एका बागेत एक माणूस भर दुपारी एकटा बसलेला असतो. दिसायला अगदी फाटका, तब्येतीने अगदी क्षीण आणि अगतिक दिसत असतो. कोणाचेच त्याच्याकडे लक्ष नसते. त्याच्याकडे बघून तो फार दिवस जेवला नसावा असेही वाटत असते.
थोडावेळ जातो आणि एक अत्यंत उंची कपड्यातली बाई त्या माणसाच्या दिशेने चालत येते. ती चांगलीच श्रीमंत असावी असे तिच्या कपड्यांवरुन तसेच तिने परिधान केलेल्या दागिन्यांवरुन वाटत असते. ती सरळ चालत या माणसापाशी येते आणि त्याच्याकडे पाहून हसते.
त्याला वाटते ही बाई दुसऱ्या कोणाकडे तरी पाहून हसत आहे. माझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तो माणूस दुसरीकडे पाहू लागतो. ती बाई त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते “जरा माझ्याकडे पहा. ते समोर एक हॉटेल दिसते आहे तेथे जाऊन आपण कॉफी पिऊ या.” तो माणूस म्हणतो “मला कॉफी वगैरे काहीच नको. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. तुम्ही तुमचा वेळ माझ्यावर व्यर्थ घालवू नका.”
ती बाई त्या माणसाची बाही ओढू लागते. तो माणूस विरोध करु लागतो. एवढ्यात तेथे एक पोलीस अधिकारी येतो आणि त्यांना विचारतो “हे काय चालले आहे? ” ती बाई म्हणते “मी यांना समोरच्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला नेत आहे. हे नाही म्हणत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरुन ते बरेच दिवसांचे उपाशी आहेत असे मला वाटते.”
त्या पोलीस अधिकाऱ्याला आश्चर्य वाटते. ही एवढी श्रीमंत बाई त्या फाटक्या माणसाला कॉफी का देऊ इच्छित आहे त्याला समजत नाही. तेवढ्यात ती बाई त्या अधिकाऱ्याला म्हणते “तुम्ही या माणसाला उठायला मदत केलीत तर आपण सगळेच कॉफी घ्यायला जाऊ या.”
पोलीस अधिकारी आणि ती बाई मिळून त्या विकलांग माणसाला जवळ जवळ फरपटत हॉटेलमध्ये नेतात. कोपऱ्यांतल्या एका टेबलावर बसवतात. ते ही त्याच्या जवळ बसतात. वेटरला खाण्याची व कॉफीची ऑर्डर देतात. तेवढ्यात हॉटेलचा मॅनेजर तेथे येतो. त्या बाईला म्हणतो “तुम्ही अवश्य कॉफी प्या. मात्र या फाटक्या माणसाला या हॉटेलमध्ये प्रवेश नाही.”
तो माणूस संतापतो. त्या बाईला म्हणतो, “मी तर अगोदरपासूनच तुम्हाला नाही म्हणत होतो. तुम्ही मला जबरदस्तीने ओढून आणलेत. या माणसाने कारण नसताना माझा अपमान केला. आता तरी मला कृपया एकटे सोडा. मला जाऊ द्या.”
ती बाई मॅनेजरकडे बघून म्हणते “गल्लीच्या टोकाशी जी मोठी बँक आहे ती तुम्हाला माहित आहे काय?” मॅनेजर म्हणतो “हो तर । तेथे आमचे खाते आहे. शिवाय तिथे कुठलाही कार्यक्रम असला तर केटरींग आमचेच असते. काहीवेळा फार मोठ्या ऑडर्स असतात. परंतु त्याचा याच्याशी काय संबंध?
” ती बाई म्हणते ” मी त्या बँकेची मालकीण आहे. खात्री नसल्यास तेथे जाऊन खातरजमा करुन घ्या. तुम्ही या माणसाला जेवू खाऊ घातले नाहीत तर मला तुमच्या पुढल्या केटरींग ऑडर्सचा विचार करावा लागेल. ”
मॅनेजर वरमतो. त्यांना सॉरी म्हणून परततो. त्या बाईने मागविलेले खाद्यपदार्थ पाठवून देतो. तो माणूस पोटभर जेवतो. कॉफी पितो आणि त्या बाईला विचारतो “तुम्ही हे सगळे माझ्यासाठी का केलेत?” तो पोलीस अधिकारीही खाऊन पिऊन ताजा तवाना झालेला असतो. तो ही कान देऊन ऐकत असतो.
ती बाई सांगू लागते “माझ्या चेहऱ्याकडे नीट निरखून पहा. तुम्हाला मी ओळखीची वाटत नाही का? ” तो माणूस तिच्याकडे एकटक पहातो. “अरे हो, तुम्हाला पाहिल्यासारखे वाटते.” तो म्हणतो.
ती बाई सांगू लागते “काही वर्षांपूर्वी मी अशीच एका थंडीच्या सकाळी कुडकुडत तुमच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. माझ्याजवळ भाड्याचे पुरेसे पैसे नसल्याने मला माझ्या राहत्या घरातून मालकाने हकलून दिले होते. मी उपाशीही होते. तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होतात. मी तुम्हाला म्हणाले की मला काम द्या. त्याच्या मोबदल्यात जेवण द्या. मी फार भुकेली आहे.
वास्तविक काम देणे तुमच्या हातात नव्हते. तरीही तुम्ही उत्तमातले उत्तम जेवण मला आणून वाढलेत. मी पोटभर जेवले परंतु मला भीती वाटत होती की असे केल्याबद्दल कदाचित तुमची नोकरी जाऊ शकेल. परंतु रेस्टॉरंटमधून निघताना मी तुम्हाला माझे बील भरताना पाहिले.
त्याच दुपारी योगायोगाने मला एक छानशी नोकरी मिळाली. त्यानंतर माझी भरभराट होत राहिली. एक दिवस मी माझ्या बँकेची मालकीणही झाले. ही बँक या बागेच्या जवळ असल्यामुळे येता जाता मी तुम्हाला पाहिले. मला ओळख पटली. असे वाटले की तुमच्या उपकाराची फेड करण्याची वेळ आली आहे. आजच्या जेवणावर मी थांबणार नाही. एवढे बोलून तिने आपल्या खिश्यातून एक कार्ड बाहेर काढले. त्यावर तिच्या मॅनेजरचा पत्ता होता.
“यांना जाऊन भेटा. आमच्या बँकेत ते तुम्हाला ‘नक्कीच तुम्हाला जमेल असे काम देतील. शिवाय आजच तुम्हाला काही अॅडव्हान्स देतील.
त्यातून तुम्ही एक परवडणारे घर व कपडे घेऊ शकाल. तुम्ही शक्यतो उद्या रुजू व्हा.” एवढे बोलून ती बाई बँकेच्या दिशेने निघून जाते. पोलीस अधिकारी आणि हॉटेलचा मॅनेजर आ वासून तिच्याकडे पहात रहातात. त्या माणसाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात.
वेटरच्या एका करुणेने त्या बाईचे आयुष्य सावरले होते, समृध्द झाले होते. पोलीस अधिकाऱ्याला तो दिवस चांगला गेल्याचे समाधान वाटले. हॉटेल मॅनेजरला झाल्या प्रकाराचे चिंतन करावेसे वाटले. त्या माणसाला जगण्यासाठी पुन्हा एक आशा मिळाली. चला, आपणही असेच काहीतरी करुया. कोणाला तरी हसवू या, कोणाचे तरी आयुष्य सावरु या.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply