प्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे. आता आघाडीवर आहे दुसऱ्यावर मात करण्याचे राजस उद्दिष्ट. फक्त भौतिक सुरुवात गुंग होण्याचे तामस उद्दिष्ट. या उद्योजकाचे कर्तृत्व जगासमोर तर आहे, फेरारी गाड्यांची रांग लागली आहे. यश तर आले दारात पण स्वास्थ्य कुठे हरवले?
त्या उद्योजकाची भेट होते एका गुण तत्त्वज्ञ अर्थात Mentor बरोबर तो सांगतो की तुझ्यातला कर्ता सध्या कर्माचा गुलाम बनला आहे. तन्मयेतून येणारी कर्ता-कर्म अभिन्नता वेगळी. आणि आत्ताची गुलामी म्हणजे कर्मांसोबत कर्त्याने फरफरट जाणे. I need a break असा जप करत राहणे. उद्योजक विचार करायला लागतो. त्याला एक विचार रेषा सापडते. मी कर्तृत्ववान असे म्हणणे योग्य नव्हे तर मी आणि माझे कर्तृत्व अशी फोड विचार-भावनांच्या पातळीवर व्हायला हवी. मी ग्रेट असे म्हणण्यापेक्षा मी आणि माझ्यातील ग्रेटनेसची वैशिष्ट्ये असा फिल्टर लाावला पाहिजे. निर्मितीमध्ये माझा वाटा, सहभाग तर होताच. पण त्यावर माझा एकतंत्री हक्क सांगायला लागले माझे मन. मी माझ्या निर्मितीचे संगोपन करेन, विकास घडवेन पण त्याकडे विश्वस्त म्हणून बघेन.
आता हा उद्योजक कर्म आणि क्रिया, कर्ता आणि कर्म याकडे विलगपणे पाहू लागतो. कर्तृत्ववान कर्ता आणि शहाणा ज्ञाता अलग होऊ लागतात. हक्क आणि हेका आता निष्फळ वाटू लागतात. अरे पण उद्योजक म्हणून जो जोम, शक्ती होती त्याचे काय?
ती शक्ती आता त्याच्या संघामधल्या सदस्यांमधून वाहू लागते. त्याला भान येते की क्रिया आता सुक्ष्म करावी, कर्म मात्र विशाल करावे.’ म्हणजे नेमके काय?
कर्म तेच केले पण क्रिया मात्र वेगवेगळ्या होत्या. हे शहाणपण उमगले आणि उद्योजकाने विश्वासाने जबाबदाऱ्यांचे वाटप सुरू केले. सहकाऱ्यांना आपले अनुभव तो खुलेपणाने सांगायला लागला. कर्ता म्हणतो, “मी म्हणजे सोने” तर ज्ञाता सांगतो, “तू सोन्याचे एक expression, एक दागिना.
विविध वजनांचे, कॅरटस् अनेक दागिने आहेत…. धातू या पातळीवर सर्व सारखेच !” म्हणजेच कुंभार, सोनार, सुतार द्या सर्वांकडे वेगवेगळ्या कौशल्याचे दागिने आहेत, पण कौशल्य या पातळीवर डॉक्टर आणि चर्मकार हे एकच आहेत. श्रमप्रतिष्ठेच्या तत्त्वापुढे सारे समान कौशल्याला उच्च आणि नीच असे तोलायचे नाही. वेगवेगळे दागिने पण सोने एकच!
– डॉ. आनंद नाडकर्णी
Leave a Reply