात. कामकरी मधमाश्या सूर्योदय ते सूर्यास्त अविरत काम करतात. परिसरातून भरपूर मधुरस येतो तेव्हा त्याचा मध करून तो साठवला जातो. हा मध पावसाळ्यात त्या आहारास वापरतात. कामकरी मधमाश्या उन्हाळ्यात पाणी गोळा साठवतात. त्या पंखांच्या हालचाली करून मोहाळातील तापमान नियंत्रित करतात. पिलावळ सुरक्षित ठेवण्यासाठी व राणी माशीचे प्रजनन सुरू ठेवण्यासाठी २८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान लागते.
निसर्गातील प्राणी कीटक त्यांचे जीवन सुलभ करतात. मनुष्य हिंसक तंत्रज्ञानाचा वापर करून भीती, स्वार्थ, छंद यासाठी मोहोळांचा नाश करतो. निरामय आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त करून देण्याची क्षमता मधमाश्यांमध्ये आहे. त्यांना मित्र समजून त्यांचे जतन व संवर्धन करायला पाहिजे. त्यातूनच वसुंधरेची सेवा होईल…
— शेखर आगासकर
Leave a Reply