कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक बालमुरलीकृष्ण यांचा जन्म ६ जुलै १९३० रोजी आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील संकरागपट्टम येथे झाला.
मूळचे आंध्र प्रदेशमधील असणाऱ्या मंगलपल्ली बालमुरलीकृष्ण उर्फ एम. बालमुरलीकृष्ण यांनी त्यांच्या जीवनातील बराच काळ चेन्नईमध्ये व्यतीत केला.
वयाच्या सहाव्या वर्षीपासूनच त्यांनी गायनास प्रारंभ केला. तेलुगू ही त्यांची मातृभाषा होती. मात्र, ते तेलुगूसह कन्नड, संस्कृत, तमीळ आणि अन्य भाषांमध्ये अस्खलीतपणे गायन करीत असत.
विविध भाषांत त्यांनी विविध रागांवर आधारित ४०० हून अधिक रचना केल्या. त्यांचे वडीलही गायक होते, तर आई वीणावादन करीत असे. रामकृष्ण पंतुलू यांच्याकडे बालमुरलीकृष्ण यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. आठव्या वर्षीच त्यांनी विजयवाडा येथे पहिला गायनाचा कार्यक्रम सादर केला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी सर्व 72 मेलाकर्था रागांवर प्रभुत्व मिळविले होते.
पुढे त्यांनी गायनाप्रमाणेच मृदंग, खंजीरा, व्हायोलिन ही वाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला. स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्यासमवेत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्याचप्रमाणे पंडित हरिप्रसाद चौरसिया, किशोरी अमोणकर यांच्यासमवेत जुगलबंदीचे कार्यक्रम सादर केले.
शास्त्रीय गायक, पार्श्वगायक, संगीतकार, अभिनेते, विविध वाद्यांचे वादक या रूपातून बालमुरलीकृष्ण यांनी संगीत क्षेत्रात आपले आगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर देशात व परदेशात पंचवीस हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले.
१९८८ मध्ये दूरदर्शनने बनविलेल्या मिले सूर मेरा तुम्हारा या सर्व भारतीय भाषीय गीतासाठी एम. बालमुरलीकृष्ण यांनी गायन केले होते. भारतातील विविध शहरांप्रमाणेच अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, श्रीलंका, मलेशिया आदी देशांत त्यांनी गायनाचे अनेक कार्यक्रम केले.
१९६७ मध्ये “भक्त प्रल्हाद’ या चित्रपटात सर्वप्रथम नारदाची भूमिका साकारली. नंतर त्यांनी विविध चित्रपटांत भूमिका साकारल्या.
संगीत क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये “पद्मविभूषण’, “पद्मभूषण’, “पद्मश्री’चा समावेश आहे. फ्रान्स सरकारने त्यांना “चेव्हलिअर’ सन्मान दिला होता. त्यांना पार्श्वगायन व पार्श्वसंगीतासाठीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.
एम.बालमुरलीकृष्ण यांचे २२ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply